महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 05:39 PM2024-05-21T17:39:52+5:302024-05-21T17:44:04+5:30
शास्त्रज्ञांनी 2,517 महिलांवर हे संशोधन केलं.
पुरेशी झोप न घेतल्यास आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. एका नवीन रिसर्चमध्ये असं समोर आलं आहे की, जर महिलांना पुरेशी झोप मिळत नसेल आणि हे अनेक दिवस चालू राहिलं तर त्यांना हृदयाशी संबंधित आजार सहज होऊ शकतात. महिलांना कमी झोपण्याची सवय महागात पडू शकते.
पिट्सबर्ग विद्यापीठात झालेल्या या संशोधनात असंही आढळून आलं आहे की, जर एखादी महिला रात्री सात तास झोपली नाही तर ती हार्ट अटॅक, हार्ट स्ट्रोक, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन यासारख्या समस्यांना बळी पडू शकते. झोपेच्या कमतरतेमुळे महिलांमध्ये हा धोका 70 टक्क्यांनी वाढतो.
शास्त्रज्ञांनी 2,517 महिलांवर हे संशोधन केलं. या संशोधनात असं आढळून आलं की ज्या स्त्रिया झोपेचा अभाव किंवा वारंवार झोपेचा त्रास सहन करत आहेत त्यांना हृदयविकार होण्याचा धोका 70 टक्के आहे. त्याच वेळी, 5 तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या महिलांमध्ये 72 टक्के हार्ट अटॅक, स्ट्रोक, हार्ट फेलियर, आर्टरी डिजीज अशा समस्या आढळून आल्या आहेत.
संशोधनात असंही आढळून आलं आहे की ज्या महिलांना सतत निद्रानाशाचा त्रास होतो त्यांचं ब्लड प्रेशर वाढतं आणि यामुळे बॉडी रिदमवरही परिणाम होतो, ज्यामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका 75 टक्क्यांनी वाढतो.
निद्रानाशाच्या समस्येपासून असं राहा दूर
- हेल्थलाइननुसार शरीर आणि मन शांत करण्यासाठी मेडिटेशन, मंत्र आणि योगाची मदत घ्या.
- आठवड्यातून 150 मिनिटं व्यायाम केल्यास निद्रानाशाची समस्या दूर होऊ लागते.
- जर तुम्हाला तणावामुळे झोप येत नसेल तर सेल्फ मसाजच्या मदतीने तुम्ही या समस्येवर मात करू शकता.
- तुमच्या आहारात मॅग्नेशियम युक्त अन्नाचा समावेश करा.
- रात्रीचं जेवण झोपण्याच्या दोन तास आधी करा.
- चहा-कॉफीपासून दूर राहा.
- झोपण्याच्या दोन तास आधी स्क्रीन बंद करा.
- कोमट पाण्याने आंघोळ करा आणि झोपा. खोलीतील लाइट बंद करा.