दूधदानासाठी स्तनदा माता घेताहेत पुढाकार ! आशियातील पहिल्या मानवी दूधपेढीतील डॉक्टरांची माहिती
By संतोष आंधळे | Published: August 1, 2022 07:31 AM2022-08-01T07:31:35+5:302022-08-01T07:31:51+5:30
आशियातील पहिली मानवी दूधपेढी डॉ अर्मिदा फर्नाडिस यांनी सायन रुग्णालयात स्थापन केली. रुग्णालयात बाळंतीण महिला शिशूला दूध पाजल्यानंतर अतिरिक्त दूध या पेढीला दान करतात.
- संतोष आंधळे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विविध वैद्यकीय कारणांमुळे काही मातांना नवजात शिशूंना दूध पाजण्यास अडचणी निर्माण होत असतात, दूधदानासाठी स्तनदा माता पुढे येत असल्याने अशा शिशूंना मानवी दूधपेढीतून दूध दिले जात आहे.
आशियातील पहिली मानवी दूधपेढी डॉ अर्मिदा फर्नाडिस यांनी सायन रुग्णालयात स्थापन केली. रुग्णालयात बाळंतीण महिला शिशूला दूध पाजल्यानंतर अतिरिक्त दूध या पेढीला दान करतात. वैद्यकीय कारणामुळे काही मातांना प्रसूतीनंतर त्यांच्या मुलांना दूध देण्यास अडचणी निर्माण होतात, तर काहींना उशिरा दूध आल्यामुळे त्यांच्या शिशूंना दूध देता येत नाही. या पेढीच्या स्थापनेनंतर २०१३ साली प्रथम खासगी रुग्णालयांमध्ये बाळंतीण झालेल्या स्तनदा मातेने स्वतःहून पुढे येऊन दूध दान केले होते. दूधदानाची जनजागृती वाढल्यानंतर माता पुढे येण्याचा ओघ वाढला असून सध्या ५०-६० माता वर्षाला दूध दान करतात.
मातेने दान केलेल्या दुधाची संपूर्ण वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ते योग्य असेल तरच पेढीत जमा केले जाते. तसेच ज्या महिला हे दूध दान देणार आहेत, त्याच्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या जातात. त्याचप्रमाणे या पेढीमध्ये वर्षाकाठी सुमारे आठशे ते बाराशे लीटर दूध संकलित केले जाते.
- डॉ. जयश्री मोंडकर, माजी अधिष्ठाता, सायन रुग्णालय.
अतिरिक्त दूध दान करण्याचे आवाहन
अनेक स्तनदा मातांनी आपल्या बाळाला पुरेसे दूध दिल्यानंतर अतिरिक्त दूध दान केले पाहिजे. यामुळे जी बालके दुधामुळे वंचित असतात त्यांना याचा वैद्यकीय दृष्टीने खूप फायदा होतो. जनजागृतीमुळे सायन रुग्णालयाशिवाय काही खासगी रुग्णालयात प्रसूती झालेल्या स्तनदा माता दूधदानासाठी पुढे येत आहे. मात्र हा आकडा वाढण्याची गरज आहे, असे सायन रुग्णालयाच्या नवजात शिशु विभागाच्या डॉ. स्वाती मणेरकर यांनी सांगितले.