कमी ऐकू येतेय, कानातील पेशींचे नुकसान तर झाले नाही ना?; वाचा बहिरेपणा टाळण्याचे उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 09:38 AM2022-03-04T09:38:45+5:302022-03-04T09:42:16+5:30
बहिरेपणाची समस्या हाताळण्याची पहिली पायरी म्हणजे एखाद्याच्या श्रवणशक्तीचे मूल्यांकन करणे होय.
बहिरेपणा आणि श्रवणदोष कसा टाळावा, तसेच कान आणि श्रवणविषयक काळजी कशी घ्यावी याबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी ३ मार्च हा जागतिक श्रवण दिन म्हणून पाळला जातो. अनेकांच्या श्रवणविषयक समस्यांचे निदान होत नाही आणि ते महत्त्वाचे ध्वनी आणि वाक्प्रचार गमावत असल्याचे तपासणीतून समोर येत आहे.
बहिरेपणाची समस्या हाताळण्याची पहिली पायरी म्हणजे एखाद्याच्या श्रवणशक्तीचे मूल्यांकन करणे होय. आतील कानात केसांसारख्या नाजूक पेशी असतात. ज्या रक्तप्रवाहातील बदलांसाठी अत्यंत संवेदनशील असतात. या पेशींचे नुकसान झाले तर श्रवणशक्ती कमी होते. उच्च रक्तदाब आणि हृदयविकारामुळे देखील कानातल्या नाजूक यंत्रणांना नुकसान होऊ शकते. त्यामुळे कमी ऐकू येत असेल तर वेळीच सावध होत कानाचे आरोग्य तपासा, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला.
ऐकू कमी येण्याची कारणे
वृद्धत्व : आतील कानाच्या संरचनेचे ऱ्हास कालांतराने होते.
मोठा आवाज. मोठ्या आवाजाच्या संपर्कात आल्याने कानाच्या आतील पेशींचे नुकसान होऊ शकते.
आनुवंशिकता.
पिठाची गिरणी, बांधकाम किंवा कारखाना आदी कामाच्या ठिकाणच्या मोठ्या आवाजामुळे बहिरेपणा येऊ शकतो
अँटिबायोटिक जेंटॅमायसिन, सिल्डेनाफिल आणि काही केमोथेरपी औषधे यांसारखी औषधे आतील कानाला इजा करू शकतात.
बहिरेपणा कसा टाळावा ?
सर्व प्रकारचे श्रवण कमी होणे टाळता येण्यासारखे नसले तरी, वय-संबंधित श्रवण कमी होणे किंवा ध्वनी प्रदूषणाने कमी होणाऱ्या श्रवणशक्तीचा धोका कमी करता येतो. नियमित व्यायाम, धूम्रपान व मद्यपान टाळणे, मधुमेह नियंत्रणात ठेवणे, मोठ्या आवाजाच्या ठिकाणी काम न करणे, हेडफोनचा अतिवापर टाळणे.
गोंगाटाच्या वातावरणात श्रवणाचे रक्षण न केल्यास बहिरेपणा येण्याचा धोका असतो. प्रत्येकाने कानाचे आरोग्य सांभाळावे. कमी ऐकू येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. - डॉ संतोष बेदरकर, कान, नाक व घसा तज्ज्ञ