जीवनशैलीमुळे लहानग्यांमध्ये स्थूलतेची समस्या वाढतेय; ‘रेडी टू इट’सह जंकफूडच्या अतिवापराचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 05:33 AM2021-03-24T05:33:51+5:302021-03-24T05:34:10+5:30
वैद्यकीय तज्ज्ञांचे मत, मुलांना जेव्हा धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे आदी लक्षणे दिसू लागल्यानंतरच बरेचदा पालक डॉक्टरांकडे धाव घेतात :
मुंबई : मागील वर्षभरात लहान मुलांची बदललेली जीवनशैली, आहार आणि दिनक्रम यामुळे आरोग्यावर विपरित होत असल्याचे दिसून आले आहे. कोरोनामुळे शाळा, मैदानी खेळ बंद त्यात बैठ्या जीवनशैली आणि शिथिलतेमुळे लहानग्यांमुळे स्थूलतेची समस्या वाढते आहे. आता ग्रामीण भागांतही नोंद घेण्याइतपत दिसून येत आहे. जंकफूड किंवा बंद पाकिटातील ‘रेडी टू ईट’ पदार्थाचे सेवन, कमीत कमी शारीरिक हालचाल, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचा अतिवापर यासाठी प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे.
मुलांना जेव्हा धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे आदी लक्षणे दिसू लागल्यानंतरच बरेचदा पालक डॉक्टरांकडे धाव घेतात. मुलाचे वय आणि उंचीच्या गुणोत्तरानुसार आवश्यक वजनापेक्षा साधारण १० ते १५ किलो वजन अधिक असणे म्हणजे मूल स्थूलतेकडे झुकत आहे, असे म्हणता येईल. घरी बसल्या बसल्याही हालचाली संथ होणे, मैदानी खेळ न खेळणे, वजन सतत वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे, दम लागणे ही साधारण लक्षणे मुलांमध्ये दिसून येत असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशी माहिती बेरिएट्रीक सर्जन डॉ. मिथिला शहा यांनी दिली आहे.
सर्वसाधारणपणे मुलांमधील स्थूलतेचे दोन भाग असतात. दहा वर्षांखालील मुलांना शक्यतो आनुवंशिकरीत्या लठ्ठपणा आलेला असतो, तर त्यावरील मुलांमध्ये मुख्यत्वे खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैली यामुळे लठ्ठपणा येतो. लठ्ठपणावर नियंत्रण आणण्यासाठी कोणतीही औषधे उपलब्ध नाहीत. आहारावरील नियंत्रण आणि व्यायाम या मार्गानेच वजन कमी करता येते. पौगंडावस्थेपर्यंत मुलांमध्ये शरीराचा विकास होत असतो. हार्मोन्सचे बदल घडत असतात. त्यामुळे लहान मुलांमध्ये शक्यतो बॅरियाटिक शस्त्रक्रिया करणे टाळले जाते. अशा बालकांमध्ये लठ्ठपणा कमी करण्यासाठी शक्यतो आहार आणि व्यायामावरच भर दिला जातो. लठ्ठपणावर उपचार करण्यापूर्वी त्याचे योग्य निदान करणे आवश्यक आहे, अशी माहिती डॉ. शहा यांनी दिली.
हे करा !
लहान मुलांमधला लठ्ठपणा टाळण्यासाठी सर्वप्रथम त्यांना मैदानावर खेळण्यास आणि नियमित व्यायाम करण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यायला हवे. पोहणे आणि सायकलिंगसारखे व्यायाम निश्चितच लाभदायक ठरू शकतात. याशिवाय आहारावर नियंत्रण असले पाहिजे. फास्ट फूड खाण्यावर नियंत्रण आणले पाहिजे. तसेच आहार हा सर्वसमावेशक असावा. शीतपेयांची सवय मुलांना लावू नये. आहार आणि निद्रा यांचा समतोल असायला हवा. हॉर्मोन्समुळे लठ्ठपणा वाढत असेल, तर तातडीने एंडोक्रिनोलॉजिस्टचा (हॉर्मोनविशेषज्ञ) सल्ला घ्यावा. सध्या लठ्ठपणा हा एक विकार म्हणून समोर येत आहे. त्यामुळे जीवनशैलीशी संबंधित आजार, मधुमेह, हृदयरोग, उच्चरक्तदाब यांचे प्रमाण कमी वयातच वाढते आहे. ही धोकादायक बाब असून, लठ्ठपणावर वेळीच नियंत्रण मिळवले, तर त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून बचाव करता येईल.
लठ्ठपणा टाळण्यासाठी हे करू नका !
सातत्याने जंकफूड खाणे, मोबाइल, व्हिडिओ गेम यांमुळे कमीत कमी शारीरिक हालचाल यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत जातो. दहा वर्षांवरील मुलांमध्ये दिसून येणारा हा लठ्ठपणा वेळीच लक्षात आल्यास आहार किंवा व्यायामाच्या माध्यमातून नियंत्रित केला जातो. परंतु वजन प्रमाणाबाहेर वाढल्यास किंवा आरोग्यास धोका निर्माण झाल्यास मात्र शस्त्रक्रिया करणे भाग असते. तोंडाला पाणी सुटणारे जंकफूडचे पदार्थ अवतीभवती दिसत असताना त्यापासून त्यांना दूर ठेवणे अशक्य आहे. तेव्हा आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांतून एकदा कुटुंबासह असे पदार्थ खाण्यास हरकत नाही.
साखर, गूळ याचा अतिवापर नको
बाळाला सहा महिन्यांपर्यंत फक्त स्तनपान दिल्यानेही स्थूलता रोखण्यास मदत होते. मुलाला दुधाव्यतिरिक्त आहार सुरू केल्यानंतर पूर्णत: घरी तयार केलेले पदार्थच द्यावेत. यामध्ये मग दुधातले नाचणीचे सत्त्व, तांदूळ-मुगाच्या डाळीची खिचडी, बटाट्याची फोड असे हलके पदार्थ द्यायला हरकत नाही. विविध फ्लेवरसह सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या डबाबंद पावडर आणून घरी बनवून देणे टाळणेच उत्तम, दुधात बिस्किटे देऊ नयेत. साखर किंवा गूळ याचा अतिवापर नसलेले पदार्थ शक्यतो द्यावेत. - डॉ. शिल्पा यादव, आहारतज्ज्ञ