Lifestyle: विवाहित पुरुष आहात? मग तुम्ही जास्त जगाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 12:46 PM2022-09-21T12:46:28+5:302022-09-21T13:03:48+5:30
Health & Lifestyle:अलीकडे सर्वसामान्य माणसांचं जीवनमान दिवसेंदिवस दुर्धर होत चाललं असल्याचं वास्तव जगभर सर्वत्रच पाहायला मिळत असलं, तरी लोकांचं आयुर्मानही वाढलं आहे, हेही तितकंच सत्य आहे. हा विरोधाभास असला तरी आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानानं ही किमया शक्य केली आहे
अलीकडे सर्वसामान्य माणसांचं जीवनमान दिवसेंदिवस दुर्धर होत चाललं असल्याचं वास्तव जगभर सर्वत्रच पाहायला मिळत असलं, तरी लोकांचं आयुर्मानही वाढलं आहे, हेही तितकंच सत्य आहे. हा विरोधाभास असला तरी आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानानं ही किमया शक्य केली आहे; पण तरीही अनेकांना एक मूलभूत प्रश्न नेहमी पडतोच... पुरुषांचं सरासरी आयुर्मान जास्त की महिलांचं? - पूर्वीचे सारे अभ्यास सांगत होते, की पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया जास्त जगतात, त्यांचं आयुष्य पुरुषांपेक्षा जास्त असतं... सर्वसामान्य लोकांच्या मनातही हीच धारणा आहे; पण डेन्मार्कमध्ये झालेल्या एका नव्या संशोधनानं आपल्या या साऱ्या गृहीतकांना, समजांना आणि संशोधनालाही मोठा छेद दिला आहे.
‘युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न डेन्मार्क’च्या संशोधकांनी यासंदर्भात अतिशय व्यापक असा अभ्यास करून नुकतेच काही निष्कर्ष मांडले आहेत. त्यासाठी त्यांनी थोड्याथोडक्या नव्हे तर जगातल्या १९९ देशांचा अभ्यास केला. या अभ्यासासाठी त्यांनी तब्बल दोनशे वर्षांचा डेटा गोळा केला आणि त्यानंतर आपले अनुमान काढले आहेत.
संशोधकांचं म्हणणं आहे, आमच्या या अभ्यासानं अनेकांना धक्का बसेल; पण हे सत्य आहे. महिलांच्या तुलनेत पुरुष, त्यातही विवाहित पुरुष जास्त जगतात, हा आमचा निष्कर्ष आहे. आजवरच्या कोणत्याही अभ्यासात ज्या घटकांचा कोणीही अभ्यास केला नव्हता, त्या घटकांचा अभ्यास विशेषत्वानं आम्ही केला आहे.
संशोधकांनी यासाठी लग्न आणि शिक्षणावर मोठा भर दिला. तुम्ही म्हणाल, लग्न आणि शिक्षणाचा दीर्घायुष्याशी काय संबंध? - पण संशोधकांनी हाच संबंध जोडला आणि अतिशय महत्त्वाचं वास्तव त्यातून उघड झालं. लग्न, शिक्षण आणि वय यांचा काय, कसा संबंध आहे, या अंगानं त्यांनी साऱ्या तपशिलाची काटेकोर छाननी केली, तेव्हा मिळालेला निष्कर्ष त्यांनाही अचंबित करणारा होता.
या अभ्यासाचा निष्कर्ष सांगतो, पुरुषाचं लग्न झालेलं असेल तर तो त्याच्याच वयाच्या अविवाहित महिलेपेक्षा अधिक जगतो. दुसरा निष्कर्ष म्हणजे पुरुष जर पदवीधर, जास्त शिकलेला असला तरीही त्याचं आयुष्यमान कमी शिकलेल्या पुरुष आणि महिलांपेक्षा जास्त असतं. हे दोन्ही निकष एकत्र करून मिळालेला तिसरा निष्कर्ष ठामपणे सांगतो, पुरुष जर विवाहित आणि उच्चशिक्षित असेल, तर महिलांच्या तुलनेत त्याचं आयुर्मान वाढतं.
अर्थातच याचा अर्थ असा नाही, की केवळ लग्न आणि शिक्षण या दोन घटकांवरच माणसाचं आयुर्मान अवलंबून असतं. अनेक घटक त्यासाठी अवलंबून असतात, तरीही समान परिस्थिती असताना या दोन घटकांचा आयुर्मानावर मोठा प्रभाव पडतो, हे अभ्यासातून लक्षात आलं आहे.
बारकाईनं पाहिलं तर पुरुषांच्या वाढत्या आयुर्मानात स्त्रियांचाही मोठा हातभार असतो, हेदेखील स्पष्ट होईल. कारण लग्न झाल्यानंतर अनेक पुरुषांच्या जबाबदाऱ्या तुलनेनं कमी होतात. महिला जास्त जबाबदाऱ्या घेतात, त्यामुळे पुरुषांवरचा ताण कमी होतो. नातेसंबंध, घर सांभाळणं, मुलांची जबाबदारी, खाण्या-पिण्याचा प्रश्न, कुटुंबाचं आरोग्य, त्यांचं औषधपाणी, आजारपणात महिलांकडून कुटुंबाची घेतली जाणारी काळजी... या साऱ्याचा पुरुषांच्या जीवनमानावर सकारात्मक परिणाम होतो. लग्नाचा त्यांना फायदाच होतो. म्हणजे पुरुषांचं आयुष्य वाढतंय, ते महिलांच्या बळावरच. आपलं आयुष्य वाढत असण्यात घरातील महिलांचा वाटा मोठा असतो, हे वास्तव त्यामुळे कोणाही पुरुषाला नाकारता येणार नाही.
या संशोधनातून असंही सिद्ध झालं आहे, की जे पुरुष उच्चशिक्षित असतात, त्यांच्यात ‘समंजसपणा’ही वाढतो. त्यामुळे अशा वैवाहिक जोडप्यांत गुण्यागोविंदानं नांदण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळेच अनेक जोडप्यांचा संसार वीस वर्षे किंवा त्यापेक्षाही अधिक काळ टिकल्याचं प्रमाण तब्बल ६५ टक्क्यांपेक्षाही जास्त आहे.
...अन्यथा आयुष्य आणखी वाढलं असतं!
या अभ्यासाचा निष्कर्ष सांगतो, पुरुषांचं आयुर्मान महिलांच्या तुलनेत २५ ते ५० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता यामुळे अधोरेखित झाली आहे. संशोधकांनी सांगितलं, खरं तर या परिस्थितीचा पुरुषांना आणखी बराच फायदा झाला असता; पण बऱ्याच पुरुषांमध्ये निष्काळजीपणा जास्त असतो. चुकीच्या जीवनशैलीच्या आहारी ते लवकर जातात. मद्यपान, तंबाकू, धूम्रपान इत्यादी अनेक व्यसनांमुळे वेगवेगळ्या आजारांना ते जास्त बळी पडतात. तरुण मुलांमध्ये अपघाताचं प्रमाणही खूप मोठं आहे. या साऱ्यामुळे त्यांच्या आयुष्याचा टक्का थोडा घटला आहे, अन्यथा त्यांच्या आयुष्याची दोरी आणखी बळकट राहिली असती.