सावध ऐका हृदयाच्या हाका! ‘केके’च्या अकाली एक्झिटपासून घ्या धडा...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 07:54 AM2022-06-05T07:54:02+5:302022-06-05T07:54:24+5:30
छातीमध्ये जळजळ वाटणे, पित्ताचा त्रास हा नेमका हृदयाशी जोडलेला आहे का, याविषयी अजूनही अनभिज्ञता आहे.
- डॉ. अतुल लिमये, हृदयरोगतज्ज्ञ
प्रसिद्ध गायक केके म्हणजेच कृष्णकुमार कुन्नथ यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला. कोलकाता येथे कॉन्सर्टमध्ये लाइव्ह परफॉर्म करत असताना त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला आणि रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार, सिद्धार्थ शुक्ला यांनीही अकाली एक्झिट घेतली. या सर्व घटनांमुळे तणाव आणि बदलत्या जीवनशैलीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. हे कसे टाळता येऊ शकते...
छातीमध्ये जळजळ वाटणे, पित्ताचा त्रास हा नेमका हृदयाशी जोडलेला आहे का, याविषयी अजूनही अनभिज्ञता आहे. त्यामुळे अशा त्रासाला प्राथमिकपणे केवळ पित्तनाशक औषधांनी उपचार करून दुर्लक्षिले जाते, अन् वैद्यकीय सल्ला घेणे टाळले जाते. परिणामी, हा त्रास कालानुरूप वाढून यातून हृदयविकार वा कार्डिॲक अरेस्ट अशा स्वरूपाचे आजार उद्भवू शकतात. पित्ताच्या त्रासाचा वैद्यकीय इतिहास नसताना एखाद्या व्यक्तीला त्रास होऊ लागला, तर त्याचे गांभीर्य वेळीच ओळखले पाहिजे. याविषयी जागरूक राहून त्वरित वैद्यकीय सल्ला व औषधोपचार केले पाहिजेत.
पूर्वीच्या काळात व्यसनाधीन असणाऱ्या वा सहव्याधी म्हणजेच उच्चरक्तदाब, मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा अधिक धोका असायचा. मात्र गेल्या काही वर्षांत याचे समीकरण बदलले असून हृदयविकाराचे वय ऐन तारुण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत अनुवंशिकता नसलेले, व्यसन नसलेल्या, सहव्याधी नसणाऱ्या तरुणाईलाही हा आजार होण्याचे प्रमाण अधिक आहे. अशी परिस्थिती उद्भवल्यास त्वरित हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला तसेच, सल्ल्यानुसार ईसीजी, स्ट्रेस टेस्ट, टू डी इको, एक्स रे अशा प्राथमिक चाचण्या करून घ्याव्यात. जेणेकरून पुढील औषधोपचारांची दिशा निश्चित करण्यासाठी मदत होते. कायमस्वरूपी सुदृढ आरोग्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी अवलंबिल्या पाहिजेत.
हा आहे फरक
हृदयविकाराचा झटका येतो, त्यावेळेस हृदयाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो. तर कार्डिॲक अरेस्टच्या स्थितीत हृदयाचे स्पंदन किंवा धडधड बंद होते. हृदयविकाराचा झटका रक्ताभिसरणातून उद्भवणारा हा गंभीर दोष आहे. तर अरेस्टमध्ये हृदयातील विद्युत क्रिया (इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी) बंद पडल्यामुळे निर्माण होणारा हा प्राणांतिक दोष असतो.
‘सीपीआर’विषयी लोकसाक्षरता वाढविली पाहिजे
सीपीआरचा फुलफॉर्म कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन हा आहे. हे एक आपत्कालीन वैद्यकीय तंत्र आहे, ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीचा श्वासोच्छ्वास किंवा हृदय थांबल्यास त्याचे प्राण वाचवता येतात. सीपीआरमध्ये रुग्णाच्या छातीवर दबाव दिला जातो, ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.