रॉक म्युझिक ऐका, 'हा' आजार राहील नियंत्रणात; संगीतामुळे इन्सुलिन स्रवण्याला चालना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 10:12 AM2023-09-17T10:12:05+5:302023-09-17T10:13:07+5:30
शरीरात सतत इन्सुलिनची निर्मिती होत राहावी, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांतून संशोधकांनी एक उपकरण विकसित केले.
नवी दिल्ली : मधुमेह म्हणजेच डायबेटिस हा आजार संपूर्ण जगासमोर मोठी समस्या बनला आहे. यात शरीरातील ग्रंथींमधून स्रवल्या जाणाऱ्या इन्सुलिनचे प्रमाण कमी झालेले असते. याच इन्सुलिनमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहत असते. यामुळे संशोधक शरीरात नैसर्गिकपणे इन्सुलिन तयार व्हावे यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करीत असतात. अशातच रॉक म्युझिक ऐकल्याने शरीरातील ग्रंथींमधून काही मिनिटांतच इन्सुलिन स्रवण्याची प्रक्रिया पूर्ण होत असल्याचे स्वित्झर्लंडमधील एका संशोधनातून समोर आले आहे.
इन्सुलिनमुळे अन्नाचे ऊर्जेत रूपांतर होत असते; परंतु स्वादुपिंडाची क्षमता कमी झाल्यास रक्तात साखरेचे प्रमाण वाढत जाते.
अनेक घटकांचा परिणाम
शरीरात सतत इन्सुलिनची निर्मिती होत राहावी, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांतून संशोधकांनी एक उपकरण विकसित केले. हे एका कॅप्सूलमध्ये ठेवून तिचे शरीरात रोपण केले जाते. याला बाहेरून नियंत्रित करता येते. इन्सुलिनची निर्मिती सुरू करण्यासाठी स्वित्झर्लंडमधील संशोधकांनी विविध प्रकारांचा अभ्यास केला आहे. त्यावेळी लक्षात आले की, बाहेरील प्रकाश, तापमान, इलेक्ट्रिक फिल्ड यांचा इन्शुलिन निर्मितीवर खूप परिणाम होत असतो. त्यांच्या असेही लक्षात आले की, काही मिनिटे संगीत ऐकले तरी शरीरात पुरेशा प्रमाणात इन्सुलिन स्रवले जाते.
५ मिनिटांत सुरू
रॉक म्युझिकमधून शरीरात इन्सुलिन स्रवले जाते, याचा संशोधकांना पहिला पुरावा मिळाला. प्रयोग सुरू असताना प्रख्यात ब्रिटिश रॉक बँड क्वीनचे गाजलेले गाणे ‘वी विल रॉक यू’ हे वाजवले असता केवळ पाच मिनिटांत इन्सुलिन तयार करणाऱ्या उपकरणाच्या मदतीने ७० टक्के इन्सुलिन स्रवले गेले; तर पुढच्या १५ मिनिटांत ते पूर्णपणे स्रवले गेले होते.
क्लासिकल म्युझिकचा उपयोग नाही
क्लासिक म्युझिक तसेच गिटारपेक्षा रॉक म्युझिकमुळे इन्सुलिन स्रवण्याचे प्रमाण अधिक असल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. ‘द एवेंजर्स’ या चित्रपटाच्या टायटल साँगमुळेही मोठ्या प्रमाणात इन्सुलिन स्रवले गेले. म्हणजेच हाय पिच असणाऱ्या गाण्यांमुळे हा परिणाम साधता येतो, असे लक्षात आले आहे.