Lockdown News: लॉकडाऊनमुळे पोटाच्या विकारांचा धोका; जीवनशैली बदलल्याचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 01:53 AM2020-05-09T01:53:38+5:302020-05-09T07:16:52+5:30

लॉकडाउनमध्ये बाहेरचे खाणे बंद झाले असले, तरी घरात गृहिणी चमचमीत पदार्थ बनवित आहेत. वडे, भजी, पिज्झा असे पदार्थ अ‍ॅसिडिटीला कारणीभूत ठरत आहेत.

Lockdown News: Lockdown Risk of Stomach Disorders; The blow of lifestyle change | Lockdown News: लॉकडाऊनमुळे पोटाच्या विकारांचा धोका; जीवनशैली बदलल्याचा फटका

Lockdown News: लॉकडाऊनमुळे पोटाच्या विकारांचा धोका; जीवनशैली बदलल्याचा फटका

Next

मुंबई : कोरोनासंकटामुळे लॉकडाउन असल्याने अनेक जण घरातूनच कार्यालयीन काम करीत आहेत. त्यामुळे नेहमीच्या जीवनशैलीत बदल झाल्याने पोट आणि पचनसंस्थेवर दुष्परिणाम होत आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे स्थूलता, अपचन, पित्त अशा आजारांनी अनेक जण हैराण असून औषधदुकानांत पचन संस्थेच्या औषधांची मागणी वाढली आहे.

लॉकडाउनमुळे घराबाहेर पडणे बंद झाले. शारीरिक हालचाल कमी झाली, व्यायाम बंद झाला. जेवणाच्या व झोपेच्या वेळा बदलल्या आहेत. ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू असल्याने दिवसभर एकाच जागी बसावे लागते. त्यामुळे हालचालच होत नाही आणि अपचनाचा त्रास होतो. रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठणे, असे चक्र सुरू झाल्याने खाण्यापिण्याच्या वेळा बदलल्या आहेत. सकाळी नऊ ही ब्रेकफास्ट व चहाची वेळ ११ ते दुपारी १२ पर्यंत गेली. त्यामुळे जेवणाची वेळही दुपारी २ ते ३ आणि रात्रीच्या जेवणाची वेळ १0 वाजल्यानंतर अशी झाली आहे. अशा वेळा पचनसंस्थेसाठी हानिकारक आहेत.

लॉकडाउनमध्ये बाहेरचे खाणे बंद झाले असले, तरी घरात गृहिणी चमचमीत पदार्थ बनवित आहेत. वडे, भजी, पिज्झा असे पदार्थ अ‍ॅसिडिटीला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे अशा पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात करण्याचे आवाहन आहारतज्ज्ञ करीत आहेत. उन्हाळा सुरू झाल्यावर अपचनाच्या तक्रारी वाढतात. लॉकडाउनमध्ये बदललेल्या सवयी अपचनाला कारणीभूत ठरत आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे रुग्ण ओपीडीत कमी येतात. अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठतेच्या तक्रारी पूर्वीप्रमाणेच आहेत. खाण्यापिण्याच्या वेळा नियमित ठेवणे गरजेचे आहे. थोडा तरी व्यायाम करावा, तेलकट पदार्थ खाऊ नयेत, असा सल्ला केईएम रुग्णालयाचे पोटविकारतज्ज्ञ डॉ. अमित घरत यांनी दिला आहे.

स्क्रीनटाइमही धोकादायक
रात्रीचा स्क्रीनटाइम म्हणजे मोबाइल, टीव्ही, संगणकापुढे बसण्याची वेळ वाढल्याने झोपेची वेळही मध्यरात्रीनंतर १ किंवा त्यापुढेच गेली आहे. त्यामुळे छातीत जळजळ, अस्वस्थ वाटणे असे त्रास वाढले आहेत. या समस्यांची वेळीच दखल घेऊन जीवनशैलीत बदल न केल्यास भविष्यात शारीरिक व मानसिक समस्या उद्भवण्याची शक्यता असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सचिन पाटील यांनी सांगितले.

Web Title: Lockdown News: Lockdown Risk of Stomach Disorders; The blow of lifestyle change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.