कमी रक्तदाबामुळे स्ट्रोक नंतर मृत्यू होण्याचा धोका, नवीन संशोधनातून धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 12:09 PM2021-11-08T12:09:06+5:302021-11-08T12:10:24+5:30
एका नवीन संशोधनातून असंही दिसून आलं आहे की कमी रक्तदाब हे स्ट्रोक आणि त्यानंतरच्या मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष स्ट्रोक जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.
आजची धावपळीची जीवनशैली, अनियमित दिनचर्या, वाढते प्रदूषण अशी अनेक कारणं विविध आजारांना कारणीभूत ठरत आहेत. यापैकी एक म्हणजे रक्तदाबाची समस्या. Hypertension म्हणजेच उच्च रक्तदाब हे पक्षाघात आणि मृत्यूचे प्रमुख कारण असल्याचे आतापर्यंतच्या संशोधनातून दिसून आलं आहे. परंतु, आता एका नवीन संशोधनातून असंही दिसून आलं आहे की कमी रक्तदाब हे स्ट्रोक आणि त्यानंतरच्या मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष स्ट्रोक जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.
यामध्ये संशोधकांनी हृदय, कर्करोग आणि स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांमध्ये याचा मोठा धोका सांगितला आहे. बोस्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमधील न्यूरोलॉजीचे सहायक प्राध्यापक आणि संशोधनात सहभागी असलेल्या फ्रेमिंगहॅम हार्ट स्टडीमधील संशोधक ह्यूगो जे अपारिसियो यांच्या मते कमी रक्तदाबामध्ये स्ट्रोकनंतर मृत्यू होण्याचा धोका जास्त असतो. धूम्रपान करणाऱ्या किंवा हृदयविकार आणि कर्करोगाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी (Risk of Death in Low Blood Pressure) स्थिती अधिक गंभीर होऊ शकते.
संशोधकांच्या मते, स्ट्रोकच्या उपचारांसाठी सध्याची मार्गदर्शक तत्त्वे ही स्ट्रोकनंतर उच्च रक्तदाबावर उपचार करण्याची शिफारस करतात. तसेच या उपचाराच्या वेळी सामान्य किंवा कमी रक्तदाबावर कोणते उपचार करायचे यावर अभ्यासात चर्चा केली गेली.
३० हजार रुग्णांवर संशोधन
संशोधकांनी सांगितले की, या संशोधनासाठी इस्केमिक स्ट्रोक असलेल्या सुमारे 30,000 वृद्ध रुग्णांची माहिती घेण्यात आली. ज्यांना स्ट्रोकपूर्वी बीपीची समस्या होती. या आधारावर, संशोधकांनी स्ट्रोकनंतर कमी आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांच्या मृत्यूचे मूल्यांकन केले. संशोधकांना असे आढळून आले की कमी रक्तदाब असलेल्या लोकांचा मृत्यू दर सर्वात जास्त आहे, विशेषत: जर ते धूम्रपान करत असतील किंवा हृदय, कर्करोग यांसारख्या आजारांनी ग्रस्त असतील.
कमी रक्तदाब असलेल्या १० टक्के रुग्णांना मृत्यूचा धोका जास्त
ह्यूगो जे अपारिसिओ यांनी सांगितले की, त्यांच्या संशोधनानुसार, कमी ते सामान्य बीपीची पार्श्वभूमी असलेल्या स्ट्रोकच्या रुग्णांपैकी 10 टक्के रुग्णांना स्ट्रोकनंतर मृत्यूचा धोका जास्त असतो. ते म्हणाले की, संशोधकांना आशा आहे की स्ट्रोकनंतर मृत्यूला कारणीभूत घटकांचे परीक्षण करून, रुग्ण, नातेवाईक आणि डॉक्टर कमी रक्तदाब सारख्या परिस्थिती चांगल्या प्रकारे समजू शकतात आणि ओळखू शकतात. याद्वारे ते आरोग्याच्या लक्षणांचा अंदाज लावू शकतात.
ते म्हणाले की निश्चितपणे ही माहिती धूम्रपान, हृदयरोग आणि कर्करोग यांसारख्या आजारांवर उपचार घेत असलेल्या पक्षाघाताच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे त्यांना स्ट्रोक झाल्यास बरे होण्याची आणि जगण्याची संधी मिळेल.