ल्युसिड ड्रिमिंग- या स्वप्नांचा अर्थ असा, की...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 06:58 AM2023-09-12T06:58:42+5:302023-09-12T06:59:00+5:30

Lucid Dreaming : पृथ्वीनामक या आटपाट नगरात हरतऱ्हेचे प्राणिमात्र राहतात. त्यांच्यात मनुष्यप्राणी हा सर्वात हुशार. दोन पायांच्या या मनुष्यप्राण्याला भूतलावरची सर्व ऐहिक सुखं आपल्या पायाशी लोळण घ्यावीत, असं मनोमन वाटत असतं.

Lucid Dreaming – These dreams mean that… | ल्युसिड ड्रिमिंग- या स्वप्नांचा अर्थ असा, की...

ल्युसिड ड्रिमिंग- या स्वप्नांचा अर्थ असा, की...

googlenewsNext

पृथ्वीनामक या आटपाट नगरात हरतऱ्हेचे प्राणिमात्र राहतात. त्यांच्यात मनुष्यप्राणी हा सर्वात हुशार. दोन पायांच्या या मनुष्यप्राण्याला भूतलावरची सर्व ऐहिक सुखं आपल्या पायाशी लोळण घ्यावीत, असं मनोमन वाटत असतं. मात्र, ते सगळंच शक्य असतं असं नाही. मग मनुष्यप्राणी स्वप्न पाहतो. ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी ऊरफोड करतो. मनी वसे ते स्वप्नी दिसे, असं आपण म्हणतोच. निद्रावस्थेतील या स्वप्नसमाधीवस्थेवर अनेक संशोधनं झाली आहेत. खरीखोटी यावर विचारमंथनं झाली आहेत. पण स्वप्न पाहणं कोणी सोडत नाहीत. यातीलच एक प्रकार म्हणजे ल्युसिड ड्रिमिंग...

निद्रेचे जसे गाढ आणि अधर असे दोन प्रकार असतात, तसेच स्वप्नांचेही प्रकार असतात. गाढ निद्रेदरम्यान पडणारी स्वप्नं डोळे उघडल्यानंतर आठवतातच असं नाही. ही स्वप्नं आपल्या मनाचे खेळ असतात, असे संशोधनाअंती निष्पन्न झालं आहे. 

मात्र, ल्युसिड ड्रिमिंगचं तसं नसतं. सत्य आणि काल्पनिक यांच्या पुसटशा सीमारेषेवर स्वप्नांचे हे खेळ मनात-मेंदूत खेळले जातात आणि ते अधर निद्रावस्थेत असलेल्यास प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येतात. थोडक्यात आपण स्वप्न पाहात असताना जागे असतो. या जागेपणाच्या अवस्थेत आपल्या दृश्यपटलांवर दिसणारी चित्रं, घटना, घडामोडी यांची स्पष्ट जाणीव या प्रकारात असते. अनेकदा स्वप्नातील गोष्टींशी एकरूप होऊन त्यातील पात्रांशी संवादही साधला जातो ल्युसिड ड्रिमिंग प्रकारात. 

माणसाला पडणारं स्वप्न या विषयावर विज्ञानात बरंच संशोधन झालं आहे. त्यात ल्युसिड ड्रिमिंगवरील संशोधनाचाही समावेश आहे.  मेंदूतील कोणती प्रेरके या प्रकारच्या स्वप्नांना प्रेरित करतात, कोणत्या चेतासंस्था त्यास प्रतिसाद देतात आणि एकूणच ही सर्व प्रक्रिया कशी घडून येते, यावर अव्याहत संशोधन सुरू आहे. असो. त्यातून काय निष्पन्न व्हायचं ते होऊ देत. पण स्वप्नं पाहणं कोणी सोडणार नाही. स्वप्नांच्या दुनियेतलं अवास्तव जगणं आणि वास्तव दुनियेतलं स्वप्नाळू जगणं यातला फरक जो तो जाणतो. एकूणच काय माणसाला पडणाऱ्या स्वप्नाचं रहस्य ही कायमच एक विलक्षण औत्सुक्याची गोष्ट बनून राहीली आहे, हे मात्र खरं.

Web Title: Lucid Dreaming – These dreams mean that…

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य