सतत येत असेल थकवा तर असू शकतो Lung cancer चा धोका!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 10:56 AM2019-11-12T10:56:08+5:302019-11-12T10:59:04+5:30
सतत थकवा येत असल्याचं कारण आपण सामान्यपणे पोषणाची कमतरता आणि कामाचा ताण याला मानतो. पण नेहमी हेच कारण नसतं.
(Image Credit : wilx.com)
सतत थकवा येत असल्याचं कारण आपण सामान्यपणे पोषणाची कमतरता आणि कामाचा ताण याला मानतो. पण नेहमी हेच कारण नसतं. सतत येणारा थकवा आणि काही पावले चालल्यानंतर लागणारी धाप केवळ शारीरिक कमजोरी नाही तर शरीरात वाढत असलेल्या लंग कॅन्सरचं लक्षणही असू शकतं.
फुप्फुसात कॅन्सर वाढत असताना पीडित व्यक्तीला अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यात छातीत वेदना होणे, सतत खोकला येणे, अनेकदा खोकलताना कफ येणे आणि कफात रक्त येणे यांसारखी लक्षणे बघायला मिळतात. बरं असंही गरजेचं नाही की, प्रत्येक रूग्णांमध्ये ही लक्षणे दिसावीत. अनेक स्थितींमध्ये रूग्णाच्या चेहऱ्यावर सूज येणे, श्वास घेण्यास अडचण येणे, सतत घाबरल्यासारखं वाटणे आणि भूक न लागणे अशीही लक्षणे दिसून येतात.
जर तुम्हाला अशाप्रकारची लक्षणे दिसत असतील तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळीच डॉक्टरांशी संपर्क करून सल्ला घ्यावा. काही दिवसांपूर्वी एका रिसर्चमधून ही बाब समोर आली की, फुप्फुसाच्या जास्तीत जास्त केसेस धुम्रपानामुळे बघायला मिळतात.म्हणजे जर तुम्ही स्मोकिंग करत असाल तर तुम्हाला फुप्फुसाला कॅन्सर होण्याचा धोका ४० ते ४५ टक्के वाढतो.
खासकरून तुम्ही जर एखाद्या प्रदूषित शहरात राहत असाल तर हा धोका अधिक वाढतो. इतकेच नाही तर फार जास्त प्रदूषण आणि धूळ असलेल्या ठिकाणांवर राहिल्याने सुद्धा हा आजार होण्याचा धोका अनेक पटीने वाढतो. तुम्ही जर चेन स्मोकर असाल तर तुम्ही सावध होण्याची गरज आहे. कारण असं करून तुम्ही फुप्फुसाचा कॅन्सर होण्याचा धोका ओढवून घेण्याकडे वेगाने सरकत आहात.