दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला म्हणजे धोक्याची घंटा! असू शकतो 'हा' गंभीर आजार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 04:19 PM2022-08-17T16:19:51+5:302022-08-17T16:21:47+5:30
वरवर साधी वाटणारी लक्षणंही काहीवेळा कर्करोगाची असू शकतात. त्यामुळे आजाराचं लवकर निदान होत नाही. यामुळेच आजार गंभीर स्वरूपापर्यंत पोहोचतो आणि जीवाला धोका निर्माण होतो.
कर्करोग (Cancer) हा काही असाध्य रोगांपैकी एक आहे. कर्करोगाच्या काही प्रकारांमध्ये औषधांनी धोका कमी होऊ शकतो. मात्र आजही रुग्ण दगावण्याचं प्रमाण या आजारात पुष्कळ आहे. वरवर साधी वाटणारी लक्षणंही काहीवेळा कर्करोगाची असू शकतात. त्यामुळे आजाराचं लवकर निदान होत नाही. यामुळेच आजार गंभीर स्वरूपापर्यंत पोहोचतो आणि जीवाला धोका निर्माण होतो.
वाढतं प्रदूषण, तंबाखु-सिगारेटचं व्यसन यामुळे सध्या फुफ्फुसाचा कर्करोग (Lungs Cancer) होण्याचं प्रमाण वाढलंय. खोकला (Cough) हे या आजाराचं एक प्रमुख लक्षण आहे. वारंवार खोकला होणं, दोन-तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला येत राहणं अशी लक्षणं असतील, तर डॉक्टरांशी चर्चा करणं आवश्यक असतं. टीव्ही 9 हिंदीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
फुफ्फुसाच्या कर्करोगाची काही लक्षणं (Symptoms) सुरुवातीला दिसतात, मात्र अनेक रुग्ण त्याकडे कानाडोळा करतात. यामुळे हा आजार जीवघेणा बनतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. गेल्या काही वर्षांत फुफ्फुसाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढलं असल्याचं फोर्टिस अॅस्कॉर्ट्स रुग्णालयाचे संचालक आणि पल्मनॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. रविशेखर झा यांचं म्हणणं आहे. चाळीशीच्या आतल्या रुग्णांमध्येही हा कर्करोग होण्याचं प्रमाण वाढलं आहे. बहुतेकवेळा कर्करोग गंभीर झाल्यावरच त्याचं निदान होतं आहे, ही चिंतेची गोष्ट आहे. यामुळे त्यावर औषधोपचार (Medications) करणं कठीण होतं. पुरुषांमध्ये या कर्करोगाचं प्रमाण जास्त असल्याचं आढळतं, असं डॉ. झा यांचं म्हणणं आहे.
सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचं एक प्रमुख लक्षण आहे, मात्र नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात, असं वरिष्ठ फिजिशियन डॉ. कवलजितसिंग यांनी सांगितलं. अशावेळी एखाद्या रुग्णाला दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला असेल, तर डॉक्टरांना दाखवून (Longer Cough Symptoms Should Be Checked) औषधोपचार सुरू केले पाहिजेत. यामुळे कर्करोगाचा धोका टाळता येतो. तसंच क्षयरोगासारख्या गंभीर आजाराचंही यामुळे निदान होऊ शकतं.
फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणं
- छातीत दुखणं.
- वजन झपाट्यानं कमी होणं.
- दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला राहणं.
- खोकल्याची उबळ येऊन त्यात रक्त पडणं.
कर्करोगाचं प्रमुख कारण धूम्रपान
धूम्रपान (Smoking) करण्याची सवय फुफ्फुसाच्या कर्करोगाचं प्रमुख कारण असतं. मात्र आता वायू प्रदुषणामुळेही फुफ्फुसाचा कर्करोग होत असल्याचं समोर आलंय. प्रदूषित हवा, औद्योगिक प्रदूषण, चुकीची आहार पद्धती, हुक्का, विडी यामुळे हा कर्करोग होण्याचा धोका असतो. त्यामुळे संतुलित व पौष्टिक आहार घेणं, घरातली हवा शुद्ध करण्यासाठी एअर प्युरिफायरचा वापर करणं, धूम्रपान न करणं, घरात, आजूबाजूला झाडं लावणं हे काही उपाय करता येऊ शकतात.
त्याशिवाय बाहेर जाताना मास्क वापरणं ही सवय खूप हितकारक ठरू शकते. प्रत्येकानं दर सहा महिन्यांनी आरोग्य तपासणी करावी. त्यामुळेही आजाराचं निदान सुरुवातीच्या टप्प्यात होऊ शकतं व आजार बरा होण्याची शक्यता वाढते. चांगली जीवनशैली अंगिकारणं हा आजारांवरील प्रतिबंधात्मक उपाय असतो. तसंच योग्य व वेळेवर निदान हा कोणताही आजार लवकर बरा करण्यासाठीची महत्त्वाची पायरी असते.