फुफ्फुसांचा कर्करोग आणि त्यावरील उपचारांमध्ये घडून आलेला विकास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 05:13 PM2022-12-01T17:13:22+5:302022-12-01T17:13:37+5:30
Lung cancer : नवनवीन उपचार आणि तंत्रज्ञानात सातत्याने घडून येणारे नावीन्य यामुळे आता फुफ्फुसांचा कर्करोग हा टोकाचा आजार नव्हे तर, दीर्घकाळ चालणारा आजार मानला जाऊ लागला आहे.
डॉ. डोनाल्ड बाबू
कन्सल्टन्ट, सर्जिकल ऑन्कोलॉजी
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई
Lung cancer : जगातील दुसरा सर्वाधिक आढळून येणारा कर्करोग, फुफ्फुसांचा कर्करोग हे प्रॉस्टेट कॅन्सरच्या खालोखालचे सर्वात मोठे मृत्यूंचे कारण आहे. गेल्या दशकभरात, निदान आणि उपचारांमध्ये शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी यासारखे प्रमुख आधुनिक विकास घडून आल्याने, फुफ्फुसांच्या कर्करोगातून बऱ्या होणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत वाढ होत आहे. नवनवीन उपचार आणि तंत्रज्ञानात सातत्याने घडून येणारे नावीन्य यामुळे आता फुफ्फुसांचा कर्करोग हा टोकाचा आजार नव्हे तर, दीर्घकाळ चालणारा आजार मानला जाऊ लागला आहे.
शस्त्रक्रिया प्रक्रियांमध्ये देखील न्यूमोनिएक्टॉमीपासून (फुफ्फुसाचा प्रभावित झालेला भाग शस्त्रक्रिया करून काढून टाकणे) ते लोबेक्टॉमी (फुफ्फुसातील एक लोब काढून टाकण्यासाठीची शस्त्रक्रिया) इतका विकास झाला आहे आणि काही केसेसमध्ये सबलोबर रिसेक्शन म्हणजे फुफ्फुसाचा लहानसा भाग काढून टाकण्याची शस्त्रक्रिया देखील केली जाऊ लागली आहे. शस्त्रक्रियेच्या तांत्रिक भागांमध्ये देखील लक्षणीय सुधारणा घडून आल्या आहेत. बरगड्या बाजूला करून केल्या जाणाऱ्या थोरॅकोटोमीच्या ऐवजी आता व्हिडिओच्या साहाय्याने केली जाणारी, मिनिमली इन्व्हेसिव्ह (अर्थात शरीरावर कमीत कमी चिरा देऊन, कमीत कमी रक्तस्त्राव होईल अशी शस्त्रक्रिया) थोरॅकोस्कोपिक सर्जरी ((VATS) केली जाते, ज्यामुळे शस्त्रक्रियेतून मिळणाऱ्या लघुकालीन परिणामांमध्ये ओपन थोरॅकोटॉमीच्या तुलनेने लक्षणीय सुधारणा झाली आहे.
पण व्हॅट्सच्या खोलीचा नीट अंदाज न येणे आणि वळवायला कठीण अशी स्ट्रेट इंस्ट्रुमेंट्स यासारख्या व्हिज्युअल आणि मेकॅनिकल मर्यादा आहेत. नुकतीच विकसित करण्यात आलेली रोबोटिक-असिस्टेड थोरॅसिक सर्जरी (RATS) VATS च्या बहुसंख्य मर्यादांचे निवारण करू शकते. RATS मध्ये मानवी मनगटाप्रमाणे काम करू शकणारी इंस्ट्रुमेंट्स वापरली जातात जी हुबेहूब मानवी हाताच्या हालचालींप्रमाणे काम करू शकतात आणि ८ एमएमची चीर देऊन छातीच्या आत सरकवली जातात. रुग्णांच्या बाबतीत अधिक चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आणि नंतर मिळणारे सामाजिक-आर्थिक लाभ यामुळे नवीन शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाच्या महागड्या खर्चांचे संतुलन साधले जाईल.
केमोथेरपीची सुरुवात होण्यापूर्वी उपलब्ध असलेले सर्वोत्कृष्ट सहाय्यक उपचार फुफ्फुसांच्या मेटास्टॅटिक कर्करोगाने त्रस्त व्यक्तीचे सरासरी जगणे फक्त दोन ते चार महिन्यांपर्यंत वाढवू शकत होते. १९७० च्या दशकात फुफ्फुसांच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी सुरुवातीच्या काळातील केमोथेरप्यूटिक औषधांचा वापर केला जात असला तरी, त्यातून मिळणारा क्लिनिकल फायदा अगदीच किरकोळ होता. १९८० आणि १९९० च्या दशकात केवळ प्लॅटिनम आणि पुढच्या पिढीतील केमोथेरप्यूटिक औषधांची निर्मिती करून ती बाजारपेठेत दाखल करण्यात आल्यामुळे, फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांचा जीव वाचण्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण लाभ मिळत असल्याचे दिसून आले.
२००० आणि २०१० च्या मध्यात, अँटी-अँजिओजेनेसिस औषधे आणि औषधें दिली जाण्याच्या नवीन प्रणालींमुळे देखील वैद्यकीयदृष्ट्या फायदेशीर परिणामकारकता व सहनशीलता दिसून आली. अलीकडच्या वर्षात, टायरोसिन किनेज इनहिबिटर (TKIs) किंवा इम्यून चेकपॉईंट इनहिबिटर (ICIs) वापरून केमोथेरपीवर आधारित संयुक्त पध्दतीने केवळ केमोथेरपीच्या तुलनेने अधिक चांगले फायदे दर्शवले आहेत. यामध्ये केमोथेरपीवर आधारित उपचारात्मक पद्धतींमध्ये झालेला उत्तरोत्तर विकास आणि क्लिनिकल लाभांमधील प्रगती यांचे लाभ मिळत आहेत.
रेडिएशन थेरपीमध्ये रेडिएशनचे मोठे डोसेस दिले जातात, याला रेडिओथेरपी असे देखील म्हणतात. कर्करोगाच्या पेशींचा नायनाट करण्यासाठी आणि ट्युमरचा आकार कमी करण्यासाठी हे उपचार वापरले जातात. फुफ्फुसांच्या कर्करोगावरील उपचारांच्या सर्व टप्प्यांमध्ये रेडिओथेरपी वापरली जाते आणि जवळपास अर्ध्याहून जास्त रुग्णांमध्ये कमीत कमी एकाहून जास्त वेळा एकतर आजार बरा करण्यासाठी किंवा वेदना कमी करण्यासाठी त्याची गरज असते. आधीच्या काळात फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या बाबतीत टार्गेट निश्चित करण्यासाठी पॅरलल अपोज्ड फील्ड्स आणि ऍनाटॉमीकल लॅन्डमार्क्स वापरून सिम्युलेटरमध्ये रेडिएशन थेरपी वापरली जात होती. १९९० च्या दशकात सीटी प्लॅनिंग वापरून 3D कन्फॉर्मल RT विकसित करण्यात आल्याने जास्तीत जास्त ट्युमर कव्हर करता येणे शक्य झाले आणि इतर अवयवांना रेडिएशनचा धोका निर्माण होण्याची शक्यता कमी झाली. उपचारांच्या काळात RT बीम फ्ल्यूएंस, वजन आणि आकार हे विविध बीम्ससाठी ज्यामध्ये ऍडजस्ट केले जातात अशा इन्टेन्सिटी-मॉड्युलेटेड रेडिओथेरपीचा विकास झाल्याने अधिक जास्त कन्फॉर्मल उपचार शक्य झाले.
चार मितीय अर्थात 4D CT मुळे रुग्णाच्या श्वसन चक्रानुसार छोटे मार्जिन्स तयार करणे आता शक्य आहे, ज्यामध्ये श्वसनासोबत ट्युमरची होणारी हालचाल दिसू शकते. इमेजिंग आणि RT तंत्रज्ञानातील या विकासामुळे कर्करोगाविरोधातील लढाईत रुग्णांना आशेचा किरण दिसू लागला आहे.
आजच्या काळात फुफ्फुसांच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या अनेक रुग्णांवर एखाद्या दीर्घकालीन आजाराप्रमाणे उपचार केले जातात. आजार चौथ्या टप्प्यात पोहोचलेल्या रुग्णांच्या बाबतीत देखील सरासरी आयुर्मानात गेल्या काही वर्षात वाढ झाली आहे. बाजारात नवनवीन औषधे आणली जात आहेत आणि याचा वेग आधीपेक्षा खूप जास्त आहे. नव्या औषधांपैकी अनेक औषधे जुन्यांपेक्षा जास्त कार्यक्षम जरी असली तरी प्रत्येक रुग्णासाठी उपयुक्त ठरेल असे एकही औषध नाही. अधिक जास्त अचूक आणि सक्षम अशी नवी रेडिएशन उपचार तंत्रे उपलब्ध आहेत ज्यामुळे गंभीर साईड इफेक्ट्स होण्याची शक्यता कमी आहे. अलीकडच्या काळात शस्त्रक्रियेच्या तंत्रात देखील सुधारणा झाली आहे ज्यामुळे शरीरावर मोठ्या चिरा द्याव्या लागत नाहीत, जास्त रक्तस्त्राव होत नाही.