महाराष्ट्र, यूपी धोकादायक खोकतोय! क्षयरोग रुग्ण संख्येत देशात दुसरा; आरोग्यमंत्र्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 08:27 AM2022-12-14T08:27:14+5:302022-12-14T08:27:30+5:30
राज्यसभा सदस्य नीरज शेखर यांनी विचारलेल्या प्रश्नावर आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडविया म्हणाले की, गेल्या वर्षी २१.४६ लाख लोक याने ग्रस्त होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक क्षयरोगाचे (टीबी) रुग्ण आढळले आहेत. संपूर्ण देशात २१.९८ लाख लोक या आजाराने ग्रस्त आहेत, त्यापैकी ४.६८ लाख उत्तर प्रदेशात आणि २.१४ लाख महाराष्ट्रात आहेत. गेल्या वर्षी जगात १ कोटी ६ लाख टीबीचे रुग्ण होते. त्यापैकी २१.५ लाख भारतात होते.
राज्यसभा सदस्य नीरज शेखर यांनी विचारलेल्या प्रश्नावर आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडविया म्हणाले की, गेल्या वर्षी २१.४६ लाख लोक याने ग्रस्त होते.
सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यूत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
उघड्यावर शौचास जाण्यापासून मुक्त होण्यासाठी मोदी सरकारच्या प्रयत्नांदरम्यान एक दुःखद आकडा समोर आला आहे. देशातील विविध भागांत सेप्टिक टँक साफ करताना यावर्षी नोव्हेंबरपर्यंत ४८ स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यापैकी सर्वाधिक १३ आणि १२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू हरयाणा आणि महाराष्ट्रात झाला आहे.
तामिळनाडूमध्ये १० स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी ४० जणांचा, तर २०२० मध्ये १९ जणांचा मृत्यू झाला होता. २०१९ मध्ये मात्र देशात अशा प्रकारे मृत्युमुखी पडलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या ११७ होती.