पोटफुगीवर करा घरगुती उपाय. हे आठ उपाय केले तरी पोटफुगी कमी होते.
By Admin | Published: June 9, 2017 06:56 PM2017-06-09T18:56:54+5:302017-06-09T18:56:54+5:30
आपल्या काही सवयी काढून टाकून आणि स्वत:ला नव्या सवयी लावून घराच्या घरी पोटफुगी कमी करता येते.
- माधुरी पेठकर
अनेकांना आपल्या पोटाकडे पाहून आपण जाड झाल्यासारखं सारखं वाटत असतं. सतत फुगलेल्या पोटामुळे मनात कायम अस्वस्थता असते. आपल्या फुगलेल्या पोटावर डॉक्टरच काय तो इलाज करू शकतील असंही अनेकांना वाटतं.
फुगलेलं पोट ही काही मोठी शारीरिक समस्या नाहीये. मुळात आहार आणि विहारात दोष निर्माण झाले की ही समस्या डोकं वर काढते. पोट फुगण्यामुळे एकूण व्यक्तिमत्त्व बेढब दिसतं यामुळे खरी अस्वस्थता येते. डॉक्टरांकडे न जाताही पोट फुगीवरचे उपाय आपण घरच्याघरी आपल्या काही सवयी काढून टाकून आणि स्वत:ला नव्या सवयी लावून घेवून करता येतात.
पोट फुगतं काय करायचं?
1. मीठ हे पोट फुगीत महत्त्वाची भूमिका बजावतं. योग्य प्रमाणात मीठ हे शरीराला हवं असतं. पण थोडं जरी मीठ जास्त झालं तर ते शरीरात दोष निर्माण करतं. शरीरात मीठाच्या रूपानं जाणार सोडियमचं प्रमाण कमी केलं, नियंत्रणात ठेवलं तरी पोटफुगी कमी होते. बहुतेकांच्या पोटफुगीचं कारण हे मीठाचं अतिरिक्त प्रमाण हेच असतं. मीठामुळे पाणी साचून राहतं. त्यामुळेही पोट फुगी होते. म्हणूनच भाज्या आमट्यांमध्ये मीठ प्रमाणात टाकणं, वरून मीठ भुरभुरून खाणं, वेफर्स, कॉटेज चीज, सोया सॉस, हॉट डॉग्ज यसारख्या पदार्थात अतिरिक्त मीठ असतं , त्यामुळे हे पदार्थ कमी खाणं किंवा अजिबात न खाणं इष्टच.
2. शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झालं तरी पोट फुगतं. पाणी कमी प्यायलं गेलं, जेवणात कोरडेच पदार्थ खाल्ले गेले तरी पोट फुगतं. म्हणूनच योग्य प्रमाणात पाणी प्यावं, कलिंगड, मोसंबी, डाळिंब या फळांचे ज्यूस नियमित घ्यावं. शरीराला जर योग्य प्रमाणात पाणी मिळालं तर बध्दकोष्ठताही होत नाही. पाणी कमी प्यायल्यानं बध्दकोष्ठता होते आणि यामुळेही पोट फुगल्यासाखं वाटतं. म्हणूनच योग्य प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे.
3. आपण घेत असलेल्या आहारामुळेही पोट फुगी होते. बीन्स, ब्रोकोली, कांदा, लसूण यासारख्या भाज्यांचं अतिप्रमाणात सेवन केल्यानं पोटात गॅसेस तयार होतात. त्यामुळेही पोट फुगतं. अनेकांना दूध, दही, लस्सी, चीज, आइस्क्रिम यासारखे डेअरीचे पदार्थ सेवन केल्यामुळेही पोटफुगीचा त्रास होतो. असं असेल तर आवडत असूनही अशा पदार्थांना लांब ठेवणंच फायद्याचं ठरतं.
4. तुमच्या रोजच्या आहारातून शरीराला फायबर ( तंतूमय घटक) किती मिळतं यावरही पोटफुगी अवलंबून असते. म्हणूनच रोजच्या आहारात भरपूर फायबर असल्या भाज्या आणि फळं खाणं महत्त्वाचं ठरतं. फायबरमुळे बध्दकोष्ठता होत नाही. आणि त्यामुळे पोटफुगी होत नाही.
5. खाण्याच्या पदार्थांबरोबरच खाण्याच्या सवयीकडेही लक्ष द्यायला हवं. कामाची घाई असते म्हणून उभ्या उभ्या नाश्ता करणं, जेवण दोन तीन मीनिटात आटपण यासारख्या सवयींमुळे पोटफुगी होते. त्यामुळे एकाजागी शांतपणे बसून, सावकाश, चावून चावून खाणं गरजेचं असतं.
6. पोटफुगी वाटत असल्यास वरचेवर अननस खावं. अननस हे उष्णकटिबंधातलं फळ आहे. अननसात असलेल्या घटकांमुळे प्रथिनांचं पचन होतं. पचनाची क्रिया सुलभ होते. पचन जर व्यवस्थित झालं तर मग पोटफुगीसारखे विकार होत नाही.
7. दिवसभर शरीराची अजिबात हालचाल न करता एका जागी बसून काम करणं, शरीराला अजिबात व्यायाम नसणं यामुळेसुध्दा पोटफुगी होते. रोज किमान 30 ते 45 मीनिटांचा व्यायाम शरीराला हलकं फुलकं ठेवतो. व्यायामामुळे पोटाकडील चरबी कमी होते. पोटाकडील चरबी वाढल्यामुळेही पोट फुगल्यासारखं वाटतं.
8 अतिप्रमाणात अल्कोहोलचं सेवन केल्यानं डिहायडे्रशन होतं. आणि त्यामुळेही पोट फुगी होते. त्यामुळे अल्कोहोलचं कमी सेवन करावं.