झोपेच्या गोळ्या घेत असाल तर 'या' समस्यांचा सामना करण्यासाठी तयार रहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 01:15 PM2018-10-27T13:15:14+5:302018-10-27T13:21:32+5:30
बऱ्याच जणांना झोपेसंदर्भातील अनेक तक्रारींना सामोरं जावं लागतं. त्यावेळी काही लोक डॉक्टरांच्या सल्यानुसार झोपेच्या गोळ्यांचा आधार घेतात. परंतु काही लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता, गरज नसतानाही झोपेच्या गोळ्या घेत असतात.
बऱ्याच जणांना झोपेसंदर्भातील अनेक तक्रारींना सामोरं जावं लागतं. त्यावेळी काही लोक डॉक्टरांच्या सल्यानुसार झोपेच्या गोळ्यांचा आधार घेतात. परंतु काही लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता, गरज नसतानाही झोपेच्या गोळ्या घेत असतात. झोपेच्या गोळ्या घेतल्यामुळे अनेकदा शांत झोप लागते, हे खरं आहे. पण कालांतराने या गोळ्यांची सवय लागते. एकदा का ही सवय लागली की हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरते. झोपेच्या गोळ्यांचं अधिक सेवन केल्याने अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. जाणून घेऊया झोपेच्या गोळ्यांच्या सेवनाने होणाऱ्या आजारांबाबत...
गरोदरपणात सेवन करणं टाळावं
गर्भवती महिलांनी झोपेच्या गोळ्यांच सेवन करणं टाळावं. यामुळे अस्वस्थ वाटू लागतं आणि पोटातील बाळावर याचा वाईट परिणाम होतो. गरोदरपणात झोप न येण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हृदयासंबंधीच्या आजारांना आमंत्रण
डॉक्टरांच्या मते, झोपेच्या गोळ्यांचे जास्त सेवन केल्याने हार्ट अटॅकचा धोका संभवतो. वैज्ञानिकांनी झोपेच्या औषधांमध्ये अस्तित्वात असणाऱ्या जोपिडेम नावाच्या तत्वाला हृदयासंबंधिचे आजार होण्याचं कारण सांगितलं आहे.
कोमामध्ये जाण्याचा धोका
ज्या व्यक्ती दररोज एका गोळीपेक्षा जास्त गोळ्या घेत असतात, अशा व्यक्तींना कोमामध्ये जाण्याचा धोका अधिक संभवतो. दमा आणि पाठीच्या मणक्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना इतर व्यक्तींच्या तुलनेत हा धोका जास्त असतो. तसेच झोपेच्या गोळ्यांमुळे ब्लड प्रेशर, डोकोदुखी यांसारख्या तक्रारींनाही सामोरं जावं लागतं.
स्मरणशक्तीवर परिणाम
अनेक दिवसांपासून झोपेच्या गोळ्या घेणाऱ्या व्यक्तींच्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो. झोपोच्या गोळ्यांमध्ये असेलेली तत्व नर्वस सिस्टिमवर परिणाम करतात. त्यामुळे नर्वस सिस्टिम संबंधातील आजारांचा धोका संभवतो.
थकवा जाणवणं
दररोज झोपेच्या गोळ्या खाल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्याचप्रमाणे दिवसभर सुस्ती, थकवा जाणवतो.
लठ्ठ व्यक्तींना सर्वाधिक धोका
ज्या व्यक्ती लठ्ठपणाने त्रस्त असतात. असा व्यक्तींनी चुकूनही झोपोच्या गोळ्या घेऊ नयेत. अशा व्यक्तींना अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो.