Malaria Vaccine: WHO चा ऐतिहासिक निर्णय; मलेरियाविरुद्धच्या जगातील पहिल्या लसीला मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 11:31 AM2021-10-07T11:31:22+5:302021-10-07T11:47:51+5:30
World First Malaria Vaccine Approved By World Health Organization: आफ्रिकन देशात झालेल्या प्रायोगिक तत्वावर वापरल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने हा निर्णय घेतला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने मलेरियाच्या उपचारासाठी जगातील पहिल्या लसीच्या वापराला मान्यता दिली आहे. WHO नं बुधवारी RTS,S/AS01 मलेरिया व्हॅक्सिनला(Malaria Vaccine) मंजुरी दिली आहे. दरवर्षी मलेरिया या आजारानं ४ लाखापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो. आफ्रिकन देशात मलेरिया आजारात खूप घातक ठरतो. याठिकाणी मृत्यू होणाऱ्या लोकांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
आफ्रिकन देशात झालेल्या प्रायोगिक तत्वावर वापरल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने हा निर्णय घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, मलेरियाविरुद्ध एकमेव मान्यता प्राप्त लस आफ्रिकेतील मुलांना द्यायला हवी. मलेरिया आजारावर नियंत्रण मिळवलं पाहिजे जी दरवर्षी लाखो लोकांचा जीव घेते. WHO च्या शिफारशीनंतर आरटीएस-एस मासक्विरिक्स व्हॅक्सिनला मान्यता दिली. ही लस ब्रिटिश औषध कंपनी ग्लैक्सोस्मिथक्लाइनला विकसित केली आहे.
WHO च्या सहकार्याने राबवण्यात आलेल्या पायलट प्रोजेक्ट कार्यक्रमात २०१९ नंतर मासक्विरिक्सचे २३ लाख डोस घाना, केनिया आणि मालावी येथील नवजात बालकांना देण्यात आले होते. मलेरिया आजारामुळे मृत होणाऱ्यांमध्ये सर्वाधिक ५ वर्षापेक्षा कमी वयातील मुलांचा समावेश असतो. पायलट प्रोजेक्ट कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी या लसीची ७ आफ्रिकन देशात जवळपास १० वर्ष क्लिनिकल चाचणी करण्यात आली. पायलट प्रोजेक्टमध्ये कुठल्याही उत्पादनाची जागतिक स्तरावर निवड करण्यासाठी त्याच्या परिणामाबद्दल आढावा घेतला जातो. WHO चे संचालक टेड्रोस अधनोम घेब्रेयेसस यांनी सांगितले की, ही व्हॅक्सिन ज्या आफ्रिकन वैज्ञानिकांनी आफ्रिकेत विकसित केली आहे. त्या सर्वांचा आम्हाला अभिमान आहे. या लसीच्या वापरामुळे दरवर्षी हजारो जीवांचे प्राण वाचणार आहेत.
WHO च्या निवेदनात म्हटलंय की, आफ्रिकन खंडातील परिसरात मध्यम ते उच्च मलेरिया संक्रमण असणाऱ्या मुलांवर लसीचा वापर करण्यात यावा. सध्या मलेरिया व्हायरस आणि बॅक्टेरियासाठी अनेक लस उपलब्ध आहेत. परंतु WHO ने मलेरियाविरुद्ध व्यापक स्वरुपात वापरासाठी पहिल्यांदाच एका लसीला मान्यता दिली आहे. ही व्हॅक्सिन मलेरियासारख्या घातक प्लास्मोडियम फाल्सीपेरमविरुद्ध काम करते. मलेरिया लक्षणात ताप, डोकेदुखी, मांसपेशीत वेदना, थंडी वाजणे आणि घाम येणे यांचा समावेश आहे.