'हा' व्यक्ती दररोज १० लिटर पाणी प्यायचा, तपासणीत समोर आला धोकादायक आजार!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 11:43 AM2023-07-21T11:43:46+5:302023-07-21T11:58:13+5:30
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल, तेव्हा फक्त एका प्रकरणात इतके पाणी पिऊ शकते.
आपल्या शरीरासाठी पाणी हे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीने दररोज म्हणजेच २४ तासांत २ ते ३ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. ज्यामुळे शरीरातील आर्द्रतेची पातळी नियंत्रित राहते. पण, जर एखादी व्यक्ती रोज १० लिटर पाणी पित असेल तर ते आरोग्यासाठी चांगले असेल का? तर रोज इतके पाणी पिणे ही सामान्य गोष्ट नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल, तेव्हा फक्त एका प्रकरणात इतके पाणी पिऊ शकते.
दरम्यान, आम्ही अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, जो दररोज १० लिटर पाणी पितो. पण, त्या व्यक्तीच्या वैद्यकीय तपासात डॉक्टरांचा समज बदलला. जोनाथन नावाच्या ४१ वर्षांच्या व्यक्तीला खूप तहान लागत होती. त्यामुळे तो दररोज १० लिटर पाणी पित होता. डॉक्टरांना वाटले की, जोनाथन यांना मधुमेह असेल. मात्र वैद्यकीय तपासणीत त्यांच्यामध्ये मधुमेह आहे, अशी कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. त्यामुळे डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले की, दररोज १० लिटर पाणी पिण्याचे कारण काय असू शकते?
डोळ्यांच्या तपासणीत समोर आलं निदान
डोळ्यांमध्ये समस्या निर्माण झाल्यावर जोनाथन हे डॉक्टरांकडे गेले. तपासणीत त्यांच्या डोळ्यात एक गाठ दिसली. त्याचा एमआरआय केला असता त्यांच्या पिट्युटरी ग्लँडजवळ ब्रेन ट्यूमर असल्याचे आढळून आले. ही ग्लँड मानवी भावना नियंत्रित करते. पण त्यांच्या पिट्युटरी ग्लँडजवळ गाठ असल्याने ते काम करणे बंद झाले आणि त्यांना नेहमी तहान लागत होती. त्यामुळे ते रोजच्या गरजेपेक्षा पाचपट जास्त पाणी पित होते.
रेडिओथेरपी ३० वेळा केली
डॉक्टरांनी ट्यूमरची माहिती देताच मला धक्का बसला, असे जोनाथन यांनी डेली मेलला सांगितले. अखेर त्यांच्यावर उपचार सुरू झाले. त्यांची रेडिओथेरपी ३० वेळा करण्यात आली. प्रदीर्घ उपचारानंतर अखेर त्यांची ब्रेन ट्युमरपासून मुक्तता झाली. उपचारापूर्वी ते धावू शकत नव्हते, मात्र आता त्यांचे वजन नियंत्रणात आल्याची माहिती त्यांनी दिली.