दिवसाला सिगारेटचं एक पाकिट पित होता, घशात वाढलेले केस पाहून डॉक्टर हैराण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 02:53 PM2024-06-27T14:53:33+5:302024-06-27T14:54:22+5:30
स्मोकिंग केल्याने काय होतं याचं एक धक्कादायक उदाहरण ऑस्ट्रियामधून समोर आलं आहे. येथील ५२ वर्षीय व्यक्ती रोज एक पॅकेट सिगारेट ओढत होता.
स्मोकिंग केल्याने फुप्फुसांचं आणि हृदयाचं किती नुकसान होतं हे सिगारेटच्या पाकिटावरच लिहिलेलं असतं. पण तरीही लोकांना स्मोकिंगची अशी सवय लागलेली असते की, ते पाकिटावरील सूचना किंवा फोटोकडे दुर्लक्ष करतात. स्मोकिंग केल्याने काय होतं याचं एक धक्कादायक उदाहरण ऑस्ट्रियामधून समोर आलं आहे. येथील ५२ वर्षीय व्यक्ती रोज एक पॅकेट सिगारेट ओढत होता.
या व्यक्तीला रोज एक पॅकेट सिगारेट प्यायल्याने एक दुर्मिळ आजार झाला. त्याच्या घशात केस उगवले आहेत. ही व्यक्ती सतत खोकला, कर्कश आवाज आणि श्वास घेण्यास समस्या असल्याने हॉस्पिटलमध्ये गेली होती. तेव्हा डॉक्टरांना जे दिसलं ते पाहून ते अवाक् झाले. असं सांगण्यात आलं की, व्यक्तीच्या घशात छोटे छोटे केस उगवले होते. एका चुकीच्या सवयीमुळे असं झालं होतं.
अमेरिकन जर्नल ऑफ केसमध्ये प्रकाशित या स्थितीबाबत सांगण्यात आलं की, जास्त काळ स्मोकिंग केल्याने ही समस्या झाली. फार जास्त स्मोकिंग करणाऱ्या या व्यक्तीला पहिल्यांदा २००७ मध्ये कर्कश आवाज, श्वास घेण्यास अडचण आणि सतत खोकला येत होता. त्यानंतर तो डॉक्टरांकडे गेला. ब्रोंकोस्कोपी टेस्ट दरम्यान डॉक्टरांना आढळलं की, त्याच्या घशात सूज आहे आणि घशात केसही आहेत. खासकरून त्या ठिकाणी जिथे बालपणी सर्जरी करण्यात आली होती.
आधी झाली होती सर्जरी
१० वर्षाचा असताना या व्यक्तीवर ट्रेकियोस्टॉमी करण्यात आली होती. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात त्याच्या श्वासनलिकेत एक छिद्र करण्यात आलं होतं. त्याच्या कानापासून घेतलेली त्वचा घेऊन हे छिद्र बंद करण्यात आलं होतं.
डॉक्टरांना त्याच्या घशात वाढत असलेले केस दिसले. ही एक असामान्य स्थिती होती. केस नऊ ते दहा असे होते आणि लांबी २ इंच होती. ते व्हॉइस बॉक्समधून तोंडातही पोहोचत होते. हे केस काढण्यासाठी त्याला १४ वर्ष सतत हॉस्पिटलमध्ये जावं लागत होतं. केस कमी जास्त वाढतच होते.
स्मोकिंग सोडल्याने झाले उपचार
२०२२ मध्ये या व्यक्तीसाठी गोष्टी सुखकर झाल्या. त्याने एक मोठा निर्णय घेतला आणि त्याने सिगारेट पिणं सोडलं. या सकारात्मक बदलामुळे डॉक्टरांना एंडोस्कोपिक आर्गन प्लाज्मा कोगुलेशन नावाची एक नवीन प्रक्रिया करायला मिळाली. या गोष्टीने केसांची मुळापासून वाढ थांबली.