Snoring side effects: माणूस घोरतो, म्हणजे नेमके काय होते? जाणून घ्या गंभीर साईड इफेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 09:47 AM2021-08-27T09:47:22+5:302021-08-27T09:48:35+5:30

snoring is Harmful for health: ‘प्रचंड घोरणे’ म्हणजे ७० डेसिबलच्या पुढचा आवाज! या कंपनांचा परिणाम गळ्याच्या आजूबाजूच्या अवयवांवर होतो.

Man snoring means what exactly happens? know side effect of snoring | Snoring side effects: माणूस घोरतो, म्हणजे नेमके काय होते? जाणून घ्या गंभीर साईड इफेक्ट

Snoring side effects: माणूस घोरतो, म्हणजे नेमके काय होते? जाणून घ्या गंभीर साईड इफेक्ट

googlenewsNext

- डॉ. अभिजित देशपांडे, 
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्लीप सायन्सेस 
iissreports@gmail.com

घोरणे म्हणजे घशाच्या नलिकेचे कंपन (व्हायब्रेशन) हे मागील लेखात सांगितलेले आहेच. ‘प्रचंड घोरणे’ म्हणजे ७० डेसिबलच्या पुढचा आवाज! या कंपनांचा परिणाम गळ्याच्या आजूबाजूच्या अवयवांवर होतो. आपल्या मेंदूला रक्तपुरवठा करण्याच्या दोन प्रमुख रक्तवाहिन्या (कॅरॉटीड आर्टरीज) या अगदी घशाच्या शेजारीच असतात.  रक्तवाहिन्यांचे आतले अस्तर  हे नाजूक आणि गुळगुळीत असते. त्यामुळे हृदयापासून मेंदूपर्यंत रक्ताचा प्रवाह सुरळीतपणे पोहोचतो. कुठल्याही कारणाने हे अस्तर  खडबडीत झाले तर प्रवाहाला अटकाव होतो आणि त्या ठिकाणी ‘कोलेस्टेरॉल’सारखे पदार्थ साचायला सुरुवात होते. रक्तवाहिन्यांचा लवचीकपणा कमी होऊन काठिण्य वाढते. या सगळ्या प्रकियेला ‘अथेरोस्वलेरोसीस’ म्हणतात. 

२०११ साली सिडनी ऑस्ट्रेलिया येथील शास्त्रज्ञांनी व्हायब्रेशन  आणि ‘अथेरोस्वलेरोसीस’ यांचा प्रत्यक्ष संबंध दाखवला. यात त्यांनी सशाच्या कॅरोटीड आर्टरींचा वापर केला. फक्त सहा तासांच्या कंपनानंतर आतील अस्तर फरक दाखवू लागले! याच संशोधकांनी २००८ साली मानवांमध्येदेखील घोरण्याची पातळी आणि अथेरोस्वलेरोसीसचा संबंध दाखवला. मंद घोरणाऱ्यामध्ये सरासरी २० टक्के, मध्यम घोरणाऱ्यामध्ये ३३ टक्के तर प्रचंड घोरणाऱ्यामध्ये ६४ टक्के  अथेरोस्वलेरोसीसचे प्रमाण वाढते, असे या पाहणीत आढळले! रक्तप्रवाहात अडथळे निर्माण झाले की मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो. आपण आडवे पडल्याच्या स्थितीमधून उठून बसलो अथवा उभे राहिलो की गुरुत्वाकर्षणाने रक्तप्रवाह स्वाभाविक पायांकडे वळतो. यामुळे मेंदूला कमी पुरवठा होण्याची शक्यता निर्माण होते. हे टाळण्यासाठी एक चोख व्यवस्था निसर्गाने केलेली आहे त्याला बॅरोरिसेप्टर व्यवस्था असे म्हणतात. उभे राहिल्यावर एका क्षणार्धात मेंदूचा रक्तपुरवठा सुरळीत करण्याचे काम हे बॅरोरिसेप्टर करतात.

घोरण्यामुळे या बॅरोरिसेप्टरच्या कार्यावर परिणाम होतो, मेंदूच्या रक्तपुरवठ्यावर परिणाम होतो. शिवाय बॅरोरिसेप्टरचे काम मंदावल्याने “दुष्काळात तेरावा महिना” अशी परिस्थिती उद्भवते. याची परिणती स्मरणशक्ती कमी होणे, विचार करण्याची क्षमता मंदावणे आदींमध्ये होते. दुर्दैवाने पक्षाघातासारखा भयंकर परिणाम भोगण्याची वेळही येऊ शकते.
 

Web Title: Man snoring means what exactly happens? know side effect of snoring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य