भारतीय प्रजातीचा बहुगुणी पाडळ वृक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 01:25 PM2018-09-25T13:25:02+5:302018-09-25T13:28:08+5:30
शरीरात दुषित पित्त साचते तेव्हा फुलांचे चूर्ण देतात. किंवा फळाचे चूर्णसुद्धा औषध म्हणून वापरल्यास आराम मिळतो. पित्त विकारात पानांचा रसात सुंठ पूड आणि साखर घालून घेण्याची प्रथा आहे. मुतखड्यात पंचाग म्हणजे पाडळ वृक्षांचे मूळ साल, पान, फुल, फळ जाळून सार बनवितात.
पाडळ हा भारतीय प्रजातीचा उंच वाढणारा बहुगुणी वृक्ष आहे. या वृक्षाच्या तीन प्रजाती आहेत. औषधात तांबड्या गुलाबी फुलांच्या वृक्षांच्या साल, मुळ, पानांचा उपयोग केला जातो. शेंगा लांब, गोलाकार असतात. त्यात बारीक उडून जाणारे पंखयुक्त बीया असतात. पाडळची फुले पाण्यात ठेवल्यास पाण्यालासुद्धा सुगंध येतो. फुलांचा मोहक सुगंध तांबडा रंग आणि मधयुक्त असल्यामुळे मधमाशा, भुंगे, किटक त्याकडे आकर्षित होतात. मधमाशापालनासाठी या वृक्षांची लागवड पुरक ठरते. . पाडळच्या मुळांचा उपयोग दशमूळ नावाच्या औषधात जास्त प्रमाणात केला जातो. पाडळच्या फुलांचा गुलकंद बनवितात. हा गुलकंद अतिशय पौष्टिक असतो. अशक्तपणात गुलकंद उत्तम उपयोगी औषध आहे. शरीरात दुषित पित्त साचते तेव्हा फुलांचे चूर्ण देतात. किंवा फळाचे चूर्णसुद्धा औषध म्हणून वापरल्यास आराम मिळतो. पित्त विकारात पानांचा रसात सुंठ पूड आणि साखर घालून घेण्याची प्रथा आहे. मुतखड्यात पंचाग म्हणजे पाडळ वृक्षांचे मूळ साल, पान, फुल, फळ जाळून सार बनवितात. कॉलरामुळे अतिसारात पोटात दुखावा होतो अशावेळी पाडलाची मूळ पाण्यात घासून पाजावे. पंचागांचा सार मधुमेहात सुद्धा उपयोगी ठरतो. औषधी वापर करण्यापुर्वी वैद्यांचा सल्ला अवश्य घ्यावा
रक्तपित्तात तसेच हृदयरोगावर पाडळची फुले वापरतात. मुर्छा रोगात फुलांचा रस मधात घालून चाटण दिले जाते. शरीरात व्रण पडून घाव होतात. अशावेळी पानांचा लेप करतात. जनावरांच्या जखमासुद्धा या लेपाने कोरड्या होतात. त्वचारोगातदेखील पाडळ वृक्ष उपयोगी आहे. त्वचारोगात पाडळाची साल तेलात उगाळून तेल गाळून त्वचारोगावर वापरतात. लहान मुलांच्या पोटदुखीत पाडळाचे मूळ पाण्यात घासून सागरगोटा घासून हे मिश्रण पोटातून देतात. फुरसा सर्पाच्या विषावर पाडल वृक्षाचे मूळ घासून पाजतात. वात विकारात पाडळ मुळाचा काढा करून या काढ्याबरोबर थोडे सुंठ पावडर घालून सेवन केल्यास वात कमी होतो. मुर्छा येते तेव्हा फुलांचा रस किंवा कोरडे फुले असतील तर चूर्ण मधात घालून चाटतात. पाडळ हा वृक्ष अत्यंत दुर्मिळ झाला आहे. पाडळ हा पानगळी वृक्ष असून या वृक्षाच्या संवर्धनासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. पाडळाच्या बियांपासून अधिकाधिक रोपनिर्मिती झाल्यास या वृक्षाची संख्या शहरालगतच्या जंगलांमध्ये वाढू शकते. हा वृक्ष मोकळ्या जागेत, उद्यानात सहज लावणे शक्य आहे