बत्तीशीच आली संकटात, अनेकांना येतात केवळ २८ दात; अक्कलदाढ विलुप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 06:43 AM2022-04-26T06:43:38+5:302022-04-26T06:43:54+5:30
प्रा. चतुर्वेदी यांच्या अभ्यासानुसार, गेल्या २० वर्षांमध्ये त्यांच्या ओपीडीमध्ये येणाऱ्या २५ टक्के तरुणांचे २८ दात निघत आहेत.
वाराणसी: बत्तीशी दाखवू नकाे, असे अनेकदा बाेलले जाते. मित्रमंडळीमध्ये काेणी चिडविले तर हे वाक्य हमखास कानी पडते; पण ही बत्तीसीच आता संकटात आली आहे. तुम्ही म्हणाल कसं? तर २१ व्या शतकात जन्म घेणाऱ्या अनेकांना पूर्ण ३२ दात येतच नाहीत. अक्कल दाढ गायब हाेण्याचे प्रमाण वाढत असून, अनेकांना २८ दात येत आहेत. वाराणसीतील काशी हिंदू विद्यापीठाचे दंतविज्ञान शाखेचे वरिष्ठ दंतचिकित्सक प्रा. टी. पी. चतुर्वेदी यांनी केलेल्या अभ्यासातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. प्रा. चतुर्वेदी यांच्या अभ्यासानुसार, गेल्या २० वर्षांमध्ये त्यांच्या ओपीडीमध्ये येणाऱ्या २५ टक्के तरुणांचे २८ दात निघत आहेत.
‘थर्ड मोलर’...
साधारणत: १८ ते २५ वर्षांपर्यंत चारही अक्कलदाढा निघतात. जबड्याच्या आत मागील भागामध्ये अक्कलदाढ असते. अक्कलदाढेला दंतचिकित्सिय भाषेत ‘थर्ड माेलर’ दात म्हणतात.
बदललेल्या सवयी कारणीभूत
ही समस्या शहरी भागातील तरुणांमध्ये जास्त दिसत आहे. यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे बदललेल्या खाण्याच्या सवयी. मुलांमध्ये दातांनी कडक खाद्यपदार्थ खाणे कमी झाले आहे. भाजलेले चणे, मक्याचे कणीस, उस इत्यादी खाणे बंदच झाले आहे.
जबड्याचा आकार लहान झाला
कमी चाचण्यामुळे जबड्याचा आकार लहान झाला आहे. त्यामुळे अक्कलदाढ बाहेर येण्यासाठी जागाच राहिलेली नाही, असे प्रा. चतुर्वेदी सांगतात.
चावण्यामध्येही अडचणी
अन्नाचे तुकडे करण्यासाठी समाेरच्या भागात २० दात असतात. तर अन्न चावण्यासाठी १२ दात असतात, ज्यांना आपण दाढ म्हणताे. गेल्या काही वर्षांमध्ये या दाढांची संख्याही ८ वर आली आहे. त्यामुळे लाेकांना अन्न चावण्यामध्येही अडचणी निर्माण हाेत आहेत.
अक्कलदाढ हाेणार विलुप्त
मानवाच्या उत्क्रांतीमध्ये काही अवयव विलुप्त झाले. त्याचप्रमाणे पुढील काही शतकांमध्ये अक्कलदाढदेखील अशाच प्रकारे अवशेषी अवयव बनून राहील. या अवयवांचा काहीही उपयाेग राहणार नाही.