मराठी चित्रपट सध्या यशोशिखरावर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2016 02:18 PM2016-04-23T14:18:41+5:302016-04-23T19:50:10+5:30
करण मिश्रा : दाक्षिणात्य चित्रपटांनाही टाकले मागे
जळगाव : सध्या मराठी चित्रपट सृष्टी एका उंचीवर असून तयार होणाऱ्या वैचारिक चित्रपटांमुळे मराठी चित्रपट यशोशिखर गाठत आहे. या चित्रपटांनी दाक्षिणात्य चित्रपटांनाही मागे टाकले आहे, असे हिंदी चित्रपट अभिनेता तथा मॉडेल करण मिश्रा यांनी सांगितले.
जळगावात एका कार्यक्रमासाठी करण आलेले असताना त्यांच्याशी ‘लोकमत’ने बातचित केली. त्यावेळी त्यांच्याशी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात झालेला हा संवाद....
प्रश्न- या क्षेत्रात संधी कशी मिळाली?
करण- एका कंपनीच्या जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी ऐनवेळेवर संबंधित मॉडेल आला नाही, त्यावेळी मला त्या ठिकाणी बोलविण्यात आले व तेथून माझ्या या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर हळूहळू मालिका व चित्रपटात काम सुरू झाले.
प्रश्न- पहिला चित्रपट कोणता?
करण- २०१३ मध्ये सलीम रजा दिग्दर्शित वॉण्टेड हा माझा पहिला चित्रपट आला. त्यामध्ये सर्व कलाकार नवीन होते.
प्रश्न- उत्तम आरोग्यासाठी काय सांगाल?
करण- आहार महत्त्वाचा असून सोबतच खेळ आणि धावणे नित्याचे ठेवले पाहिजे. सोबतच दररोज सकाळी उठल्याबरोबर दोन चमचे आवळा रस व कोमट पाणी मीदेखील घेतो व ते सर्वांनी घ्यावे.
प्रश्न- अभिनेत्यांनी गुटखा, मद्य यांच्या जाहिराती करणे योग्य आहे का?
करण- या जाहिराती अभिनेत्यांनी करणे चुकीचेच आहे. कारण आजची तरुण पिढी त्यांना जास्त फॉलो करते.
प्रश्न- चांगल्या चित्रपटांसाठी काय व्हावे, असे तुम्हाला वाटते?
करण- दर्जेदार चित्रपटांवर अधिक भर दिला पाहिजे. कथेवर लक्ष देऊन, विशेष मेहनत घेतल्यास हिंदी चित्रपटही हॉलिवूडला तोड देऊ लागले आहे. निर्मात्यांनी सामाजिक भानदेखील ठेवले पाहिजे.
प्रश्न- नवीन कलाकारांना काय संदेश द्याल?
करण- तरुणांनी अगोदर आपल्या शिक्षणावर लक्ष दिले पाहिजे. कोठेही अपयश आले तर आपल्याला शिक्षणाचीच पदवी कामा येऊ शकते. त्यानंतर आरोग्याची विशेष काळजी घ्या. चित्रपट सृष्टीत येण्याच्या मोहात थेट तेथे पोहचण्यापेक्षा अगोदर स्थानिक पातळीवर कला सादर करा.