मॅटर्निटी इन्श्युरन्सपण असतो; पण तो करताना काय लक्षात ठेवाल?
By Admin | Published: May 24, 2017 05:07 PM2017-05-24T17:07:55+5:302017-05-24T18:22:48+5:30
गरोदरपण, बाळांतपणासाठीचा विमा घेताय, या ६ गोष्टी माहिती आहेत का?
- निशांत महाजन
मेडिकल इन्श्युरन्स ही आपल्या दैनंदिन गरजेची गोष्ट बनली. इन्श्युरन्स नाही आणि आजारपणाचा खर्च मोठा ही अवस्था वाईट. पण म्हणूनच अनेकांना प्रश्न पडतो की गरोदरपणात आई आणि बाळाचा असा तेवढ्यापुरता इन्श्युरन्स करता येतो का? तर येतो. मात्र अजूनही अज्ञान असं की, असा काही इन्श्युरन्स असतो हेच अनेकांना माहिती नसतं. आणि ज्यांच्यापर्यंत एजण्ट ही माहिती आणतात तेव्हा अनेकदा अतीसामान्य चूकांमुळे ऐनवेळेस क्लेम मिळण्यात काही अडचणी येवू शकतात. त्यामुळे मॅटर्निटी इन्श्युरन्स करताना काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात. आणि काळजीपूर्वक करायला हव्यात.
मुख्य म्हणजे पूर्वी कुठं करत बाळंतपणात इन्श्युरन्स, आता कशाला हवेत असे काही चोचले असं मनात आणून नका. कारण आताच्या काळात बाळंतपण, त्यासाठीचा खर्च,लाइफस्टाईल डिसीज हे सारं वाढत आहे. आणि हे सारे खर्च निभवायचे तर आपल्याला इन्श्युरन्स कव्हर असणं उत्तम. फक्त आपली फसवणूक होणार नाही हे मात्र तपासून घ्यायला हवे.
१) हॉस्पिटलचा सगळा खर्च
गरोदरपणात हॉस्पिटलचा अर्थात ओपीडीचा खर्च, त्यावेळचं औषधपाणी, पुढे बाळंतपण, गरज पडल्यास सिझेरिअन, त्यावेळची ट्रिटमेण्ट, औषधं हे सारं या इन्श्युरन्समध्ये कव्हर झालं पाहिजे. ते होतंय ना, हे पहा.
२) प्री-पोस्ट हॉस्पिटलायझेशन
बाळंपणाआधीचा खर्च तर कव्हर व्हायला हवाच, पण बाळंपणानंतर पुढच्या ६० दिवसापर्यंतचा खर्चही त्या विम्यात कव्हर असणं आवश्यक आहे.
३) न्यू बॉर्न बेबी कव्हर
बाळ जन्माला आल्याच्या पहिल्या दिवसापासून ते ९० दिवसापर्यंत बाळाचं हॉस्पिटलायझेशन, अन्य सर्व आजार यासाठीचं कव्हर विम्यात असणं आवश्यक आहे.
४) अॅम्ब्युलन्सचा खर्च
अम्ब्युलन्सचा खर्च या विम्यात कव्हर होणं आवश्यक आहे. गोष्ट छोटी वाटत असली तरी ते चेक करुन घ्याच.
५) आयुष ट्रिटमेण्ट
गरोदरपणात आणि बाळंतपणातही अनेकजणी आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध, होमिओपथी उपचार घेतात. म्हणजे आयुष मंत्रालयांतर्गत येणाऱ्या सेवांनाही हे कव्हर असणं आवश्यक आहे. हे पाहतानाही कव्हरचं सबलिमिट पाहणं आवश्यक आहे.
६) आॅनलाइन जा, एजण्ट कशाला?
कुणीतरी एजण्ट घरी येणार, आपण त्याच्याकडून पॉलिसी घेणार असं करू नका. त्यापेक्षा आॅनलाइन जा, विम्याच्या अनेक योजना दिसतील, त्यांचा अभ्यास करा, माहिती घ्या. आणि मग विमा घ्या.