मातृत्व लाभलेल्या महिलांना मिळतं निरोगी दीर्घायुष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 05:40 PM2017-11-02T17:40:52+5:302017-11-02T17:41:39+5:30
वंध्यत्व असलेल्या महिलांना तुलनेनं मिळतं कमी आयुष्य
- मयूर पठाडे
घरात मूल असलं की आपोआपच ते घर किती हसरं, खेळतं आणि आनंदी दिसायला लागतं. त्या घरातल्या महिलेला तर अक्षरश: आभाळच ठेंगणं झालेलं असतं. त्यातही त्या घरातलं जर ते पहिलंच मूल असेल तर मग त्याच्या कोडकौतुकाला पारावारच राहात नाही. मूल असल्याशिवाय, मातृत्वाशिवाय कोणत्याही महिलेला पूर्णत्व येत नाही, असं म्हटलं जातं, त्यातल्या खरेखोटेपणा आणि वादातही आपल्याला शिरायचं नाही, पण ज्या घरांत मूल असतं ते घर इतर घरांपेक्षा नक्कीच वेगळं दिसतं, असतं याविषयी दुमत असू नये.
घरात मूल असणं किती आनंददायी आणि आवश्यक असतं, यावर शास्त्रज्ञांनीही आता शिक्कामोर्तब केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या महिलांना मूल नाही किंवा ज्यांना वंध्यत्व आहे, अशा महिलांपेक्षा ज्यांना मूल आहे अशा महिलांचं आयुष्य जास्त असतं. त्यांच्या आयुष्याची दोरी अधिक बळकट होते. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मूल झाल्यावर स्त्रीच्या शरीर-मनांत अनेक बदल होतात आणि स्त्री अधिक आनंदी होते, एक नवी ऊर्जा निसर्गत:च तिच्यात निर्माण होते. ही ऊर्जाच मूल असणाºया महिलांना एक नवं आयुष्य मिळवून देते. त्याचाच परिणाम म्हणून त्यांच्या आयुष्यमानातही वाढ होते.
अमेरिकेतील अमेरिकन सोसायटी आॅफ रिज्युनेटिव्ह मेडिसिनच्या (एएसआरएम) वार्षिक सभेत नुकताच हा अभ्यास मांडण्यात आला. त्यात म्हटलं आहे की ज्या महिलांना मूल नाही किंवा ज्यांना वंध्यत्व आहे अशा महिलांना तुलनेनं लवकर मृत्यू येण्याचं प्रमाण तब्बल ४५ टक्के आहे. त्यातील अनेकींना ब्रेस्ट कॅन्सरमुळे मृत्यू येतो असं त्यांचं निरीक्षण आहे.
केवळ मुलांना वाढवण्यातच नव्हे, तर कुठल्याही आव्हानांना तोंड देण्यात माता नेहमीच अग्रेसर असते ते बहुदा यामुळेच.