पुरुष सौंदर्याची बाजारपेठ ९४२८९०७५०००००₹

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 08:52 AM2023-07-25T08:52:41+5:302023-07-25T08:53:19+5:30

बाथरूममध्ये गेल्यावर पुरुषांच्या बाजूला फक्त एक कंगवा आणि बायकांच्या बाजूला सौंदर्य प्रसाधनांच्या किती बाटल्या असतात याबद्दलही अनेक विनोद केले जातात. 

Men's Beauty Market 9428907500000 ₹ | पुरुष सौंदर्याची बाजारपेठ ९४२८९०७५०००००₹

पुरुष सौंदर्याची बाजारपेठ ९४२८९०७५०००००₹

googlenewsNext

गावाला जाताना महिलांचा टॉयलेट पाउच किंवा व्हॅनिटी किती जागा अडवते आणि त्यामानाने पुरुषांना कसं कमी सामान लागतं आणि तरीही पुरुषांनाच महिलांचं सामान उचलावं लागतं याबद्दलचे विनोद वर्षानुवर्षं आणि पिढ्यानपिढ्या सांगितले जाताहेत. त्यातही बाथरूममध्ये गेल्यावर पुरुषांच्या बाजूला फक्त एक कंगवा आणि बायकांच्या बाजूला सौंदर्य प्रसाधनांच्या किती बाटल्या असतात याबद्दलही अनेक विनोद केले जातात. 

अर्थात विरुद्ध बाजूला अशीही मांडणी केली जाते, की एखादी मुलगी दिसायला सामान्य असेल तर तिला सौंदर्यप्रसाधनं, मेकअप, फॅशन याचा तरी आधार असतो, पण सामान्य दिसणाऱ्या मुलांना मात्र तेवढाही दिलासा नसतो, त्यांना बिचाऱ्यांना आहे तेच रूप आयुष्यभर वागवावं लागतं. या प्रकारच्या तथाकथित विनोदांमधून ‘दिसणं’ या प्रकाराला जगातल्या सर्व समाजांमध्ये असणारं अवास्तव महत्व अधोरेखित होतं. चारही बाजूंनी अशी परिस्थिती असेल, तर जी माणसं जात्याच दिसायला फार देखणी नाहीत त्यांना त्यांच्या दिसण्याचा किती न्यूनगंड येत असेल याची कोणीही सहज कल्पना करू शकतं.

इतकी वर्षं बहुतांश प्रमाणात फक्त स्त्रियाच या न्यूनगंडाची शिकार होत होत्या. मात्र, बदलत्या काळानुसार पुरुषांनाही यशस्वी होण्यासाठी चांगलं दिसलं पाहिजे याचं दडपण येऊ लागलं आणि या वाटण्याचा फायदा बाजारपेठेने करून घेतला नसता तरच आश्चर्य आहे. पुरुषांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या त्यांच्या दिसण्याबद्दलच्या जागरूकतेमुळे किंवा या न्यूनगंडामुळे जगभरात पुरुषांसाठीच्या सौंदर्यप्रसाधनांची बाजारपेठ दिवसेंदिवस वाढते आहे.

स्टॅटिस्टा या मार्केट इन्साईट कंपनीने यावर्षी गोळा केलेल्या आकडेवारीनुसार २०२२ साली पुरुषांसाठीच्या प्रसाधनांची जागतिक बाजारपेठ होती ८० बिलियन डॉलर्सची. त्याआधी २०२१ साली हीच बाजारपेठ होती ७४.८ बिलियन डॉलर्सची. पुरुष सौंदर्याची हीच बाजारपेठ २०२८ सालापर्यंत ११५ बिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे साडेनऊ लाख कोटी रुपये (९४२८९०७५०००००) इतकी मोठी होईल, असा अंदाज आहे. ही बाजारपेठ आणखी किती वाढेल याचा रुपयांमध्ये अंदाज करणंदेखील कठीण आहे. संपूर्ण जगात पुरुषांसाठीच्या प्रसाधनांची होणारी उलाढाल इतकी प्रचंड आहे आणि तरीही ती महिलांच्या तुलनेने फारच कमी आहे.

आजघडीला जगातल्या लोकसंख्येचा विचार केला तर पुरुषांची संख्या ५२ टक्के आहे. आणि एकूण सौंदर्यप्रसाधनांच्या बाजारपेठेचा विचार केला, तर आज पुरुषांच्या प्रसाधनांची बाजारपेठ एकूण बाजारपेठेच्या केवळ ११ टक्के आहे. पुरुषांच्या प्रसाधनातील इमामी या मोठ्या ब्रँडच्या विक्रीत गेल्या तीन महिन्यांत २९ टक्के इतकी मोठी वाढ दिसून आलेली आहे. द मॅन कंपनी, नायका मेन यासारख्या इतर मोठ्या कंपन्यांमध्येही हेच बघायला मिळतं आहे.

अर्थात हा बदल घडून येण्यामागे पुरुषांची स्वतःची काळजी घेण्याबद्दल वाढलेली जागरूकता हे जसं कारण आहे, तसंच टिपिकल ‘पुरुषीपणा’भोवतीचं वलय थोड्या प्रमाणात का होईना कमी होणं हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. राकट, रांगडा, ओबडधोबड पुरुष म्हणजेच आयडियल पुरुष ही कल्पना मागे पडून हल्ली ज्याला मेट्रोसेक्शुअल म्हणतात तसा पुरुषही आकर्षक असू शकतो या विचाराने गेल्या एक दीड दशकापासून जोर धरला. त्यामुळे मग फॅशनचा सेन्स असलेला, उत्तम रंगसंगतीचे कपडे घालणारा, स्वतःच्या त्वचेची, नखांची, दातांची योग्य ती निगा राखणारा, चांगला हेअरकट केलेला पुरुष हादेखील देखणा आणि आकर्षक असतो असं समाजमन हळूहळू तयार होत गेलं. तसे नायक सिनेमांमध्ये, मालिकांमध्ये दिसू लागले आणि मग हळूहळू या बाजारपेठेने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली.

सगळ्या पुरुषांना एकाच प्रकारच्या उत्पादनाची गरज असते हे पूर्वी गृहीतक होतं. त्यातही सगळ्या वस्तूंचं पॅकिंग काळं किंवा ग्रे किंवा फार तर निळं. सगळ्याचे सुवास उग्र आणि ठरलेले. सगळ्याची जाहिरातही ‘पुरुषांच्या रुक्ष त्वचेला, केसांना योग्य’ अशीच होती. त्यातून पुरुषांना आपण वापरतोय ते उत्पादन ‘बायकी नाही’ एवढंच समाधान मुख्यतः मिळत असावं; पण आता मात्र चित्र फारच बदललेलं दिसतं आहे.

चेष्टेच्या जागी आता पुरुषांचं कौतुक! 

पुरुषांमध्ये स्वतःच्या दिसण्याबद्दल जागरूकता वाढलेली आहे, त्यांच्यासाठीची उत्पादनं कधी नव्हे ती अतिशय वेगाने बाजारात येताहेत. स्वतःची उत्तम निगा राखणाऱ्या पुरुषांची कोणे एके काळी झालीच तर चेष्टाच व्हायची. त्याजागी आता त्यांचं कौतुक होऊ लागलंय. एकूणात स्वतःची निगा राखण्यासाठी आणि प्रयत्नपूर्वक छान दिसण्यासाठी पुरुषांसाठी कधी नव्हतं इतकं अनुकूल वातावरण आज तयार होतं आहे. 
    

Web Title: Men's Beauty Market 9428907500000 ₹

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.