आधीच कोरोनामुळे लॉकडाऊन; घरी बसून लोक होत आहेत 'या' गंभीर आजारांचे शिकार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 02:33 PM2020-04-23T14:33:20+5:302020-04-23T14:41:14+5:30
घरच्याघरी सुद्धा आजारांनी लोकांना आपल्या जाळ्यात अडकवायला सुरूवात केली आहे.
कोरोनामुळे जगभरात हाहाकार निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या जगभरात वाढत आहे. लोकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनापासून लोकांचा बचाव होत असला तरीसुद्धा अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. घरच्याघरी सुद्धा आजारांनी लोकांना आपल्या जाळ्यात अडकवायला सुरूवात केली आहे. मानसिक स्वरूपाचे आजार मोठ्या प्रमाणावर उद्भवल्याचं दिसून आलं आहे.
इंडीयन सायकेट्रीक सोसायटीने याबाबत सर्वेक्षण केलं. या दिवसांमध्ये डिप्रेशनच्या प्रकरणांमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जवळपास २०० दशलक्षपेक्षा जास्त भारतीय मानसिक आजारांशी संबंधित कोणत्या ना कोणत्या समस्येला सामोरं जात आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे लोक आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहेत. अशाच काही घटनांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
दिल्लीतील सरकारी रुग्णालयात कोरोना संशयिताने घाबरून सातव्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला. सध्या परिस्थिती इतकी गंभीर आहे की, लोकांना सर्दी-खोकला झाला तरी भीती वाटू लागली आहे. पश्चिम बंगालमध्ये लॉकडाऊनच्या पाचव्या दिवशी एकटेपणामुळे एका तरुणाने आत्महत्या केली. इतकंच नाही तर कोरोनाच्या भीतीने पंजाबमध्ये पती-पत्नीने स्वतःला संपवलं.
द लँसेटने यांनी प्रकाशित केलेल्या रिसर्चनुसार क्वारंटाइनमध्ये राहिल्याने मानसिक आरोग्यावर जो परिणाम होत आहे तो दीर्घकाळपर्यंत राहू शकतो. डिप्रेशनशिवाय पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसॉर्डर देखील होऊ शकतं. युनिव्हरसिटी ऑफ सेफिल्ड आणि अलस्टर युनिव्हरसिटीने अलिकडे २०० लोकांवर रिसर्च केला होता.
यात लोकांची मानसिक स्थिती कशाप्रकारे बदलते याचा अभ्यास करण्यात आला होता. या रिसर्चमध्ये सहभागी असलेल्या ९६ टक्के लोकांनी सांगितलं की, रात्री झोपेतून जागे झाल्यानंतरही ते साबणाने हात धुतात. ७० टक्क्यापेक्षा जास्त लोक म्हणाले की, टॉयलेट पेपरपासून अनेक गोष्टींची जास्तीची खरेदी केली आहे.