Microplastics In Human Blood: ज्याची भीती होती तेच झाले! वैज्ञानिक हादरले; रक्तात पहिल्यांदाच सापडले मायक्रोप्लॅस्टिक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 10:49 AM2022-03-25T10:49:15+5:302022-03-25T10:49:59+5:30
Microplastics In Human Blood: रक्तामध्ये घनता वाढविण्याचे काम कोलेस्ट्रॉल करत असते. यामुळे आपल्याला हार्ट अॅटॅकचा धोका असतो. याची कमी होती म्हणून की काय आता मानवी रक्तामध्ये प्लॅस्टिक सापडायला सुरुवात झाली आहे.
आपण प्लॅस्टिकचा वापर एवढा करतोय की आता रक्तातही प्लॅस्टिक सापडू लागले आहे. जगभरातील तज्ज्ञांनी अनेकदा आपल्याला प्लॅस्टिक बॉटलमधील पाणी पिऊ नका, प्लॅस्टिकच्या डब्यातील पदार्थ खाऊ नका असे अनेकदा बजावले होते. परंतू, तरीही आपण प्लॅस्टिकचा वापर थंड पदार्थांसाठीच नाही तर गरम पदार्थांसाठी देखील करत आहोत. आता ज्याची भीती होती, तेच झाले आहे. अवघे वैज्ञानिकांचे जग हादरले आहे.
रक्तामध्ये घनता वाढविण्याचे काम कोलेस्ट्रॉल करत असते. यामुळे आपल्याला हार्ट अॅटॅकचा धोका असतो. याची कमी होती म्हणून की काय आता मानवी रक्तामध्ये प्लॅस्टिक सापडायला सुरुवात झाली आहे. वैज्ञानिकांना संशोधनात ८० टक्के लोकांच्या रक्तात मायक्रोप्लास्टिक सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हे प्लॅस्टिक रक्तातून एका बाजूहून दुसऱ्या बाजूकडे जाऊ शकते. तसेच एका अंगाला कुठेही जमा होऊ शकते. यामुळे पॅरालिसीस, आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका कैकपटीने वाढला आहे.
यापेक्षाही खतरनाक बाब म्हणजे संशोधक एका गोष्टीवरून खूप चिंतेत पडले आहेत. या मायक्रोप्लॅस्टिकने प्रयोगशाळेत मानवी पेशींना नुकसान केल्याचे समोर आले आहे. हे प्लॅस्टिकचे कण हवेतूनही नाकावाटे शरीरात जातात. हवा प्रदुषणामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. प्लॅस्टिक कचऱ्यामुळे हे अतीसूक्ष्म प्लॅस्टिकचे कण देखील हवेत मिसळत आहेत. यामुळे हा धोका आणखी वाढला आहे.
हे मायक्रोप्लास्टिक जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट आणि सर्वात खोल समुद्रापर्यंत पोहोचले आहे. मानव आधीच अन्न, पाणी आणि श्वासाद्वारे लहान कण घेत आहेत. लहान मुले आणि प्रौढांच्या चेहऱ्यावर हे कण आढळून आले आहेत. शास्त्रज्ञांनी 22 अज्ञात रक्तदात्यांचे रक्त नमुने घेतले होते जे सर्व प्रौढ होते. यापैकी १७ नमुन्यांमध्ये प्लास्टिक आढळून आले आहे. यापैकी निम्म्या नमुन्यांमध्ये पेयाच्या बाटल्यांमध्ये वापरण्यात येणारे पीईटी प्लास्टिक आढळून आले. एक तृतीयांश लोकांमध्ये पॉलिस्टीरिन आढळून आले, ज्याचा वापर अन्न पॅकेजिंग आणि इतर उत्पादनांमध्ये केला जातो.
या संशोधनाबाबत प्रोफेसर डिक वेथक म्हणाले, 'आपल्या रक्तामध्ये पॉलिमेरिक कण आहेत हे पहिले संकेत आहेत. हा एक महत्त्वाचा शोध आहे. शास्त्रज्ञ आता हे संशोधन विस्तारण्याचा विचार करत आहेत.'