मायग्रेनचा त्रास होतो?-तुमची लाइफस्टाईल हा तर प्रॉब्लम नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 05:18 PM2017-09-07T17:18:43+5:302017-09-07T17:19:12+5:30
सरासरी 7 पैकी एका व्यक्तीस मायग्रेन होऊ शकतो, आणि त्याचा ट्रिगर आपल्या लाइफस्टाईलमध्येही असू शकतो.
-निशांत महाजन
मायग्रेनचा त्रास अनेकजणांना असतो. असह्य होते डोकेदुखी. त्यावर उपचार केले जातात. काही दिवस बरे गेले की पुन्हा त्रास सुरु. काहीजणांना मायग्रेनचा त्रास विशिष्ट काळातच होतो. या डोकेदुखीवर उपचार आहेतच पण सरासरी 7 पैकी एका व्यक्तीस मायग्रेनचा त्रास होत असतो. आणि त्याचा ट्रिगर त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये असतो असा अभ्यास अलिकडेच प्रसिद्ध झाला आहे.
डॉ. रिकाडरे डी कफ यांनी केलेल्या अभ्यासानुसार मायग्रेन होण्याची कारणं, मायग्रेन उसळण्याचे ट्रिगर बरेच आहेत. मात्र मायग्रेनचे मुख्य ट्रिगर्स हे मानसिक तणावाशी संबंधित आहेत, स्ट्रेसशी संबंधित आहेत असं दिसतं. त्यातही चिडचिड, अस्वस्थता, सततचे टेन्शन यानं मायग्रेन ट्रिगर होऊ शकतो. याशिवाय खूप कॉफी पिणं, डिहायड्रेशन, जेवण टाळणं किंवा अवेळी जेवणं, खूप गोड किंवा अती जंक खाणं यानंही मायग्रेन उसळू शकतो.
म्हणून लाइफस्टाईलशी संबंधित या गोष्टींकडे लक्ष द्या. मायग्रेन असेल तर नक्की द्या, नसेल तर होणार नाही म्हणून काळजी घ्या.
1) आपली जीवनशैली सांभाळा. आहार-विहार-झोप यांच्या वेळा शिस्तीत सांभाळा.
2) अती पेन किलर्स घेऊ नका.
3) रोज वेळेवरच जेवा. सतत जेवण टाळणं, किवा भूक मारणं, अपरात्री जेवणं, खूप वेळ उपाशी राहणं असं करू नका.
4) अती व्यसन करू नका.
5) स्ट्रेस, टेन्शन, मानसिक अस्वास्थ्य असेल तर समुपदेशन घ्या.
6) गरोदर महिलांना हा त्रास होऊ शकतो, त्याकाळी दुर्लक्ष करू नका.
7) पाळीच्या दिवसांत किंवा हार्मोन्सचं असंतुलन असेल तरीही मायग्रेनचा त्रास संभवतो.