पुरुषांच्या आरोग्यासंबधित 'हे' गैरसमज कुणालाही खरे वाटतात, पण सत्य आहे वेगळे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 06:25 PM2022-01-27T18:25:34+5:302022-01-27T18:27:10+5:30

पुरुषांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित असणारी अशीच काही मिथकं आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, जी पुरुषांवर लादली गेली आहेत. प्रत्यक्षात सत्य काही वेगळंच आहे.

misunderstandings about male health and nature | पुरुषांच्या आरोग्यासंबधित 'हे' गैरसमज कुणालाही खरे वाटतात, पण सत्य आहे वेगळे

पुरुषांच्या आरोग्यासंबधित 'हे' गैरसमज कुणालाही खरे वाटतात, पण सत्य आहे वेगळे

googlenewsNext

स्त्री आणि पुरुष (Men) दोघेही तणाव, चिंता (Anxiety), नैराश्याने ग्रस्त असतात. महिलांच्या तुलनेत पुरुष त्यांची मानसिक स्थिती इतरांसोबत शेअर करण्यास टाळाटाळ करतात. अनेक पुरुष त्यांच्या मनातील भावना आणि तणावाबाबत, त्या मागच्या कारणांबाबत उघडपणे बोलत नाहीत. कारण आजही पुरुषांनी आपल्या भावना व्यक्त करणं समाजात निषिद्ध (Taboo) मानलं जातं. ओन्ली माय हेल्थ वेबसाईटच्या मते, कोरोना महामारीच्या काळात अशा मानसिक आरोग्याच्या (Mental Health) समस्या महिलांसोबतच पुरुषांमध्येही दिसल्या. पण बहुतांश पुरुषांनी त्या समस्या इतरांसोबत शेअर करणं टाळलं.

तणाव (Stress) आणि नैराश्याने (Depression) ग्रासलेल्या अनेक पुरुषांनी त्यांच्या समस्या दुसऱ्यासोबत शेअर करण्यापेक्षा स्वतःचं जीवन संपवणं योग्य मानलं. त्यामुळेच आता पुरुषांच्या मानसिक आरोग्याची समस्या ही जागतिक समस्या बनली आहे. पुरुषांच्या मानसिक आरोग्याबद्दलच्या मिथक आणि वास्तवाबद्दल आता बोललं जात आहे. पुरुषांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित असणारी अशीच काही मिथकं आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, जी पुरुषांवर लादली गेली आहेत. प्रत्यक्षात सत्य काही वेगळंच आहे.

पुरुषांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित काही मिथकं आणि सत्य

पुरुष कधीही रडत नाहीत
लहानपणापासून पुरुषांना शिकवलं जातं की मुली रडतात, मुलं नाही. मात्र, सत्य काही वेगळंच आहे. रडणं ही एक मानसिक भावना आहे, जी तणाव कमी करण्यासाठी मदत करते. पण जेव्हा माणूस रडत नाही आणि ताणतणाव असूनही स्वत: खंबीर असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा खरं तर त्याला आतून खूप दडपण जाणवत राहतं आणि तो अस्वस्थ राहतो. अशावेळी त्यांनी आपल्या भावना कुठेतरी शेअर करणं आणि मेडिटेशनची मदत घेणं महत्त्वाचं असतं.

पुरुष भावनिक नसतात
प्रत्येक माणसाप्रमाणे पुरुषही भावनाप्रधान असू शकतो. हे कमकुवतपणाचं लक्षण नाही. पुरुषांचं भावनिक असणं, ही एक सामान्य गोष्ट असल्याचं मानसशास्त्रज्ञ आणि डॉक्टर सांगतात. त्यामुळे पुरुषांनाही त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा, त्या शेअर करण्याचा अधिकार आहे.

पुरुषांना मानसिक आधाराची गरज नसते
पुरुषांना मानसिक आधाराची गरज नसते, असा सर्वसामान्यांचा समज आहे. पण तसे अजिबात नाही. पुरुषांनाही मानसिक आधाराची गरज असते. त्यामुळे ते स्वतःला एकटं असल्याचं समजत नाहीत आणि अधिक चांगलं त्यांना जगता येतं.

पुरुष जास्त रागावतात
राग येणं ही प्रत्येकासाठी सामान्य गोष्ट आहे. जर एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असेल आणि ती त्याच्या मनातील गोष्ट सांगू शकत नसेल किंवा मानसिकदृष्ट्या थकली असेल, तर कोणत्याही व्यक्तीला राग येऊ शकतो. मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरुष.

आरोग्याची आपण काळजी घेतो तशाच प्रकारे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तसंच पुरुषांनी मानिसक आरोग्य चांगलं राहावं, यासाठी आपल्या मनात असणारे गैरसमज दूर करण्याची आवश्यकता आहे.

Web Title: misunderstandings about male health and nature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.