मोहिनी चॉकलेटची!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 06:04 AM2018-05-14T06:04:54+5:302018-05-14T06:04:54+5:30
चॉकलेट म्हटले की, प्रथम डोळ्यांसमोर येते ते मिल्क चॉकलेट. हल्ली पाहुणे घरी येणे तसे सोशल मीडियामुळे फारच कमी झालेले आहे. आपण कुठे आहोत
अर्चना देशपांडे-जोशी
चॉकलेट म्हटले की, प्रथम डोळ्यांसमोर येते ते मिल्क चॉकलेट. हल्ली पाहुणे घरी येणे तसे सोशल मीडियामुळे फारच कमी झालेले आहे. आपण कुठे आहोत आणि काय करत आहोत, याची बातमी सतत आपण शेअर करत असतो. त्यामुळे भेटून बोलायला विषयच शिल्लक राहत नाही. एक काळ असा होता की, ठरवून मामा, काका यांच्या घरी जाणे होत असे. असे पाहुणे येत तेव्हा बिस्किटांपेक्षा चॉकलेट किंवा लॉलीपॉप आणणारा पाहुणा लाडका होता. मिल्क चॉकलेट हे तसे श्रीमंत चॉकलेट होते. रावळगावची टॉफी ही सगळ्यांनाच आवडत असे. चारचार रावळगाव हातावर पडले की, स्वारी खूश. काजूचे म्हणून गुलाबी, पिवळ्या आणि केशरी रंगाचे चौकोनी चॉकलेट कधीतरी बघायला मिळत असे. टॉफी या नावाखाली कॉफी, लेमन, कोला, आॅरेंज असे नानाविध फ्लेव्हर असलेली चॉकलेट खरंतर गोळ्या या सदरातच मोडत असत. चॉकलेट खाणे म्हणजे दाताची वाट लावून घेणे, असे अजूनही समजले जाते. प्रत्यक्षात आपण काहीही खाल्ल्यानंतर खळखळून चूळ भरणे आणि व्यवस्थित दात स्वच्छ ठेवणे याकडे लक्ष न दिल्याने दात खराब होत असतात. दोष मात्र विनाकारण चॉकलेटला.
चॉकलेट खाण्याबरोबरच त्याच्या चांद्या पुस्तकात जपून ठेवणे हा अनेकांचा छंदच होता. काही कंपन्यांनी याचा व्यापारी फायदा करून घेताना याच्या रॅपरसोबत विमानाची, गाड्यांची, क्रिकेटर्सची चित्रे जोडून ती जमा करण्याचा नादच मुलांना लावला होता. अमुक प्रकारची चित्रे जमा झाली की, एखादा अल्बम पुन्हा चित्रे जमवून चिकटवण्यासाठी मिळत असे. अल्बम पूर्ण केला की, एखादे बक्षीस पदरात पडे; पण तोपर्यंत बरीच पदरमोड होऊन चॉकलेट खाणे हे नित्यनेमाने घडत असे. देशी तसेच परदेशी चॉकलेटची रेलचेल वाढली आणि शॉपिंग मॉल ही संकल्पना रुजली तसे वाणी आणि त्याच्याकडील चॉकलेटची बरणी इतिहासजमा होऊ लागली आहे. अनंत प्रकारची चॉकलेट आली तरी मिल्क चॉकलेटला पर्याय नाही. स्वीसमध्ये या चॉकलेटना इतका मान दिला जातो की, त्यांना हात लावत नाहीत, तर ती चमचानेच उचलावी लागतात. होममेड चॉकलेटचे अनंत प्रकार, आकार आणि रंग रोज नव्याने जन्म घेत असतात.
डार्क या चॉकलेटची टेस्ट स्ट्राँग असते. काहीशी कडवटही असते; पण यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आपल्या रोजच्या चॉकलेटपेक्षा जरा वेगळीच चव असलेल्या या चॉकलेच्या भेटीतून आपण आपल्या आवडत्या व्यक्तीबाबतीत त्याची आपल्याला काळजी असल्याचं आपण सूचित करत असतो. आपण त्या व्यक्तीवर अवलंबून आहोत, हे पण ‘डार्क’चॉकलेट दाखवून देत असते. साधारण कडक चव असलेली ही चॉकलेट आपण आपल्या जोडीदाराचे रक्षण करू किंवा काळजी घेऊ, असे सुचवत असते.
सफेद किंवा व्हाइट चॉकलेट ही मृदू आणि एलिंगट असतात. याची चव सगळ्यांनाच आवडत नाही. आपल्याकडे त्या मानाने ती कमी लोकप्रिय आहेत. याची भेट क्लासिक मानली जाते आणि चव काहीशी सौम्य असल्याने एक ‘गोड’ भेट म्हणून पण याच्याकडे पाहिलं जातं. आपल्याला आवडणारी व्यक्ती गोड स्वभावाची असेल तर ही भेट तिला नक्कीच आवडेल.
सर्वात लोकप्रिय चॉकलेटचा प्रकार म्हणजे मिल्क चॉकलेट म्हणजे हे व्हाइट चॉकलेट नव्हे बरं! याच्या लोकप्रियतेमुळे आणि एका विशिष्ट पद्धतीने केलेल्या व्यापारीकरणामुळे भारतात असा मोठा गैरसमज आहे की, मिल्क म्हणजे सफेद किंवा व्हाइट. भारतात मिल्क चॉकलेटला खूपच लोकप्रियता मिळालेली आहे. प्रेम या भावनेशी मिल्क चॉकलेटला जोडले जाते.
चॉकलेट खाणे हे प्रमाणात असेल तर प्रकृतीसाठी उपयुक्त आहे. तसेच आपली त्वचा आणि चेहरा यावर पण ते उपयोगी आहे. त्वचेला सुरकुत्या न येणे, ती तजेलदार राहाणे यासाठी ते उपयुक्त आहे. हिमालयातील उंचीवर चॉकलेट खाणे औषधाप्रमाणे उपयोगी पडते. थकवा आला किंवा तोंडाची चव गेली तर चॉकलेट चघळा आणि मजेत राहा आणि त्याची चांदी फेकून कचरा करण्यापेक्षा त्याचा हस्तकलेसाठी वापर करा.