Monkeypox Disease: सावधान! लैंगिक संबंधातून पसरू शकतो 'मंकीपॉक्स'चा विषाणू, तज्ज्ञांचा इशारा; लक्षणं कोणती? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 03:54 PM2022-05-19T15:54:02+5:302022-05-19T16:27:09+5:30
Monkeypox Disease: मंकी पॉक्स रोगाची लागण असलेल्या एखाद्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवल्यास त्याच्या जोडीदारालाही मंकी पॉक्सची लागण होण्याची शक्यता असते.
मंकीपॉक्स व्हायरस आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. इंग्लंडसोबतच आता स्पेन आणि पोर्तुगालसारख्या देशांमध्येही याचे रुग्ण आढळू लागले आहेत. फक्त युरोपातच नाही तर अमेरिकेतील एका व्यक्तीलाही या भयानक रोगाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तर आणखी काही व्यक्तींमध्ये याची लक्षणं दिसून आली आहेत. ७ मे रोजी लंडनमध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला होता. संसर्ग झालेली व्यक्ती नुकतीच नायजेरियातून परतली होती. त्यामुळे या व्हायरसचं मूळ आफ्रिकेत असल्याचं म्हटलं जात आहे. पण अजूनही या विषाणूचा प्रसार नेमका कसा होतो याबाबत तज्ज्ञांकडे कोणथाही ठोस पुरावा नाही.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार हा रोगाचा एक विशिष्ट प्रकार आहे. स्मॉलपॉक्स आणि वॉटरपॉक्सवर उपचार असले तरी मंकीपॉक्सवर डॉक्टरांकडे अद्याप कोणतेही अधिकृत उपचार नाहीत.
Monkeypox Virus Symptoms: मंकीपॉक्सची नेमकी लक्षणं कोणती?
1. मंकीपॉक्सची लागण झालेल्या व्यक्तीला सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, पाठ आणि मानदुखी यासारखी लक्षणं दिसून येतात.
2. थकवा जाणवणं आणि शरीरावर लहान चट्टे देखील दिसतात.
3. गोवर, स्प्रिंग, स्कर्वी, सिफिलीस या आजारांमध्ये दिसून येणारी लक्षणं काही प्रमाणात या आजाराच्या लक्षणांशी मिळतीजुळती आहेत. त्यामुळे या आजाराची सुरुवातीची लक्षणं ओळखण्यात चूक होते.
Monkeypox Virus Fresh Warnings: तज्ज्ञांनी काय इशारा दिला?
आतापर्यंत हा विषाणू 'ड्रॉपलेट्स'मधून पसरतो असं डॉक्टरांना वाटत होतं. त्यामुळे हा विषाणू श्वसनमार्गातून, जखम, नाक, तोंड किंवा डोळ्यांमधून निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करू शकतो, असं तज्ञांचं मत होतं. परंतु नव्या रुग्णांची चाचणी केल्यानंतर डॉक्टरांनी एक मोठी भीती व्यक्त केली आहे. मंकीपॉक्सचा विषाणू लैंगिक संबंधांमुलेही पसरू शकतो असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. मंकी पॉक्सची लागण झालेल्या एखाद्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवल्यास त्या व्यक्तीलाही मंकी पॉक्सची लागण होण्याची शक्यता आहे, असं तज्ज्ञांच्या एका गटानं म्हटलं आहे.