Monkeypox New Symptoms: मंकीपॉक्स रुग्णांमध्ये दिसून आली ही नवी लक्षणं, कोरोनापेक्षाही अधिक दिवस राहावं लागणार क्वारंटाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 04:04 PM2022-08-02T16:04:59+5:302022-08-02T16:06:37+5:30
86 टक्के रुग्णांनी या आजाराचा संपूर्ण शरिरावरच परिणाम झाल्याचे म्हटले आहे. 71 रुग्णांनी त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याचे, तर 31 लोकांनी प्रायव्हेट पार्टमध्ये सूज असल्याचे म्हटले आहे.
करोना महामारीनंतर आता मंकीपॉक्सने (Monkeypox) जगभरातील अनेक देशांमध्ये थैमान घातले आहे. यातच, एका अभ्यासात मंकीपॉक्सची नवी लक्षणे दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये (BMJ) प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे. यात म्हणण्यात आले आहे, की सध्या मंकीपॉक्सची लागण झालेल्या रुग्णांत, अशी लक्षणे दिसत आहेत, जी सर्वसाधारणपणे व्हायरसच्या संसर्गाशी संबंधित नाहीत.
महत्वाचे म्हणजे, हा निष्कर्ष (Conclusion) मे आणि जुलै 2022 दरम्यान लंडनमधील (London) मंकीपॉक्सच्या 197 रुग्णांवर आधारलेला आहे. रुग्णांनी सांगितलेल्या काही सामान्य लक्षणांत प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना आणि सूज येण्याचाही समावेश आहे. हे लक्षण पूर्वीपेक्षा वेगळे आहे. या अभ्यासात सहभागी असलेले सर्व 197 लोक पुरुष होते. यांचे सरासरी वय 38 एवढे होते. यांपैकी 196 जण समलिंगी (Gay), उभयलिंगी अथवा जे पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवतात असे आहेत, असे संशोधकांनी म्हटले आहे.
मंकीपॉक्स रुग्णांत दिसून आली नवी लक्षणे -
86 टक्के रुग्णांनी या आजाराचा संपूर्ण शरिरावरच परिणाम झाल्याचे म्हटले आहे. या आजाराची सर्वात सर्वसामान्य लक्षणे म्हणजे, ताप (62 टक्के), लिम्फ नोड्समध्ये सूज (58 टक्के) आणि स्नायूचे दुखणे (32 टक्के) होय. या अभ्यासत सहभागी असलेल्या 71 रुग्णांनी त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दुखणे, 33 जणांनी घसा खवखवणे आणि 31 लोकांनी प्रायव्हेट पार्टमध्ये सूज असल्यासंदर्भात सांगितले.
याच बरोबर, 27 रुग्णांच्या तोंडात जखमा होत्या. 22 रुग्णांना शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर एकच जखम दिसून आली आहे. तसेच, 9 रुग्णांना टॉन्सिलची सूज आली होती. संशोधकांनी म्हटल्याप्रमाणे, एकच जखम आणि टॉन्सिलची सूज, ही या पूर्वी मंकीपॉक्सची विशिष्ट लक्षणे म्हणून ओळखली जात नव्हती. एवढेच नाही, तर जवळपास एक तृतियांश (36 टक्के) रुग्ण एचआयव्ही संक्रमितही होते आणि 32 टक्के लोकांत लैंगिक संक्रमणही झालेले होते, असेही ते म्हणाले.