Monkeypox outbreak: 'मंकीपॉक्सपासून बचावासाठी लसीकरणाची गरज नाही, पण...', WHOचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 06:14 PM2022-05-24T18:14:37+5:302022-05-24T18:36:20+5:30
Monkeypox outbreak: अमेरिका आणि यूरोपमध्ये मोठ्या संख्येने मंकीपॉक्सचे रुग्ण आढळत आहेत.
Monkeypox outbreak: जगातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणे समोर आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटना (WHO) या आजाराबाबत सतर्क झाली आहे. WHO ने नुकतीच एक नवीन चेतावणी जारी केली असून त्यात म्हटले आहे की, मंकीपॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी कोरोनासारख्या लसीकरण कार्यक्रमाची गरज नाही, परंतु सुरक्षित संभोग आणि स्वच्छतेची काळजी घेऊन त्यावर नियंत्रण मिळवता येते.
मंकीपॉक्ससाठी लसीकरण आवश्यक नाही
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, मंकीपॉक्सपासून संरक्षण करण्यासाठी त्वरित लस पुरवठा आणि विषाणूविरोधी उपचारांची आवश्यकता नाही. WHO कडून हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा US CDC ने सांगितले आहे की, त्यांनी मांकीपॉक्स आणि चेचक यांच्या उपचारांसाठी JYNNEOS लसीची लस जारी केली आहे. मंकीपॉक्स प्रथम आफ्रिकेत 1958 मध्ये आढळून आला, त्यानंतर हा रोग एंडेमिक घोषित करण्यात आला.
अमेरिकेत या विषाणूचा रुग्ण
मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण अमेरिकेत 18 मे रोजी आढळून आला होता. मॅसॅच्युसेट्समध्ये राहणारी पीडित तरुणी नुकतीच कॅनडाला गेली होती. अमेरिकेत मंकीपॉक्सच्या प्रतिबंधासाठी 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनाही ही लस दिली जात आहे. यासोबतच कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती आणि एचआयव्हीची लागण झालेल्या लोकांनाही लसीकरण करण्यात येत आहे.
ट्रॅव्हल हिस्ट्री नसतानाही लागण
अमेरिका आणि युरोपमध्ये मंकीपॉक्सची मोठ्या प्रमाणात प्रकरणे नोंदवली गेली आहेत. विशेष म्हणजे यापैकी कोणीही आफ्रिकेला गेले नव्हते. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, व्हायरसच्या प्रसाराची नेमकी कारणे अद्याप सापडलेली नाहीत. दिलासादायक बाब म्हणजे, या विषाणूचे वेगाने उत्परिवर्तन झाल्याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत.
युरोपमधील डब्ल्यूएचओच्या पॅथोजेन थ्रेट टीमचे सदस्य रिचर्ड पेबोझी म्हणाले की, विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि आयसोलेशन आवश्यक आहे. मंकीपॉक्स लसीचे दुष्परिणाम यापूर्वीच समोर आले आहेत. सर्वच नाही, पण बहुतांश घटनांमध्ये पुरुषाचे पुरुषाशी संबंध असल्याने हा आजार पसरला आहे. रोगाच्या प्रतिबंधासाठी वारंवार लैंगिक तपासणी आणि वैद्यकीय सल्ल्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.