Monoclonal Antibodies: मोनोक्लोनल ॲण्टीबॉडीज कोरोनावरील ब्रह्मास्त्र ठरणार? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 10:00 AM2021-05-31T10:00:32+5:302021-05-31T10:01:07+5:30
काही दिवसापूर्वी भारतातही एका ज्येष्ठ नागरिकावर ही थेरपी करण्यात आली होती आणि ते कोरोनापासून पूर्णत: मुक्त झालेले आहेत.
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प, ऑक्टोबर २०२० मध्ये शिरांद्वारे दोन ॲण्टीबॉडीजच्या कॉम्बिनेशन दिल्याने कोरोनापासून पूर्णत: मुक्त होताच मोनोक्लोनल ॲण्टीबॉडीज संपूर्ण जगतासाठी आकर्षणाचे केंद्र बनले. काही दिवसापूर्वी भारतातही एका ज्येष्ठ नागरिकावर ही थेरपी करण्यात आली होती आणि ते कोरोनापासून पूर्णत: मुक्त झालेले आहेत.
हे कशा तऱ्हेचे कॉकटेल आहे?
केसिरिविमैब आणि इम्डेविमैब या दोन ॲण्टीबॉडीजचे हे कॉम्बिनेशन आहे. कोरोना संक्रमित व्यक्तीवर उपचारासाठी याचा उपयोग केला जातो. या मात्रेची शिफारस सौम्य ते मध्यम प्रकारच्या संक्रमणासोबतच अतिशय जोखीम असलेल्या रुग्णांसाठी केली जाते. यासाठी प्रतिव्यक्ती ३५ हजार रुपयापर्यंत खर्च होतो.
केसिरिविमैब आणि इम्डेविमैब काय आहे?
या मोनोक्लोनल ॲण्टीबॉडीज आहेत. या ॲण्टीबॉडीज मनुष्याच्या शरीरात कोरोना विषाणूच्या विरोधात ॲण्टीबॉडीज उत्पन्न करणाऱ्या इम्युन सिस्टमची नक्कल करतात. हे दोन्ही ॲण्टीबॉडीज लॅबमध्ये तयार केल्या जातात. सार्स-कोव-२ विषाणूच्या स्पाईक प्रोटीन्सवर या ॲण्टीबॉडीज प्रहार करतात. अशा तऱ्हेने या मात्रा कोरोना विषाणूच्या मानवी कोशिकांना जुळण्याच्या प्रयत्नाला हाणून पाडतात.
या मात्रा विषाणूच्या नव्या व्हेरिएंट्सवरही कारगर आहेत?
मोनोक्लोनल ॲण्टीबॉडीज विषाणूच्या विविध भागांना चिपकतात. त्यामुळे, ॲण्टीबॉडीजच्या या मात्रा विषाणूच्या व्हेरिएंट्सवरही कारगर ठरतात.
कोणत्या रुग्णांसाठी याचा उपयोग होतो?
हे ॲण्टीबॉडीज वयस्क आणि १२ वर्षावरील मुलांसाठी उपयोगात येतात. गंभीर रुग्णांसाठीही याचा उपयोग केला जातो. या ॲण्टीबॉडीज केवळ एका वेळेला १२०० मि.ग्रा.च्या मात्रेच्या अनुषंगाने वापरल्या जातात.
ॲण्टीबॉडीजच्या या कॉकटेलचे कोरोना विषाणू संक्रमणावर प्रभावी असण्याचे पुरावे कोणते?
या ड्रगचा कोरोना संक्रमित व हॉस्पिटलमध्ये भरती नसलेल्या अशा ४,५०० रुग्णांवर वापर करण्यात आला आहे. यातून संक्रमितांचा मृत्यू किंवा हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची टक्केवर प्लेसेबोच्या तुलनेत ७० पर्यंत कमी झाले. केसेरिविमैब आणि इम्डेविमैबमुळे लक्षणांचा अवधी चार दिवसापर्यंत खाली आणला आहे. हे औषध हॉस्पिटलमध्ये भरती नसलेल्या रुग्णांसाठी आहे. हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर रेमडेसिविर आणि डेक्सामेथेसोनसारख्या स्टेरॉईड्सची गरज भासते.
या थेरपीची गरज भासणारे गंभीर रुग्ण कोणते?
लठ्ठ असणारे आणि ज्यांचा बीएमआय ३५ पेक्षा जास्त असेल, मूत्रपिंडाचे दीर्घकालीन आजार व मधुमेहाच्या रुग्णांना या थेरपीची शिफारस केली जाते. इम्युनोसप्रेसिव्ह थेरपी किंवा इम्युनोसप्रेसिव्ह आजार असणाऱ्यांनाही या थेरपीचा सल्ला दिला जातो. हे ड्रग कार्डिओवेस्कुलर डिसिज किंवा हायपरटेंशन किंवा दीर्घकालीन ऑब्स्ट्रक्टिव्ह एअरवे डिसिजच्या वृद्ध रुग्णांनाही दिले जाते.
या थेरपीचे दुष्परिणाम कोणते?
डोकेदुखी, अंगदुखी, ज्वर आदी सौम्य लक्षणे दिसून येतात. खाज, त्वचेवर कोरडेपणा आदीही दिसून येतात. ड्रग ट्रायल्सच्या वेळी काही रुग्णांना सौम्य हायपरसेंसिटिव्हिटी रिॲक्शन्सचा सामना करावा लागला आहे. अनेक देशांमध्ये ऑक्सिजन थेरपी घेत असलेल्या किंवा गंभीर आजार असलेल्यांना या थेरपीची परवानगी नाही.
गर्भावस्थेतील महिलेला ही थेरपी दिली जाते का?
या आयजीजी मोनोक्लोनल ॲण्टीबॉडीज प्लेसेंटातून जाण्याची शक्यता असते. याविषयी कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. मात्र, आरोग्य सेवा देणारे आणि रुग्ण नुकसान होण्यापेक्षा फायद्याचा विचार करत असतील तर आजार रोखण्यासाठी आणि प्रकृती बिघडण्यापासून रोखण्यासाठी ही थेरपी घेतली जाऊ शकते.
मोनोक्लोनल ॲण्टीबॉडीज घेतलेल्या व्यक्तींचे लसीकरण केव्हा व्हायला हवे?
या थेरपीनंतर संबंधित रुग्णाने किमान ९० दिवस लसीकरण करू नये. लसीकरणानंतर ॲण्टीबॉडीज तयार होण्याची प्रक्रिया आणि मोनोक्लोनल ॲण्टीबॉडीजमुळे सुरू झालेल्या प्रक्रियेचा द्वंद्व टाळण्यासाठी हा सल्ला आहे.