सतत येणाऱ्या तापापासून या घरगुती उपायांनी मिळवा सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 10:42 AM2018-05-22T10:42:35+5:302018-05-22T10:42:35+5:30
पावसाळ्यात खासकरुन व्हायरल ताप भरणे ही समस्या अनेकांना भेडसावते. अशात या तापाकडे दुर्लक्ष करुन चालत नाही.
पावसाळा सुरु व्हायला आता काही दिवसच उरले आहेत. पाऊस म्हटला की, पावसासोबत अनेक आजारही आलेच. त्यामुळे पावसाळ्यात अनेक गोष्टींची काळजी घेणे अनिवार्य ठरते. पावसाळ्यात खासकरुन व्हायरल ताप भरणे ही समस्या अनेकांना भेडसावते. अशात या तापाकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. अशावेळी प्रत्येक वेळी डॉक्टरांकडील औषधांबरोबरच घरगुती उपाय देखील करावेत. यासाठी नेमकं काय करावं आणि कोणत्या गोष्टींचा समावेश करून घ्यावेत. काय आहेत हे घरगुती उपाय…
१) तुळशीच्या पानांचा काढा तयार करून त्यात वेलची पूड आणि साखर घालून प्यायल्याने ताप लवकर उतरतो.
२) तुळस घालून केलेला चहा प्यायल्यानेही ताप लवकर उतरतो. याने खोकल्यासही आराम मिळतो.
३) पुदिना आणि आल्याचा काढा कुठल्याही प्रकारच्या तापावर उपयुक्त ठरतो. त्यामध्ये मेथी आणि मध घालूनही आपण घेऊ शकतो.
४) आल्याचा चहा घेतल्यानेही आराम मिळतो. याने तापासोबत कफही निघून जाईल.
५) थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्लाने थंडीचा जोर कमी होऊन घाम येऊन ताप उतरतो.
६) कांद्याचा आणि लसणाचा रस घेतल्याने अंगात मरलेला ताप देखील कमी होतो.
७) तुळशीचा काढाही तापावर फायदेशीर ठरतो. कपभर उकळत्या पाण्यामध्ये मूठभर ताजी तुळशीची पानं टाका. हे मिश्रण 5-10 मिनिटे उकळू द्या. ते गाळून दिवसातून दोनदा प्या. मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांसाठी हा काढा फायदेशीर ठरतो.
८) आहारात सफरचंद, दूध, खिचडी, टोमॅटो सूप, आलं, लसूण, काळी मिरी, शेवगा, कारली या पदार्थांचा समावेश करावा.
9) जर सर्दी, ताप, थंडी आणि अंग दुखत असेल तर दालचिनीचा तुकडा, सुंठीचा तुक़डा, लवंग, गवती चहा पाण्यात एकत्र करून दिवसातून दोन वेळा घेतल्याने ताप कमी होतो.