ऑफिसला जाणाऱ्यांसाठी खास पावसाळी टिप्स !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 01:39 PM2018-06-06T13:39:46+5:302018-06-06T13:39:46+5:30
पावसाळ्यात अनेक गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं. निष्काळजीपणा तुमच्या अंगावर येऊ शकतो.
मुंबई : पावसाची चाहूल लागताच प्रत्येकाचीच वेगळी लगबग सुरू होते. कुणी नवीन छत्री खरेदी करतात, कुणी रेनकोट तर कुणी पावसाळ्यासाठी स्पेशल शूज-चप्पल…पावसाळा हा अनेक रोगांनाही आपल्यासोबत घेऊन येतो. त्यामुळे इतर ॠतूंपेक्षा पावसाळ्यात आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. सर्दी-खोकला तर पावसाळ्यात एक सामान्य गोष्ट होऊन बसते. नोकरदार वर्गाला पावसाचा सर्वात जास्त फटका बसतो. पावसाच्या सरी अंगावर घेण्यात आनंद जरी मिळत असला तरी त्याचे तोटेही अनेक आहेत. पावसाळ्यात अनेक गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं. निष्काळजीपणा तुमच्या अंगावर येऊ शकतो.
पावसाळ्यात खाण्यापिण्यासोबत इतरही अशा गोष्टी आहेत ज्यात काळजी तुम्ही घेतली पाहिजे. खासकरून ऑफिसला जाणा-यांसाठी आम्ही आज काही पावसाळी स्पेशल टिप्स घेऊन आलो आहोत. ज्यात आम्ही तुम्ही पावसात बाहेर पडल्यावर काय काळजी घ्यायला पाहिजे, हे सांगणार आहोत. पावसाच्या आनंदाच्या भरात उगाच स्वत:ची फजिती करून घेण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी…नाही का..?
* पावसात ऑफिसला जाणा-यांची नेहमीच सर्वात जास्त फजिती होते. ऑफिससाठी तुम्ही व्यवस्थित इस्त्रीचे कपडे घालून तयार झाल्यावर नेमका पाऊस आल्यास सगळंच विस्कटीत होतं. अशात शक्य असल्यास तुमचे ऑफिसचे कपडे तुम्ही तुमच्या बॅगमध्ये कॅरी करू शकता. ऑफिसला गेल्यावर चेन्ज करू शकता.
* पावसात तुम्ही जराही भिजले तर सर्दी-खोकला होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे ऑफिसला जाण्यासाठी बाहेर पडण्याआधी न विसरता आपल्या बॅगमध्ये एक टॉवेल किंवा नॅपकिन ठेवा. जेणेकरुन तुम्ही केस आणि अंग कोरडे करू शकाल.
* पावसाळ्यात घराबाहेर पडताना बॅगमध्ये कपड्यांचा एक जोड असायला पाहिजे. पावसात भिजलेल्या कपड्यांवर तुम्ही दिवस काढणार असाल तर ते तुमच्यासाठी धोकादायक होऊ शकतं. असे केल्यास ताप, सर्दी खोकला येण्याची शक्यता अधिक असते.
* पावसाळ्यात उलटसुलट खाणे जसे घातक आहे, तसे अस्वच्छ पाणीही त्यापेक्षा घातक आहे. बाहेरचं पाणी पिणे शक्यतो टाळा. या दिवसात पावसाच्या पाण्यात रोगजंतू अधिक असतात त्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळतं. त्यामुळे बाहेर पडताना घरूनच पाण्याची एक बाटली सोबत घ्या.
* पावसाळ्यात बाहेर पडताना एक प्लॅस्टीकची बॅग आवर्जून सोबत ठेवा. तुम्ही बाहेर पडताना पाऊस थांबला असला तरी तो कधीही कोसळू शकतो. त्यामुळे तुमचा मोबाईल, पाकिट, तुमची रेल्वे-बसची पास भिजण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे बाहेर तुमचीच फजिती अधिक होऊ शकते. आता मोबाईल पाण्यात भिजल्यावर किती महागात पडू शकतं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे.
* या दिवसात जसं बाहेरचं पाणी पिणं धोक्याचं आहे. तसंच बाहेर खाण्यानेही तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे नाश्ता, जेवण घरूनच करून निघा किंवा सोबत घ्या. नाहीतर पावसाळ्यात डायरिया, मलेरियासोबत इतरही पोटांचे आजार होण्याची अधिक शक्यता असते.