गोव्यात दरमहा 5 ते 6 मधुमेही गमावतात आपले पाय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 05:13 PM2019-03-04T17:13:17+5:302019-03-04T17:19:05+5:30
मधुमेहाचे वाढते रुग्ण ही गोव्यासारख्या लहान राज्याला सतावणाऱ्या प्रमुख आरोग्य समस्यांपैकी एक आहेच. त्याहीपेक्षा अधिक गंभीर बाब म्हणजे, या रुग्णांना आपली काळजी कशी घ्यावी याचीही पुरेशी माहिती नसल्याने पायांसंदर्भातील विकार ही आणखी एक मोठी समस्या निर्माण झाली आहे.
मडगाव : मधुमेहाचे वाढते रुग्ण ही गोव्यासारख्या लहान राज्याला सतावणाऱ्या प्रमुख आरोग्य समस्यांपैकी एक आहेच. त्याहीपेक्षा अधिक गंभीर बाब म्हणजे, या रुग्णांना आपली काळजी कशी घ्यावी याचीही पुरेशी माहिती नसल्याने पायांसंदर्भातील विकार ही आणखी एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयातून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे, योग्य ती काळजी न घेतल्यामुळे दर महिन्याला किमान पाच ते सहा मधुमेही रुग्णांवर आपली पाय कापून घेण्याची वेळ आली आहे.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. एस. एम. बांदेकर यांनी याबद्दल चिंता व्यक्त करताना, गोव्यात या रोगासंदर्भात अधिक जागृती होण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, अनेकदा आम्ही मधुमेही रुग्णांचे अवयव कापून टाकण्याचे टाळतो. मात्र त्यासाठी त्या रुग्णाने आपल्या अंगातील साखर नियंत्रणात ठेवण्याची गरज असते. मात्र बऱ्याचदा आमच्याकडे पायांना गँगरिन झालेले रुग्ण येतात. अशावेळी कुठलाही उपाय नसल्यामुळे आम्हाला पाय कापून टाकावा लागतो.
अशा समस्यांवर नियंत्रण आणण्यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आता परिपूर्ण असे 'फूट क्लिनिक' विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात मधुमेही रुग्णांच्या पायावर उपचार करता येणे शक्य होणार आहे.
या रोगातील तज्ज्ञ असलेले डॉ. प्रितम कळंगुटकर यांनी मधुमेही रुग्णांना पायाची दुखणी होऊ नये यासाठी जर काळजी घेतली तर त्यांच्यावर ही वेळ येणार नाही. पण दुर्दैवाने कित्येक रुग्णांना ही काळजी कशी घ्यावी याची माहिती नसते असे सांगितले.
ग्रामीण भागात ही समस्या अधिक सतावते. गोव्यात होणाऱ्या व्याधींची पाहणी केल्यास 60 टक्के दुखणी मधुमेहाशी संबंधीत असतात. या पाठोपाठ 32 टक्के समस्या हृदयविकाराशी संबंधित असून 20 टक्के समस्या मोती बिंदूच्या आहेत. मधुमेही रुग्णांना जरी लहानशी जखम झाली तरीही त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. बहुतेकवेळा लोक पायाची निगा राखण्याकडे दुर्लक्ष करतात आणि जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते, त्यावेळी औषधोपचार घ्यायला येतात असे डॉ. कळंगुटकर म्हणाले.
अशी घ्या पायाची काळजी...
1) प्रत्येक रात्री तुमचे दोन्ही पायांची व्यवस्थित तपासणी करून घ्या. बोटांच्या मध्ये काही इन्फेक्शन तर नाही ना याची काळजी घ्या. नखांकडेही लक्ष द्या.
2) नियमित नखे कापा आणि पाय मॉश्चराईज्ड करुन घ्या.
3) उघड्या पायांनी चालण्याचे टाळा.
4) सुटसुटीत बुटांचा वापर करा.
5) जर तुम्ही मधुमेही रुग्ण असाल तर पायाच्या बोटात वेढे (रिंगा) घालण्याचे टाळा.