निम्म्यापेक्षा जास्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाच रुग्णालयांमध्ये वाटते भीती; सर्वेक्षणातून माहिती उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 03:17 PM2024-10-21T15:17:28+5:302024-10-21T15:30:04+5:30
धक्कादायक बाब म्हणजे, सुमारे ७८ टक्के कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी धमकी मिळाल्याचे सांगितले
लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: निम्म्यापेक्षा जास्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी असुरक्षित वाटते. विशेषत: राज्य आणि केंद्र सरकारच्या रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्यांमध्ये ही भावना जास्त आहे. दिल्लीतील एम्स आणि सफदरजंग रुग्णालयाच्या तज्ज्ञांनी केलेल्या एका सर्वेक्षणातून ही माहिती उघड झाली आहे. त्यातून देशातील रुग्णालयांमध्ये प्राथमिक सुरक्षेतील महत्त्वाच्या त्रुटींकडे लक्ष वेधण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सुमारे ७८ टक्के कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी धमकी मिळाल्याचे सांगितले.
१,५६६ देशभरातील आराेग्य कर्मचारी सर्वेक्षणात सहभागी झाले.
- महिला - ८६९
- पुरुष - ६९७
- ७१.५% - कर्मचारी सरकारी रुग्णालयात काम करतात.
- ४९.२% - कर्मचारी बिगर शस्त्रक्रिया विभागात काम करतात.
- ३३.८% - कर्मचारी शस्त्रक्रिया विभागातील आहेत.
- ४९.६% - दिल्लीतील कर्मचाऱ्यांमध्ये निवासी डाॅक्टर.
- १५.९% - प्रशिक्षणार्थी डाॅक्टर.
सरकारी रुग्णालये...
हा अहवाल ‘इपिडेमियाेलाॅजी इंटरनॅशनल’ नावाच्या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आहे. रुग्णालयांमध्ये सुरक्षा व्यवस्था आणि उपाययाेजनांमध्ये तत्काळ सुधारणा करण्याची गरज असल्याचे त्यात म्हटले. आयसीयू तसेच मानसिक रुग्णांच्या वाॅर्डमध्ये लाेकांची निर्वराेध ये-जा, निगरानी तसेच सुरक्षेबाबत गंभीर त्रुटी असल्याचे समाेर आले आहे. खासगी रुग्णालयांच्या तुलनेत सरकारी रुग्णालयांमध्ये कर्मचारी सुमारे ४ पट नाराज असल्याचेही सर्वेक्षणात आढळले.
सर्वेक्षणात काय आढळले?
- ५८.८ टक्के कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी असुरक्षित वाटते.
- ७८.४ टक्के डाॅक्टरांना कामाच्या वेळी धमकी मिळाली.
- ७० टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा रक्षकांची संख्या अपुरी आहे.
- ६२ टक्के कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन अलार्म यंत्रणेबाबत असमाधान व्यक्त केले.
- दीर्घकालीन व रात्रपाळीत काम करणाऱ्या निम्म्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष नाही.
- नियमित स्वच्छता, कीटक नियंत्रण, हवेशीरता, वातानुकूलित यंत्रणेच्या फार खराब सुविधा आहेत.