मच्छरांनी संपवली माणसांची अर्धी जमात? सत्य जाणून तुम्हालाही धक्का बसेल...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 10:10 AM2022-10-12T10:10:36+5:302022-10-12T10:11:07+5:30
डासांचं पृथ्वीतलावरील वास्तव्यही काही लाख वर्षांपासून आहे. संशोधकांच्या अभ्यासानुसार पृथ्वीवर डासांची संख्या सुमारे ११० खर्व इतकी प्रचंड आहे.
मच्छर/डास.. किती एवढासा कीटक. आपल्याला वाटतं, हा ‘क्षुद्र’ कीटक आपलं कितीसं नुकसान करणार? फार फार तर आपल्याला चावे घेणार. त्यामुळे चुरचुर होणार, यापेक्षा जास्त तो काय करू शकणार? आणि मच्छर मारण्यासाठी, त्यांना पळवून लावण्यासाठी आता उपायही किती आले आहेत.. मच्छरांसाठीची अगरबत्ती, रॅकेट, वेगवेगळे स्प्रे, क्रीम्स.. पण काहीही असलं तरी हेच मच्छर आपल्याला सळो की पळो करून सोडतात हेही तितकंच खरं. ज्या ठिकाणी मच्छर जास्त प्रमाणात आढळतात, त्याठिकाणी कोणतेही उपाय शंभर टक्के आणि दीर्घकाळ प्रभावी ठरत नाहीत, याचाही अनेकांनी अनुभव घेतला आहे. सततचा पाऊस, गलिच्छ वस्ती, डबके.. इत्यादी ठिकाणी डास मोठ्या प्रमाणावर असतात आणि तिथेच त्यांची उत्पत्तीही मोठ्या संख्येनं होते, पण डास नाहीतच, असं एकही ठिकाण सापडणार नाही.. डासांचा कायमचा निकाल लावणं माणसांना शक्य झालेलं नसलं तरी डासांनी मात्र आतापर्यंत अक्षरश: कोट्यवधी माणसांना संपवलं आहे, असं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण बहुसंख्य संशोधक आणि तज्ज्ञ यांचं यावर एकमत आहे.
डासांमुळे मलेरिया होतो, याची माहिती जवळपास सगळ्यांनाच असली तरीही जे अतिशय घातक रोग आहेत आणि ज्या रोगांनी आजपर्यंत लक्षावधी माणसांना संपवलं आहे, ते वेस्ट नाईल व्हायरस, डेंग्यू, यलो फिवर, झिका व्हायरस, मेंदूला सूज आणणारे एन्सेफलायटीस.. यासारख्या रोगांचा प्रसार करण्याचं कामही या डासांनी केलं आहे. जगभरातल्या कोट्यवधी लोकांचा त्यामुळे अंतही झाला आहे.
एका अंदाजानुसार गेल्या सुमारे दहा लाख वर्षांपेक्षाही अधिक काळापासून माणूस पृथ्वीवर राहतो आहे. या काळात जवळपास अकरा हजार कोटी माणसं पृथ्वीवर राहिली; पण त्यातील साधारण निम्मी म्हणजे सुमारे पाच हजार कोटी माणसं या डासांनी किंवा त्यांनी पसरवलेल्या रोगांनी संपवली, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. इतिहास संशोधक टिमोथी वाइनगार्ड यांनी ‘द मस्किटो : ह्यूमन हिस्ट्री ऑफ अवर डेडलिएस्ट प्रीडेटर’ या पुस्तकात हा दावा केला आहे. अर्थात सर्वच संशोधकांचं यावर एकमत नसलं, तरी डासांनी संपवलेल्या माणसांची संख्या काही कोटींच्या घरात आहे, यावर मात्र जवळपास सगळ्यांचं एकमत आहे.
या डासांचं पृथ्वीतलावरील वास्तव्यही काही लाख वर्षांपासून आहे. संशोधकांच्या अभ्यासानुसार पृथ्वीवर डासांची संख्या सुमारे ११० खर्व इतकी प्रचंड आहे. डायनोसारच्याही आधीपासून या डासांनी पृथ्वी व्यापली आहे. डासांच्या सुमारे दोन हजारांपेक्षाही जास्त प्रजाती आहेत. गेल्या दोन लाख वर्षांमध्ये माणसाच्या मात्र केवळ नऊच प्रजाती झाल्या, त्यातीलही ‘होमो सेपियन्स’ हीच एक मानवी प्रजात आता शिल्लक असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. यावरूनच हे एवढेसे आणि ‘क्षुल्लक’ वाटणारे डास/मच्छर किती चिवट आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत जगण्याची त्यांची ईर्षा किती दांडगी आहे, हे सिद्ध होतं.
लिव्हरपूल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन येथील वैद्यकीय सांख्यिकी विभागाचे प्रो. ब्रायन फॅरेगर म्हणतात, या दाव्याचे समर्थन करण्यासाठी पुरावे शोधणे कठीण आहे. एका व्यापक अभ्यासावर हा दावा करण्यात आलेला असला तरी त्याचा स्रोत शोधणे अतिशय कठीण आहे.
इंग्लंडचे डरहम विद्यापीठ आणि आफ्रिकेतील मेडिकल रिसर्च काैन्सिल यांच्या संशोधनानुसार गर्भवती महिलांना डास जास्त चावतात. गर्भवती महिला सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा अधिक जोरानं श्वास घेतात, त्यामुळे त्यांच्या उच्छवासातून जास्त प्रमाणात कार्बनडाय ऑक्साइड बाहेर पडतो. या वायूचा गंध डासांना आवडतो आणि त्यामुळे डास गर्भवती महिलांना जास्त चावतात असं त्यांचा अभ्यास सांगतो. आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे डास तब्बल शंभर फूट अंतरावरूनही हा गंध ओळखू शकतात आणि या गंधाच्या दिशेनं मग त्यांचा प्रवास सुरू होतो!..
डास कानाशीच का गुणगुणतात?
मादी डास आपल्याला चावतात, हे सगळ्यांना माहीत आहे; पण ते आपल्या कानाशी का गुणगुणतात? अनेकांना वाटतं, हा डासांचा आवाज आहे; पण तो डासांचा नसून त्यांच्या पंखांचा आवाज असतो. आपल्या कानात काही विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया असतात, त्याच्या गंधामुळेही डास आपल्या कानाशी जास्त गुणगुणतात !