खुर्चीतल्या ‘बटाट्यां’साठी ‘मुव्हमेंट स्नॅक्स’!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 05:32 AM2021-08-13T05:32:40+5:302021-08-13T05:33:00+5:30

घरात किंवा एकाच जागी बसून राहिल्यामुळे हालचाली तर थांबल्या, पण अरबट चरबट खाणं  मात्र सुरूच राहिलं. अनेकांच्या तब्येतीवर त्याचा विपरीत परिणाम झाला. 

Movement snacks for the people who seats at home for whole day | खुर्चीतल्या ‘बटाट्यां’साठी ‘मुव्हमेंट स्नॅक्स’!

खुर्चीतल्या ‘बटाट्यां’साठी ‘मुव्हमेंट स्नॅक्स’!

Next

आपल्यापैकी अनेकांना येताजाता स्नॅक्स खायची सवय असते. मग भूक असो-नसो,  गरज असो-नसो, बऱ्याचदा आपण सवयीचे गुलाम असतो. जसं की चहा किंवा कॉफी! अनेकांना दिवसाच्या ठरावीक वेळेस चहा किंवा कॉफी पाहिजे म्हणजे पाहिजे! त्याशिवाय त्यांचं चालत नाही, त्यांच्या मेंदूला ‘चालना’ मिळत नाही आणि कामही पुढे सरकत नाही. स्नॅक्सचंही बऱ्याचदा असंच असतं. कधी जेवायला वेळ नाही, तर कधी, आता पोटात काहीतरी ढकललं पाहिजे, या भावनेनं, या सवयीनं स्नॅक्स खाल्ले जातात.

हेल्थ आणि फिटनेस सायंटिस्ट‌्सच्या मते कोरोनाकाळानं सगळीच गडबड करून टाकली. लहान मुलांपासून ते तरुण आणि वृद्धांपर्यंत सर्वांच्याच शारीरिक क्रिया अतिशय मंदावल्या. घरात किंवा एकाच जागी बसून राहिल्यामुळे हालचाली तर थांबल्या, पण अरबट चरबट खाणं  मात्र सुरूच राहिलं. अनेकांच्या तब्येतीवर त्याचा विपरीत परिणाम झाला. 

लोकांना पुन्हा क्रीयाशील बनवण्यासाठी शास्त्रज्ञांनी लोकांना ‘स्नॅक्स’चाच आधार घ्यायला सांगितलं आहे. दिवसातून तीन-चार वेळा जरी तुम्ही ‘स्नॅक्स’ घेतले तरी तुम्ही टुणटुणीत राहाल, असा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला आहे. अर्थात आपण खातो ते स्नॅक्स आणि शास्त्रज्ञांनी सुचवलेले ‘स्नॅक्स’ यात बरंच अंतर आहे. 

‘द इंटरनॅशनल जर्नल ऑफ एक्सरसाइज सायन्स’ या जगप्रसिद्ध मेडिकल मॅगझिनमध्ये काही शास्त्रज्ञांनी कोरोना काळात शाळा-कॉलेजचे विद्यार्थी आणि नोकरदार यांच्या शरीरिक हालचाली आणि बैठी कार्यपद्धती यात किती बदल झाला आणि त्यासाठी काय केले पाहिजे यासंदर्भात  विस्तृत अभ्यास केला. त्यांचा निष्कर्ष  आहे : लोकांना ‘मुव्हमेंट स्नॅक्स’ची नितांत गरज आहे! म्हणजे कितीही बिझी असलो, तरी आपण चहा-कॉफीसाठी जसा वेळ काढतोच काढतो, तसंच ‘मुव्हमेंट स्नॅक्स’साठीही वेळ काढला पाहिजे. आपण जिथे असू तिथे, आपल्या कार्यालयात शरीरिक हालचालींसाठी वेळ दिला पाहिजे. अगदी दहा मिनिटं जरी तुम्ही त्यासाठी दिलीत, तरी पोटाचा गुब्बारा आणि शारीरिक तक्रारी कमी होतील. 

याच काळात अनेक संस्थांनी विविध अभ्यास केले. ‘कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ने केलेला अभ्यास सांगतो, गेल्या वर्षी केवळ पाच टक्के मुलांनी आपल्या शरीराची आवश्यक तेवढी हालचाल रोज केली. वृद्धांवर झालेल्या एका अभ्यासात म्हटलं आहे, वृद्धांच्या हालचाली तर जवळपास थंडावल्याच आणि भीतीसह इतर अनेक आजारांनी त्यांना घेरलं. केंट स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी आपले विद्यार्थी आणि स्टाफ यांच्यावर विस्तृत अभ्यास केला आणि निरीक्षण मांडलं की, ‘रिमोट लर्निंग’ आणि बैठी जीवनशैली यामुळे या सर्वांचंच एका जागी बसून राहण्याचं प्रमाण आठवड्यात तब्बल आठ ते दहा तासांनी वाढलं आहे.
 
या अभ्यासात आणखी एक आश्चर्यकारक माहिती उजेडात आली आहे. ‘हेल्थ ॲण्ड ह्युमन सर्व्हिसेस’चे संशोधक प्रो. जेकब बर्कले यांच्या माहितीनुसार, ज्यांना व्यायामाची आवड होती, जे कायम फिट ॲण्ड फाइन होते, अशा व्यायामप्रेमी लोकांवर गेल्या वर्षी जास्त विपरीत परिणाम झाला आहे. व्यायामाबाबत जे आधीपासूनच हौशे-नवशे-गवशे होते, त्यांनी रडतखडत का होईना, थोडाफार व्यायाम सुरू ठेवला; पण व्यायामाला एक दिवसही खाडा न पाडणाऱ्या बहुतांश ‘फिट’ लोकांनी मात्र गेल्या वर्षी व्यायाम सोडला, तो सोडलाच! अर्थात या सर्व लोकांना तीव्र स्वरूपाचा व्यायाम करायची सवय होती. ते जिम, क्लबमध्ये जात होते, पण अचानक या संस्था बंद पडल्याने व्यायामप्रेमींचा व्यायामही बंद पडला. नुसत्या चालण्यानं काय व्यायाम होतो का, या त्यांच्या मानसिकतेमुळे त्यांना अधिकच बैठं बनवलं.

व्यायाम जिममध्ये जाऊनच केला पाहिजे असं नाही. घरच्याघरी, अगदी ऑफिसातही दहा मिनिटांत आपल्याला ‘आवश्यक’ तेवढा व्यायाम होऊ शकतो, हे संशोधकांनी निदर्शनास आणून दिलं आहे. अर्थात हा झाला अगदी गरजेपुरता व्यायाम. ज्यांना शक्य आहे त्यांनी अधिक व्यायाम केला तर चांगलंच. पण किमान ‘मुव्हमेंट स्नॅक्स’ तरी वेळच्या वेळी घ्या, असा शास्त्रज्ञांचा आग्रह आहे. 

‘मुव्हमेंट स्नॅक्स’चे ऑनलाइन क्लासेस! 
लोकांची जीवनशैली बिघडल्यामुळे आणि त्यांची व्यायामाची गरज ओळखून अनेकांसाठी ‘मुव्हमेंट स्नॅक्स’ हा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. अनेक ठिकाणी आता यासंदर्भातले ऑनलाइन कोर्सेसही सुरू झाले आहेत. कार्यालयात आल्यावर किंवा मधल्या वेळात पाच-दहा मिनिटांच्या वेगवेगळ्या हालचाली करून आपली तब्येत उत्तम कशी ठेवता येईल, याचं मार्गदर्शन या ‘कोर्स’मधून केलं जातं. काही कंपन्यांनी तर आपल्या सर्वच कर्मचाऱ्यांसाठी हे ‘पॅकेज’ सक्तीचं केलं आहे. त्यामुळे चहा-कॉफी किंवा स्नॅक्सच्या काळात ‘मुव्हमेंट स्नॅक्स’चे हे वर्ग चालतात. शरीराचं संतुलन, गतिशीलता, सामर्थ्य आणि हालचालींची एकूणच गुणवत्ता वाढविण्यासाठी या स्नॅक्सची बाजारात सध्या चलती आहे

Web Title: Movement snacks for the people who seats at home for whole day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.