खिशातल्या नाण्यांना समजू नका 'चिल्लर'; ते आहे आजारांचं माहेरघर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 10:19 AM2020-02-19T10:19:11+5:302020-02-19T10:22:19+5:30
खिशातल्या नाण्यांवरील किटाणू, बुरशीमुळे त्वचारोगांसह विविध आजारांचा धोका
वडोदरा: दैनंदिन आयुष्यात आपण अनेक व्यवहारांसाठी नाण्यांचा वापर करतो. मात्र या नाण्यांमुळे आरोग्याला मोठा धोका असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. एका हातातून दुसऱ्या हातात जाणाऱ्या नाण्यांमुळे अॅलर्जी आणि त्वचेशी संबंधित विविध आजार होऊ शकतात. एमएस विद्यापीठाच्या पर्यावरण अभ्यास विभागानं केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. नाण्यांवर विविध प्रकारची बुरशी असते. त्यामुळे अनेक रोग होण्याची शक्यता वाढते, असं संशोधन सांगतं.
'आमच्या विद्यार्थ्यांनी जवळपास १०० नाण्यांचा अभ्यास केला. यापैकी ३ नाणी सोडल्यास बाकीच्या सर्व नाण्यांवर विविध प्रकारचे किटाणू आणि बुरशी पाहायला मिळाली. या नाण्यांवर १२ प्रकारच्या बुरशी दिसून आल्या,' अशी माहिती प्राध्यापक अरुण आर्य यांनी दिली. एमएस विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी संशोधनासाठी लोखंड, क्रोमियम, तांब, निकेल, जस्त या धातूंची नाणी वापरली होती.
नाण्यांवर ऐस्परगिलस निगर आणि पेनिसिलियम सिम्पलिसिसिमम अशा दोन प्रकारच्या बुरशी सर्वाधिक आढळून आल्याचं अरुण आर्य यांनी सांगितलं. याशिवाय नाण्यांवर फ्युजेरियम, रिजोपस आणि अल्टरनेरिया एसपीपी या बुरशीदेखील सापडल्या. यापैकी ऐस्परगिलस निगर बुरशीपासून जैविक रसायन तयार होतं. यामुळे नाण्याच्या पृष्ठभागाची झीज होऊन त्वचा आजार उद्भवण्याचा धोका वाढतो.
नाण्यांवरील बुरशी आणि किटाणूंचा सर्वाधिक धोका रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना असतो. याशिवाय कर्करोग, क्षयरोगाचा सामना करत असलेल्या, रोगप्रतिकार शक्ती कमी असूनही अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या व्यक्तींनादेखील नाण्यांवरील बुरशीमुळे विविध प्रकारच्या शारीरिक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. बुरशी अशा व्यक्तींच्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्यास आणि तिथे तिची वाढ होऊ लागल्यास फुफ्फुसांवर अतिशय प्रतिकूल परिणाम होऊ शकतात.