Mucormycosis: स्टिरॉइडचा गैरवापर हे म्युकरमायकोसिसची बाधा होण्याचे महत्त्वाचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 09:17 AM2021-05-16T09:17:31+5:302021-05-16T09:18:13+5:30
एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया - या बुरशीच्या बाधेमुळे संबंधित रुग्णाचा चेहरा, नाक, डोळा, मेंदू यावर दुष्परिणाम होऊ शकतो.
नवी दिल्ली : स्टिरॉईड औषधांचा होणारा गैरवापर हे कोरोना रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची बाधा होण्याचे महत्वाचे कारण आहे असे एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले. देशात म्युकरमायकोसिसची बाधा झाल्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
डॉ. गुलेरिया म्हणाले की, विषाणू तसेच बुरशीमुळे होणारा संसर्ग यावर उपचार करताना रुग्णालयांनी संसर्ग उपचारांसंदर्भातील सर्व नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत. या संसर्गांमुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत. अशा वेळी रुग्णांवर उपचार करताना रुग्णालयांनी अधिक दक्षता घेतली पाहिजे. म्युकरमायकोसिस या बुरशीचे अस्तित्व माती, हवा व अन्नामध्येही आढळून येते. मात्र या बुरशीची कोरोनाचा संसर्ग होण्यापूर्वी बाधा झाल्याचे प्रकार खूपच कमी आहेत. मात्र कोरोना संसर्गामुळे आता या बुरशीची बाधा झाल्याच्या अनेक घटना घडत आहेत.त्यांनी सांगितले की, म्युकरमायकोसिसची बाधा झालेल्या २३ रुग्णांवर एम्समध्ये उपचार करण्यात आले.
या बुरशीच्या बाधेमुळे संबंधित रुग्णाचा चेहरा, नाक, डोळा, मेंदू यावर दुष्परिणाम होऊ शकतो. मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिसची बाधा होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या रक्तातील शर्करा सतत तपासणे आवश्यक बनले आहे.