Mumbai Rain Update : जखम असल्यास व पावसाच्या पाण्यातून चालल्यास लेप्टोची शक्यता अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 07:17 PM2019-09-04T19:17:44+5:302019-09-04T19:18:16+5:30

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात दि. ०३ व ०४ सप्टेंबर २०१९ रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या सारख्या मोठ्या पावसानंतर महापालिका क्षेत्रात लेप्टोच्या (Leptospirosis) रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते.

Mumbai Rain Update : know the symptoms and causes of Leptospirosis | Mumbai Rain Update : जखम असल्यास व पावसाच्या पाण्यातून चालल्यास लेप्टोची शक्यता अधिक

Mumbai Rain Update : जखम असल्यास व पावसाच्या पाण्यातून चालल्यास लेप्टोची शक्यता अधिक

googlenewsNext

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या सारख्या मोठ्या पावसानंतर महापालिका क्षेत्रात लेप्टोच्या (Leptospirosis) रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन ज्या नागरिकांचा पावसाच्या पाण्याशी संबंध आला होता, तसेच ज्या व्यक्ती गम बूट वापरण्यासारखी खबरदारी न घेता पावसाच्या पाण्यातून चालत जातात, त्यांना लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता असते. तर जखम / जखमा / खरचटलेला भाग असलेल्या ज्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संबंध आला असेल, अशा व्यक्तींना लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच पावसाच्या पाण्याशी संपर्क आलेल्या व्यक्तींनी २४ ते ७२ तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार करणे (Preventionary Medication) आवश्यक आहे, अशी अत्यंत महत्त्वाची सूचना महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी केली आहे.

अतिवृष्टी दरम्यान पावसाच्या साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून नागरिकांना चालावे लागते. याच पाण्यात 'लेप्टोस्पायरोसिस' या रोगाचे 'लेप्टोस्पायरा' (स्पायराकिट्स) या सूक्ष्मजंतूचा प्रादूर्भाव असू शकतो. उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी इत्यादी प्राण्यांच्या लघवीद्वारे (मूत्रातून) लेप्टोचे सूक्ष्मजंतु पावसाच्या पाण्यात संसर्गीत होतात. अशा बाधीत झालेल्या पाण्याशी माणसाचा संबंध आल्यास त्याला लेप्टोची बाधा होण्याची शक्यता असते. तसेच व्यक्तीच्या पायाला किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला जखम असेल, अथवा साधे खरचटलेले जरी असेल; तरी अशा छोट्याश्या जखमेतून सुद्धा लेप्टोचे जंतू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे ज्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आला असेल, त्यांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार करावेत, असे आवाहन डॉ. केसकर यांनी केले आहे.

वरील अनुषंगाने महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे कळविण्यात आलेली अतिरिक्त व महत्त्वाची माहिती पुढीलप्रमाणे आहे:

'लेप्टोस्पायरोसिस' बाबत महत्त्वाची माहिती

ज्या व्यक्ती पुराच्या पाण्यातून एकदाच चालल्या आहेत, त्या व्यक्ती लेप्टोच्या अनुषंगाने 'कमी जोखीम' या गटात मोडतात.

एकदाच पुराच्या पाण्यातून चाललेल्या पण अंगावर किंवा पायावर जखम असलेल्या किंवा चुकून पुराचे पाणी तोंडात गेलेल्या व्यक्ती या 'मध्यम जोखीम' या सदरात येतात.
अर्धातासापेक्षा अधिक काळ पुराच्या पाण्यातून चालल्यास किंवा सतत पुराच्या पाण्याशी संपर्क आल्यास अशा व्यक्ती 'अतिजोखीम' या गटात मोडतात.

'लेप्टोस्पायरोसिस' हा रोग 'लेप्टोस्पायरा' (स्पायराकिटस) या सूक्ष्मजंतुमुळे होतो. उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी, बैल तसेच इतर काही प्राणी या रोगाचे स्रोत आहेत.

बाधित प्राण्यांच्या लघवीद्वारे संसर्गित झालेल्या पाण्याशी संबंध येताच मनुष्याला 'लेप्टोस्पायरोसिस' या रोगाची बाधा होऊ शकते. निरनिराळ्या प्रकारची जनावरे सदर सूक्ष्मजंतुचे वाहक असतात. पण त्यांच्यात सदर रोगाची लक्षणे दिसून येत नाहीत.

मनुष्यापासून मनुष्याला लेप्टोच्या संसर्गाची बाधा होत नाही.

शहरी विभागात लेप्टोस्पायरा हे सूक्ष्मजंतु उंदीर, कुत्रे इत्यादी प्राण्यांमध्ये आढळतात. संसर्गित जनावरांच्या मुत्राद्वारे दूषित झालेले पाणी वा माती यामार्फत मनुष्याला संसर्ग होतो. हा संसर्ग जखम झालेली त्वचा, डोळे, नाक याद्वारे होतो.

पावसाळ्यात व पूर आल्यानंतर किंवा अतिवृष्टी झाल्यानंतर लोकांना दूषित पाण्यातून चालावे लागले, तर शरीरावरील जखमांमधून या रोगाचे जंतू आपल्या शरीरात प्रवेश करु शकतात.

लक्षणे

या रोगाची ताप, तीव्र डोकेदुखी, थंडी वाजणे, स्नायुदुखी, उलटी, कावीळ, रक्तस्त्राव इत्यादी लक्षणे आहेत. रुग्णांना श्वासोच्छश्वास करण्यास त्रास होणे, मूत्रपिंड व यकृत निकामी होणे, अशी लक्षणेही आढळतात. त्यांना योग्यवेळी औषधोपचार न मिळाल्यास व्यक्तीचा मृत्यु होण्याचा धोका संभवतो.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी

  • पावसाळ्यात कोणताही ताप डेंग्यू, मलेरिया अथवा 'लेप्टोस्पायरोसिस' असू शकतो. त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
  • पायावर जखम असल्यास साचलेल्या पाण्यातून ये-जा करणे टाळावे किंवा गमबुटाचा वापर करावा.
  • साचलेल्या पाण्यातून चालून आल्यावर पाय साबणाने स्वच्छ धुवून कोरडे करावे.
  • साचलेल्या पाण्यातून चालल्यामुळे 'लेप्टोस्पायरोसिस' संसर्ग होण्याची शक्यता असते त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 'लेप्टोस्पायरोसिस' प्रतिबंधात्मक उपचार तातडीने घेणे आवश्यक आहे.
  • ताप आल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • पुरेशी विश्रांती, पोषक आहार व वेळेत उपचार घ्यावा.
  • उंदीर- घुशींचा नायनाट करावा.
  • उंदीर नियंत्रणासाठी उंदराला अन्न मिळू न देणे, उंदराचे सापळे रचणे, त्याला विष घालणे इत्यादी मार्ग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार वापरात आणावे.
  • घरात व आजुबाजूला कचरा साठणार नाही, याची दक्षता घ्यावी व कच-याची विल्हेवाट लावावी.

 

डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने प्रतिबंधात्मक औषधोपचार आवश्यक

वरील तपशिलानुसार ज्या व्यक्ती पुराच्या पाण्यातून एकदाच चालल्या असून ज्यांच्या पायावर किंवा पाण्याशी संबंध आलेल्या शरीराच्या भागावर जखम नसेल अशा व्यक्ती लेप्टोच्या अनुषंगाने 'कमी जोखीम' या गटात मोडतात. डॉक्टरांनी या व्यक्तींची आवश्यक ती तपासणी केल्यानंतर 'डॉक्सीसायक्लीन' (२०० मिलीग्रॅम) या कॅप्सूलचे एकदा सेवन करावयास सांगावयाचे आहे.

ज्या व्यक्ती पुराच्या पाण्यातून चालल्या असून त्यावेळी ज्यांच्या पायावर किंवा पाण्याशी संबंध आलेल्या शरीराच्या भागावर जखम होती, अशा व्यक्ती लेप्टोच्या अनुषंगाने 'मध्यम जोखीम' या गटात मोडतात. डॉक्टरांनी या व्यक्तींची आवश्यक ती तपासणी केल्यानंतर 'डॉक्सीसायक्लीन' (२०० मिलीग्रॅम) या कॅप्सूलचे दररोज एक वेळा याप्रमाणे सलग तीन दिवस सेवन करावयास सांगावयाचे आहे.

ज्या व्यक्ती पुराच्या पाण्यातून एका पेक्षा अधिक वेळा चालल्या किंवा ज्यांनी साचलेल्या पाण्यात काम केले आहे (उदाहरणार्थ: बचाव कार्य करणारे पालिका कर्मचारी), अशा व्यक्ती लेप्टोच्या अनुषंगाने 'अतिजोखीम' या गटात मोडतात. डॉक्टरांनी या व्यक्तींची आवश्यक ती तपासणी केल्यानंतर 'डॉक्सीसायक्लीन' (२०० मिलीग्रॅम) या कॅप्सूलचे आठवड्यातून एक वेळा याप्रमाणे सलग सहा आठवडे सेवन करावयास सांगावयाचे आहे.

गरोदर स्त्रिया व ८ वर्षाखालील बालकांना डॉक्सीसायक्लीन देऊ नये. त्याऐवजी गरोदर स्त्रियांना ५०० मिलीग्रॅम अझिथ्रोमायसिन टॅब्लेट तर ८ वर्षाखालील बालकांना २०० मिलीग्रॅम अझिथ्रोमायसिन सिरप वरील तपशीलानुसार द्यावयाचे आहे.

Web Title: Mumbai Rain Update : know the symptoms and causes of Leptospirosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.