16 महिन्यांत 5 वेळा हार्ट अटॅक तरी जिवंत आहे महिला; 5 स्टेंट, 6 अँजिओप्लास्टी, डॉक्टर हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 10:52 AM2023-12-07T10:52:20+5:302023-12-07T10:53:25+5:30
जयपूरहून बोरिवलीला परतत असताना महिलेला सप्टेंबर 2022 मध्ये ट्रेनमध्ये पहिला हार्ट अटॅक आला.
मुलुंडमध्ये राहणाऱ्या 51 वर्षीय महिलेला गेल्या 16 महिन्यांत 5 वेळा हार्ट अटॅक आला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, पाच स्टेंट, सहा अँजिओप्लास्टी आणि एक कार्डियाक बायपास सर्जरी झाली आहे. 1 ते 2 डिसेंबर दरम्यान तिला हार्ट अटॅक आला. सतत आरोग्याशी संबंधित या गोष्टीचा का सामना करावा लागतोय हे महिलाला आता जाणून घ्यायचं आहे. तसेच तीन महिन्यांनंतर नवीन ब्लॉकेज निर्माण होईल अशी भीती तिला वाटत आहे.
जयपूरहून बोरिवलीला परतत असताना महिलेला सप्टेंबर 2022 मध्ये ट्रेनमध्ये पहिला हार्ट अटॅक आला. रेल्वे अधिकाऱ्यांनी तिला अहमदाबाद येथील सार्वजनिक रुग्णालयात नेलं. डॉ. हसमुख रावत हे तिचे दोन अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरीचे जुलैपासूनचे हृदयरोगतज्ज्ञ आहेत. दर काही महिन्यांनी हार्ट अटॅकची लक्षणं परत येतात, त्यात तीव्र छातीत दुखणे, ढेकर येणे आणि अस्वस्थता यांचा समावेश होतो.
महिलेने सांगितलं की, मला फेब्रुवारी, मे, जुलै आणि नोव्हेंबरमध्ये हार्ट अटॅक आला. डायबेटीस, हाय कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणा यासारख्या इतर समस्याही आहेत. सप्टेंबर 2022 मध्ये वजन 107 किलो होतं आणि तेव्हापासून वजन 30 किलो कमी झालं आहे. तिला 'PCSK9 इनहिबिटर' हे कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या औषधाचे इंजेक्शन देण्यात आलं आहे, त्यामुळे त्यांची कोलेस्टेरॉलची पातळी कमी झाली आहे आणि डायबेटीस नियंत्रणात आहे, मात्र हार्ट अटॅक सुरूच आहे.
डॉ. रावत म्हणाले की, रुग्णांना एकाच ठिकाणी वारंवार ब्लॉकेजेस होतात हे माहीत नसलं तरी महिलेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नवीन ब्लॉकेजेस विकसित होत आहेत. पहिला हार्ट अटॅक 90% ब्लॉकेजमुळे आला होता आणि पुढच्या वेळी 99% ब्लॉकेज होतं. वैद्यकीयदृष्ट्या, महिला नशीबवान ठरली, कारण तिला हार्ट अटॅक NSTEMI किंवा नॉन-एसटी-एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फेक्शन होता जो हृदयाच्या ऑक्सिजनच्या गरजा पूर्ण न झाल्यास होतो.