पीळदार शरीराच्या नादात हार्ट अटॅकला निमंत्रण; धोका कसा टाळाल?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 08:10 AM2023-10-16T08:10:57+5:302023-10-16T08:11:08+5:30
जि ममध्ये व्यायाम करताना हार्ट अटॅक आला आणि मृत्यू झाला. गेल्या काही वर्षांत अशा घटना आपल्याला वारंवार ऐकू येत आहे.
डॉ. कल्याण मुंडे, हृदयविकार तज्ज्ञ, जे.जे. रुग्णालय, मुंबई
जि ममध्ये व्यायाम करताना हार्ट अटॅक आला आणि मृत्यू झाला. गेल्या काही वर्षांत अशा घटना आपल्याला वारंवार ऐकू येत आहे. साधारणतः लोक कशासाठी व्यायाम करतात, याचे उत्तर शोधले तर आपल्या लक्षात येईल की, वजन कमी करणे, शरीर पिळदार करणे, शारीरिक क्षमता वाढविणे, पोट कमी करणे, ताणतणाव कमी करणे, हाडांमध्ये बळकटी प्राप्त करणे ही सर्वसाधारण कारणे आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये प्रामुख्याने वजन कमी करणे आणि शरीर पिळदार बनविणे यासाठी अनेक जण जिममध्ये जातात. मात्र आपल्याला सावध राहून व्यायाम करणे गरजेचे आहे.
आपण जर दहा वर्षांपूर्वीचा फोटो अल्बम पहिला तर लक्षात येईल की, पुरुषांचे वजन ६० ते ७० किलो तर स्त्रियांचे वजन ५० ते ५५ किलोच्या घरात होते. त्या तुलनेने आता पुरुष आणि महिलांचे वजन नक्कीच जास्त आहे. त्याला अर्थात आधुनिक जीवनशैली कारणीभूत आहे. काही व्यक्ती व्यायाम करतात, त्यावेळी अतिरिक्त प्रोटीन (सप्लिमेंट्स) घेतात. या अतिरिक्त स्प्लिटनेट्स ॲलर्जीसारखे दुष्परिणाम होऊन (अँनाफ्लेक्ससीस सारखी परिस्थिती) ते जीवघेणे ठरू शकते. अतिव्यायाम केल्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात लॅक्टिक ॲसिड तयार होते, त्यामुळे काही व्यक्ती बेशुद्धावस्थेत जातात. हा प्रकार सुद्धा काही वेळा जीवघेणा ठरून शकतो. त्यासोबत खूप अधिक प्रमाणात व्यायाम केल्यामुळे शारीरिक थकवा मोठ्या प्रमाणात जाणवून हृदयावर ताण येतो. त्यामुळे हृदयाची गती थांबते त्याला हृदयाची अनियमित गती (अरिदमिया) असे म्हणतात. ज्या व्यक्तींना अगोदरच हृदयाचा काही त्रास असेल तर अधिक व्यायाम केल्यास त्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो.
आहार काय घेता, हे महत्त्वाचे!
व्यायाम शरीरासाठी गरजेचा आहे. तो केला पाहिजे. मात्र कोणी किती व्यायाम केला पाहिजे याचे एक शास्त्र आहे. आपण आपली शारीरिक क्षमता बघून व्यायाम केला पाहिजे.
कुणीतरी व्यक्ती व्यायाम करते आहे. तिला त्याचा अधिक फायदा झाला म्हणून व्यायाम करणे चुकीचे आहे. जीम ट्रेनर, डॉक्टर यांचा सल्ला घेऊन आपल्या शरीर यष्टीनुसार व्यायाम केला पाहिजे.
वजन कमी करण्यासाठी व्यायाम करत असाल तर हे लक्षात ठेवले पाहिजे वजन कमी करण्यात व्यायामाचा वाटा २० टक्के आहे ८० टक्के तुम्ही आहार कशा पद्धतीने घेता यावर तुमचे वजन कमी जास्त होऊ शकते.
हार्ट अटॅकचा धोका कसा टाळाल?
बैठ्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी संतुलित आहार आणि पुरेसा (अतिरिक्त) व्यायाम करावा. तसेच रोज ७-८ तास झोप घ्यावी.
सप्लिमेंट्सवर विश्वास ठेवण्यापेक्षा सिझनल फळे आणि भाज्या खा. ताणतणाव टाळण्यासाठी योग मेडिटेशन करा.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात छोटे-छोटे बदल केले तरी आपले आरोग्य चांगले राहते. कमी चरबी (फॅट) असलेले, कमी साखर असलेले पदार्थ आरोग्यासाठी चांगले असतात. तसेच चाळीशी ओलांडल्यानंतर हृदयाची तपासणी करून घेणे
गरजेचे आहे.