सावधान! रहस्यमयी आजाराची दहशत; लहान मुलांच्या लिव्हरवर करतोय अटॅक, 'ही' आहेत लक्षणं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 04:22 PM2022-04-19T16:22:58+5:302022-04-19T16:28:43+5:30
Liver Disease : अनेक देशांत मुलं लिव्हरशी संबंधित आजाराचा सामना करत आहेत. अनेकांना याची लागण झाली आहे.
कोरोना पाठोपाठ आता आणखी एका रहस्यमयी आजाराचा कहर पाहायला मिळत आहे. चिमुकल्यांना तो आपल्या जाळ्यात ओढत असून त्याची दहशत निर्माण झाली आहे. हा आजार थेट लहान मुलांच्या लिव्हरवर अटॅक करत असल्याने पालकांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. अमेरिकेसह अनेक देशांत मुलं लिव्हरशी संबंधित आजाराचा सामना करत आहेत. अनेकांना याची लागण झाली आहे. अमेरिकेसह ब्रिटन, स्पेन, डेन्मार्क आणि नेदरलँडमध्ये या आजाराची प्रकरणं समोर आली आहेत.
यूकेतील आरोग्य सुरक्षा संस्थेने (UKHSA) 6 एप्रिलला दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर आणि शास्त्रज्ञ जानेवारी 2022 पासून मुलांमध्ये हेपेटायटिसच्या जवळपास 74 प्रकरणांची तपासणी करत आहेत. तर दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) हा आजार हेपेटायटिस व्हायरसमुळे (Hepatitis Virus) झालेला नाही, असं सांगितलं आहे. काही प्रकरणं ही एडिनो व्हायरस आणि सार्स कोव्ह-2 ची असल्याची माहिती मिळाल्याचं डब्ल्यूएचओने सांगितलं.
रिपोर्टनुसार अमेरिकेच्या अलबामामध्ये गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 1-6 वर्षे वयोगटातील 9 मुलं या आजाराने ग्रस्त असल्याची आढळली होती. WHO ने सांगितल्यानुसार, यापैकी काही मुलांना स्पेशालिस्ट युनिटमध्ये भरती करावं लागलं. 6 जणांना लिव्हर ट्रान्सप्लान्ट करण्याची गरज होती. या आजाराची प्रकरणं वेगाने वाढू शकतात अशी शक्यताही WHO ने वर्तवली आहे.
UKHSA च्या मते, या आजाराच्या संभाव्य कारणांमध्ये एडिनो व्हायरसचा एखादा समूह असू शकतो. ज्यामुळे सामान्य सर्दीसारखे श्वसनसंबंधी आजार होतात. या व्हायरसने संक्रमित रुग्ण लवकर बरे होतात. पण हा व्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पोहोचण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे हा आजार वेगाने पसरू शकतो.
अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही मुलं आजारी का पडली आहेत, याची माहिती नसल्याचं म्हटलं आहे. पण एडिनो व्हायरसच्या प्रकरणांमध्ये वेगाने वाढ झाल्याचं म्हटलं आहे. बहुतेक एडिनो व्हायरसमुळे सर्दी-खोकल्यासारखी लक्षणं दिसतात. ताप, घशात खवखव जाणवते. पण काही प्रकरणात पोट आणि आतड्यांमध्ये सूजेसह इतर समस्याही निर्माण होऊ शकतात. हा आजार एडिनो व्हायरस 41 आणि हेपेटायटिसमुळे होऊ शकतो. पण काही रिसर्चनंतरच स्पष्टपणे सांगू शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.