फंगल इंन्फेक्शन दूर करण्यासाठी कडूलिंबाचा असा करा वापर!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 10:09 AM2018-08-25T10:09:05+5:302018-08-25T10:21:39+5:30
इंफेक्शनपासून सुटका मिळवण्यासाठी प्रत्येक वेळेस औषधोपचारांची गरज नसते. काही वेळेस कडूलिंबाची पानंदेखील या त्रासापासून सुटका मिळवण्यास फायदेशीर ठरतात.
अनेकदा पायाच्या तळव्यांना घाम आल्याने शूज काढल्यानंतर दुर्गंधी येण्याची समस्या वाढते. याचं कारण म्हणजे फंगल इंन्फेक्शन! काही वेळेस यामुळे लाल चट्टेही येतात. अशा इंफेक्शनपासून सुटका मिळवण्यासाठी प्रत्येक वेळेस औषधोपचारांची गरज नसते. काही वेळेस कडूलिंबाची पानंदेखील या त्रासापासून सुटका मिळवण्यास फायदेशीर ठरतात.
इंफेक्शन कसे दूर होईल ?
अनेक त्वचाविकारांना दूर करण्याची क्षमता कडूलिंबामध्ये आहे. त्यामधील निम्बिडोल आणि गेड्युनिन घटक त्यातील अॅन्टीफंगल घटकांमुळे इन्फेक्शन दूर करण्यास मदत करतात.
कसे वापराल कडूलिंब ?
कडूलिंबाचे तेल हे फंगल इंफेक्शन दूर करण्यासाठी प्रामुख्याने वापरले जाते. पण ते घरात उपलब्ध नसल्यास कडूलिंबाच्या पानांची पेस्ट लावल्यास त्यामुळेदेखील इन्फेक्शन कमी करण्यास मदत होते.
कडूलिंबाचे तेल
इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी कडूलिंबाच्या तेलाचे काही थेंब लावावेत. फंगल इन्फेक्शन कमी करण्यासाठी दिवसातून तीन वेळा हा प्रयोग करावा. यामुळे नखांवरील इंफेक्शनदेखील दूर होण्यास मदत होते.
कडूलिंबाची पानं
कडूलिंबाची पानं स्वच्छ धुवून त्याची पातळ पेस्ट करावी. यामध्ये लिंबाचा रस व चिमूटभर हळद मिसळावी. तयार पेस्ट त्वचेवर 20-30 मिनिटे लावून सुकू द्यावी. नंतर पाण्याने पाय स्वच्छ धुवावेत. हा प्रयोग नियमित दिवसातून दोनदा केल्यास फंगल इन्फेक्शनपासून बचाव होण्यास मदत होते.