तणावामुळे अनेक शारिरीक गंभीर समस्या निर्माण होतात, वेळीच करा हे नैसर्गिक उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 12:58 PM2022-05-22T12:58:22+5:302022-05-22T13:22:02+5:30
शरीरातील कॉर्टिसोल हार्मोनच्या स्रावामुळे तणाव निर्माण होतो. इतर अनेक कारणांमुळे तणाव वाढतो. ती कारणे, लक्षणे आणि तणावावर मात करण्याचे काही मार्ग (Natural Ways to Relieve Stress) जाणून घेऊया.
आजकाल बहुतेक लोक तणावाखाली राहतात. छोट्या छोट्या गोष्टींचा ताण घेतात. आज लोक ज्या प्रकारच्या जीवनशैली जगतात, त्यात तणाव येणं ही एक सर्वसामान्य समस्या बनत चालली आहे. काहींना कामाच्या दडपणामुळे तणाव असतो, तर काहींना कौटुंबिक, आर्थिक परिस्थिती, नोकरी गमावणे, नोकरी न मिळण्याचा ताण, दैनंदिन जीवनातील समस्या, कोणतीही अप्रिय घटना घडणे, प्रिय व्यक्ती गमावणे इत्यादी समस्या देखील कारणीभूत ठरू शकतात. ताण-ताणतणाव आपल्याला फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही हळूहळू आजारी बनवू शकतो. तणावावर वेळीच नियंत्रण ठेवले नाही तर नैराश्य येऊ शकते. शरीरातील कॉर्टिसोल हार्मोनच्या स्रावामुळे तणाव निर्माण होतो. इतर अनेक कारणांमुळे तणाव वाढतो. ती कारणे, लक्षणे आणि तणावावर मात करण्याचे काही मार्ग (Natural Ways to Relieve Stress) जाणून घेऊया.
तणावामुळे होते काय?
StylesAtlife मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, प्रत्येकाचा ताण वेगवेगळा असू शकतो, काहींना कौटुंबिक समस्यांबद्दल, काहींना आरोग्य, ऑफिसच्या कामाचा किंवा मित्रांपासून विभक्त झाल्यामुळे किंवा दूर जाण्याचा तणाव असू शकतो. इतर अनेक कारणांमुळे देखील तणाव निर्माण होतो, ती कारणे खालील प्रमाणे आहेत-
- नोकरी गेल्यामुळे पदोन्नतीऐवजी पदावनती
- वैवाहिक जीवनात वाद, भांडणे, घटस्फोट
- एखाद्या प्रिय व्यक्तीच्या अचानक मृत्यूमुळे किंवा गंभीर आजारामुळे तणाव
- जुनाट आजार, शारीरिक इजा
- भावनिकदृष्ट्या चिंताग्रस्त असणे
- समवयस्कांचा दबाव, गुंडगिरी
- नोकरीतून निवृत्ती, एकटेपणा
- आर्थिक टंचाई
- तणावाची लक्षणे
- उत्साह कमी होणे, थकवा येणे
- डोकेदुखी, निद्रानाश
- चिडचिड
- शरीर आणि स्नायू दुखणे
- लक्ष केंद्रित करण्यात अडचण
- तणावामुळे नैराश्य
- वारंवार सर्दी, इन्फेक्शन
- उच्च रक्तदाब, हृदयविकार
- वेगवान हृदयाचे ठोके, छातीत दुखणे
- वर्तन बदल
- पोटदुखी, जुलाब, बद्धकोष्ठतेची समस्या
- छातीत जळजळ
- वजन वाढणे किंवा कमी होणे
- मूड स्विंग, चिंता
तणाव दूर करण्याचे नैसर्गिक मार्ग
जर तुम्ही तणावग्रस्त असाल तर तुम्ही दररोज ३० मिनिटे व्यायाम केला पाहिजे. यासाठी तुम्ही फिरायला जा, कोणताही खेळ खेळा. घराबाहेर पडणे आणि ताज्या हवेत फिरायला जाणे यामुळे तणाव कमी होतो. तुम्हाला आतून बरे वाटू शकतं.
योगासने आणि ध्यानधारणा करूनही तणाव कमी करता येतो. मन शांत करण्यासाठी योग आणि ध्यान ही उत्तम तंत्रे आहेत. यामुळे मनाला शांती मिळते. आपल्या नित्यक्रमात १५ ते २० मिनिटे योग आणि ध्यान नक्की करा. त्यामुळे रोज येणार्या समस्यांमधील तणाव दूर होण्यास मदत होते. तसेच योगासने केल्याने तुम्ही इतर अनेक शारीरिक समस्या देखील टाळू शकता.
दररोज किमान ७ ते ८ तासांची झोप घ्या. कमी झोप आणि विश्रांतीचा अभाव यामुळेही तणावाची पातळी वाढू शकते. सतत थकवा जाणवल्याने तणावाची मानसिक लक्षणे वाढतात.