'बड अन् ड्रॉपने कान स्वच्छ करू नका, महागात पडेल'; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 02:13 PM2022-06-07T14:13:50+5:302022-06-07T14:19:59+5:30
बड किंवा ड्रॉप वापर करून कधीही कान स्वच्छ करू नये. घरच्या घरी कान स्वच्छ करण्याची पद्धत चुकीची आहे.
- पंकज पाटील
बदलापूर : कान स्वच्छ करण्यासाठी अनेकजण बडचा वापर करतात, तर काहीजण ड्रॉपचा वापर करून कान साफ करत असतात. कानाची निगा राखायची असेल तर हे दोन्ही मार्ग अवलंबणे चुकीचे आहे. कान स्वच्छ करण्याची नैसर्गिक प्रक्रिया अविरत सुरू असते, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.
कानाची स्वच्छता कशी कराल?
बड किंवा ड्रॉप वापर करून कधीही कान स्वच्छ करू नये. घरच्या घरी कान स्वच्छ करण्याची पद्धत चुकीची आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीला त्रास होऊ शकतो.
मळ बाहेर पडणे ही नैसर्गिक प्रक्रिया-
कानाची निगा राखण्याची जबाबदारी ही नैसर्गिकरीत्या आपल्या शरीरावर असते. कानात मळ जमा झाल्यास त्याच्यावर एक विशिष्ट प्रक्रिया होऊन तो मळ पांढऱ्या रंगाच्या भुग्याप्रमाणे बाहेर फेकला जातो.
कानात बड नकोच-
कान स्वच्छ करण्यासाठी अनेकजण बडचा वापर करतात, त्यामुळे कानातील मळ हा बाहेर येण्याऐवजी आणखी आत ढकलला जातो. अशा परिस्थितीत सर्व मळ कानाच्या पडद्याजवळ गोळा होऊन ऐकायला कमी येण्याचा त्रास सुरू होतो.
लहान मुलांच्या बाबतीत अधिक काळजी घ्या-
कान दुखण्याचा सर्वाधिक प्रकार लहान मुलांच्या बाबतीत होतो. त्यामुळे त्यांची काळजी सर्वाधिक घेणे गरजेचे आहे. कानात गरम तेल टाकणे हा चुकीचा पायंडा आहे. त्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे.
...तर डॉक्टरांना भेटायला हवे-
कान दुखणे, कानातून रक्त येणे, कानातून पू बाहेर पडणे किंवा कमी ऐकू येणे, भुणभुण आवाज येत असेल तर सर्वात डॉक्टरांकडून तपासणी करणे आवश्यक आहे.
कानाची निगा कशी राखावी, याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लहान मुलांच्या कानाच्या बाबतीत कोणताही प्रयोग करू नये. नैसर्गिकरीत्या कानातील घाण बाहेर फेकली जाते. त्यामुळे कानाशी खेळ नकाे. - डॉ. अतुल आव्हाड
कर्ण पुरम हे जे कर्म आहे, त्यात कानाची निगा राखण्यासाठी आणू तेलाचे दोन थेंब किंवा पंचनवर्धीय तेल टाकल्यास कानाची निगा राखता येते. त्याचा चांगला फायदाही हाेताे.- अंकुश आव्हाड, आयुर्वेद तज्ज्ञ